आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवाब मलिक यांना 50 वेळा देशद्रोही म्हणेल!:हक्कभंग प्रस्तावावरुन एकनाथ शिंदे आक्रमक, ठाकरेंचे प्रत्युत्तर- आरोप सिद्ध झाले नाहीत

24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचे मुंबईत बॉम्बस्फोट घडवणाऱ्या दाऊदबरोबर संबंध आहेत. त्यामुळे मलिक हे देशद्रोही आहेत. देशद्रोह्याला देशद्रोही म्हणणे हा गुन्हा असेल तर असा गुन्हा मी पन्नासवेळा करेन, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सभागृहात ठणकावून सांगितले.

यावर नवाब मलिक यांच्याविरोधातील आरोप सिद्ध झाले नाहीत, असे प्रत्युत्तर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले.

विरोधी पक्षातील नेत्यांना महाराष्ट्रद्रोही, देशद्रोही असे म्हटल्याबद्दल विधानपरिषदेत मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत विरोधक आहेत. यावर आज विधान परिषदेत मुख्यमंत्र्यांनी आपल्या वक्तव्याचा खुलासा केला.

अजितदादांना देशद्रोही म्हणालो नाही

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, विरोधकांनी चहापानावर बहिष्कार घातल्यानंतर मी पत्रकार परिषदेत भूमिका मांडली होती. यात मी कुठेही अजितदादांना देशद्रोही म्हणालो नव्हतो. माझे वक्तव्य हे अजित पवार, अंबादास दानवे यांच्याबद्दल नव्हते. माझे देशद्रोह्याबद्दलचे वक्तव्य हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री नवाब मलिक यांच्याबद्दल होते. नवाब मलिक यांच्यावर एनआयए, ईडीकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मलिकांवर देशद्रोहाचा गुन्हा

एकनाथ शिंदे म्हणाले, नवाब मलिक यांचे कुख्यात गुंड व देशद्रोही दाऊद इब्राहिम, छोटा शकील, इकबाल मिर्ची, हसीना पारकर यांच्यांशी संबंध होते. नवाब मलिक यांच्यावर या गुंडांशी आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप आहे. त्यानूसार मलिकांवर देशद्रोहाचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. हसीना पारकर या दाऊद इब्राहीमच्या बहिणीसोबत मलिकांनी जमीन आणि गाळे खरेदी विक्रीचा व्यवहार केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, एनआयएच्या तपासात निष्पन्न झाले आहे की, हसीना पारकरच्या ड्रायव्हर सरदार खान यांचा गाळाही नवाब मलिक यांनी ताब्यात घेतला होता. सरदार खानला बाॅम्बस्फोट प्रकरणात 2005 मध्ये शिक्षा झाली. त्याच्याकडूनच मलिकांनी जमीन घेतली. या व्यवहारांमुळेच नवाब मलिकांना अटक करण्यात आली आहे. एनआयए, ईडीकडून कारवाई झाल्यानंतर मलिकांचा जामीन देखील फेटाळण्यात आला होता. नवाब मलिकांचा जामीन सुप्रीम कोर्टनेही फेटाळला आहे.

...म्हणून सरकारमधून बाहेर पडलो

एकनाथ शिंदे म्हणाले, महाराष्ट्रद्रोह्यांसोबत आम्ही चहापान घेतला नाही, असे वक्तव्य विरोधी पक्षातील नेत्यांनी केले होते. आम्ही काय महाराष्ट्रद्रोह केला? आम्ही काय द्रोह केला ? नवाब मलिक देशद्रोही आहेत, मग त्यांना देशद्रोही म्हणायचे नाही का? महाविकास आघाडी सरकारमध्ये असतांना देखील आम्ही तेव्हा मुख्यमंत्र्यांना मलिकांचा राजीनामा घ्या म्हणून सांगितले होते. संजय राठोडचा राजीनामा घेतला, पण नवाब मलिकचा घेतला नाही. म्हणून सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय आम्हाला घ्यावा लागला.

एकनाथ शिंदेंच्या या वक्तव्यावर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिले. उद्धव ठाकरे म्हणाले, नवाब मलिक यांच्यावरील आरोप सिद्ध झालेले नाहीत. केवळ विरोधकांना बदनाम करण्यासाठी त्यांच्यावर आरोप करुन त्यांना तुरुंगात टाकले जात आहे.

हेही वाचा,

सुप्रीम कोर्ट ही शेवटची आशा!:निवडणूक आयुक्तांबाबत घेतलेल्या निर्णयाचे उद्धव ठाकरेंकडून स्वागत, म्हणाले- लोकशाही जिवंत राहील

निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीबाबत सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला आहे. या निर्णयाचे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वागत केले आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार आता पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि CJI संयुक्तपणे मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांची निवड करतील. या निर्णयावर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे म्हणाले, देशातील लोकशाही जिवंत ठेवण्याच्या दृष्टीने सुप्रीम कोर्टाचा आजचा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. निवडणूक आयोगावर किती विश्वास ठेवायचा, असा आजचा काळ आहे. अशा स्थितीत हा निर्णय महत्त्वपूर्ण आहे. वाचा सविस्तर

बातम्या आणखी आहेत...