आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराम मंदिराला ज्यांनी विरोध केला, अशा विचारधारेच्या पक्षांसोबत उद्धव ठाकरेंनी सरकार बनवले. मात्र, आम्ही ही चूक 7-8 महिन्यापूर्वी दुरुस्त केली, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
बाळासाहेबांचे स्वप्न मोदींनी पूर्ण केले
अयोध्येत आज पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, अयोध्येत राम मंदिर बनावे हे बाळासाहेब ठाकरे व लाखो रामभक्तांचे स्वप्न होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले. भाजप आणि शिवसेनेचे विचार एकच आहे. मात्र, काही जण जाणीवपूर्वक दोन्ही पक्षांत मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.
उद्धव ठाकरेंनी चुकीचा निर्णय घेतला
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, काही जण धनुष्यबाणावरुन आमच्यावर टीका करत आहेत. शिवधनुष्यबाण हे प्रभू श्री रामाचे आहे. त्यामुळे धनुष्यबाणावर टीका करुन ते प्रभू श्री रामाच्या धनुष्यबाणाचा अपमान करत आहेत. ज्यांनी राममंदिराला विरोध केला त्यांच्यासोबत उद्धव ठाकरेंनी सरकार बनवले. सत्ताच्या हव्यासापोटी उद्धव ठाकरेंनी चुकीचा निर्णय घेतला. आम्ही ही चूक दुरुस्त केली आहे.
अनेकांना हिंदुत्वाची अॅलर्जी
काही जणांना हिंदुत्वाची अॅलर्जी आहे. त्यामुळेच ते आमच्या अयोध्या दौऱ्यावर टीका करत आहेत, असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना दिले आहे. पुढे एकनाथ शिंदे म्हणाले, महाराष्ट्रात रावणराज्य असल्याची टीका काही जण करत आहेत. महाराष्ट्रात साधू-संतांची हत्या झाली ते काय रामराज्य होते का?, असा सवाल एकनाथ शिंदेंनी केला.
अयोध्येत महाराष्ट्र भवन उभारणार
अयोध्येत भव्य दिव्य महाराष्ट्रभवन उभारणार, अशी घोषणाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. तसेच उत्तर भारतीय आणि महाराष्ट्र वेगळे नाही, असेही शिंदे यावेळी म्हणाले. अयोध्येतील महाराष्ट्र भवनामुळे रामाच्या दर्शनासाठी येणाऱ्या महाराष्ट्रातील भाविकांची मोठी सोय होईल, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
राम मंदिर हा अस्मितेचा विषय
एकनाथ शिंदे म्हणाले, अयोध्येतील वातावरण राममय झाले आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात वेगळेच कंपन जाणले. राम मंदिर आमच्यासाठी श्रद्धा, अस्मितेचा विषय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली मंदिराच्या कामाला वेग आला आहे. मंदिराचे काम इतक्या वेगानं होत आहे, ही आश्चर्याची गोष्ट आहे. आज अयोध्येत प्रभू श्री रामाचे दर्शन घेतले. माझ्या आयुष्यातील हा सर्वात भाग्यशाली दिवस आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच मी इथे आलो. माझे जंगी स्वागत झाले. यापूर्वी मी कार्यकर्ता म्हणून यात्रेच नियोजन करायचो. मात्र, आता माझ्या कार्यकर्त्यांनी या यात्रेचे नियोजन केले.
मी घरात बसून काम करणारा नाही
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, महाराष्ट्रात अवकाळी पावासामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. मी ऑफिस किंवा घरात बसून काम करणारा मुख्यमंत्री नाही. मी जमिनीशी नाते असणारा मुख्यमंत्री आहे. प्रभु रामाच्या आशीर्वादाने आम्हाला शिवसेना नाव आणि चिन्ह मिळाले.
संबंधित वृत्त
हिंदुत्व:CM शिंदेंकडून रामलल्लाची महाआरती; नवनीत राणांना तुरुंगात टाकणारे रावण- उद्धव ठाकरेंवर शिंदेंची टीका
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अयोध्येत दाखल झाले आहेत. अयोध्येत पोहोचताच शासकीय प्रोटोकॉलनुसार एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत करण्यात आले. अयोध्येत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांची रॅली काढण्यात आली आहे. रॅलीत जय श्री रामच्या जोरदार घोषणा दिल्या गेल्या. रॅलीदरम्यान देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अयोध्येत आल्याचा मला मनस्वी आनंद होत आहे. महाराष्ट्रात रामराज्य आणण्याचा आम्ही प्रयत्न करू. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, अयोध्येचा दौरा हा राजकीय दौरा नाही. मी अयोध्येला यापूर्वीही भेट दिली आहे. पण, मुख्यमंत्री म्हणून मी येथे पहिल्यांदाच आलो आहे. आमच्या पक्षाच्या सर्व नेत्यांना प्रभू रामाचा आशीर्वाद घ्यायचा होता. यासाठी अयोध्या दौरा आहे. मला योगीजी आणि त्यांच्या मंत्र्यांचे आभार मानायचे आहेत. त्यांनी आमचे जंगी स्वागत केले. वाचा सविस्तर
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.