आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्याचा विजय:सरकारला घटनाबाह्य, बेकायदेशीर म्हणणाऱ्यांना सुप्रीम कोर्टाची चपराक, एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल

मुंबई18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सरकारला घटनाबाह्य, बेकायदेशीर म्हणणाऱ्यांना सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने चपराक बसली आहे. हे जनतेचे सरकार आहे यावर सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केले आहे, अशाप्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल चढवला आहे. न्यायालयाच्या निकालानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते.

राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा अंतिम निकाल समोर आला आहे. तत्कालीन उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी अपात्र ठरवलेल्या 16 आमदारांबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सोपवले आहे. आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे या आमदारांचा निर्णय घेणार आहेत.

निर्णयाचे स्वागत

एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले, आज सत्याचा विजय झाला. कायदेशीर बाबी आणि तांत्रिक बाबी देवेंद्रजींनी सांगितल्या आहेत. देशात संविधान आहे. त्याच्या बाहेर कोणालाही जाता येणार नाही. सरकार कायदेशीर बाबींची पूर्तता करुन सरकार स्थापन केले. अनेक लोक बेकायदेशीर म्हणत होते. त्यांना कोर्टाने चपराक दिली आहे. कालबाह्य केले. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो.

बहुमताचा आदर सुप्रीम कोर्टाने केला

एकनाथ शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, अपात्रतेचा निर्णय अध्यक्ष घेतील. निवडणुक आयोगाने धनुष्यबाण दिला. आम्ही बहुमताचा निर्णय घेतल्यानंतर निवडणुक आयोगाने निर्णय दिला. त्यांच्याकडे बहुमत नव्हते त्यामुळे उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला. राजीनामा देण्याशिवाय पर्याय नव्हता. आम्ही जनभावनेचा आदर केला. शिवसेना-भाजप सोबत लढले दुसऱ्यांसोबत सरकार स्थापन केले. बाळासाहेबांची शिवसेना वाचवण्याचे काम आम्ही केले. बहुमताचा आदर सुप्रीम कोर्टाने केलाय.

काय म्हणाले फडणवीस?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला आहे. त्याबद्दल आम्ही समाधान व्यक्त करतो. निश्चितपणे हा लोकशाहीचा आणि लोकमताचा पूर्ण विजय झाला आहे. हा जो काही निकाल आहे, यातील 4 ते 5 मुद्द्यांकडे मी आपले लक्ष वेधणार आहे. महाविकास आघाडीच्या मनसुब्यांवर कोर्टाने पाणी फिरवले आहे. ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री बनवता येणार नाही, असे कोर्टाने म्हटले आहे. कोर्टाने अतिशय स्पष्टपणे अपात्रतेवर विधानसभा अध्यक्ष निर्णय घेतील. कोर्टाने या आमदारांचे सर्व अधिकार कायम ठेवलेले आहे.

सत्तेसाठी हपापलेले लोक

उद्धव ठाकरे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल देशात लोकशाही जिवंत राहणार की नाही, याबद्दल आहे. सत्तेसाठी हापापलेल्या लोकांच्या उघड्यानागड्या राजकारणाची चिरफाड केली. राज्यपाल महोदयांची भूमिका सरळसरळ अयोग्य होती. राज्यपालांच्या भूमिकेचे वस्त्रहरण झाल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

अधिकार अध्यक्षांकडे राहील

गेल्या वर्षी जूनमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड केल्याबद्दल शिंदे आणि अन्य 15 आमदारांना अपात्र ठरवता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे मोठे घटनापीठ हा निर्णय देत नाही तोपर्यंत हा अधिकार अध्यक्षांकडे राहील.

संबंधित वृत्त

नैतिकतेवर बोलण्याचा ठाकरेंना अधिकार नाही:सुप्रीम कोर्टाने आमच्या सरकारला घटनात्मक ठरवले; अपात्रतेबद्दलचा निर्णय अध्यक्षांचा - देवेंद्र फडणवीस

निवडणूक आयोग ब्रह्मदेव नाही: राज्यपालांच्या भूमिकेचे वस्त्रहरण झाले, नैतिकता असेल तर शिंदे-फडणवीसांनी राजीनामा द्यावा, उद्धव ठाकरेंचे आव्हान