आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये जाहीर सभा होणार आहे. आज सायंकाळी सहा वाजता ही सभा होणार आहे. ठाकरे गटाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नुकतीच खेडमध्ये सभा झाली होती. या सभेत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि रामदास कदम यांच्यावर जोरदार टीका केली होती. या सभेला प्रत्युत्तर देण्यासाठीच रामदास कदम यांनी या सभेचे आयोजन केले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विशेष म्हणजे ज्या गोळीबार मैदानात उद्धव ठाकरे यांची सभा झाली. त्याच मैदानात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या सभेला संपूर्ण गोळीबार मैदान भरले होते. शिवसैनिकांनी या सभेला उत्सफुर्त प्रतिसाद दिला होता. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेला किती गर्दी होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आमच्या सभेला जास्त गर्दी होईल
दरम्यान, या सभेपूर्वी रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. रामदास कदम म्हणाले, की, आमच्या सभेला उद्धव ठाकरे यांच्या सभेपेक्षा जास्त गर्दी होईल. सभेसाठी आम्ही फक्त मतदार संघातील लोकांना बोलावणार आहोत. अफझल खान ज्याप्रमाणे सर्व सैन्य घेऊन महाराष्ट्रावर चालून आला होता. त्याप्रमाणे उद्धव ठाकरेंनी सभेसाठी गर्दी जमवली होती. सभेसाठी मातोश्रीवर जोरदार बैठका झाल्या. प्रत्येकाला विचारले जात होते की, तू किती माणसं आणणार? तरीदेखील आमच्या सभेला जास्त गर्दी होईल.
जिवंत सभा असेल
सभेबाबत रामदास कदम यांचे पुत्र आमदार योगेश कदम यांनी सांगितले की, कोकणातील गोळीबार मैदान येथे दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नेते रामदास कदम यांच्या प्रचारानिमित्ताने प्रचंड मोठी सभा झाली होती. तेवढीच मोठी सभा होणार आहे. सच्चा शिवसैनिक या सभेला येणार आहे. नाचत गाजत उद्या, शिवसैनिक सभेला येणार आहे. परवासाऱखी मरगळलेली सभा नसेल, जिवंत सभा असेल एवढंच मी सांगतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.