आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 9 एप्रिलरोजी आपल्या 40 आमदारांसह अयोध्या दौऱ्यावर जात आहे. या दौऱ्याचा टीझर आता जारी करण्यात आला आहे. 'अयोध्या में शंखनाद… आ रहे है एकनाथ', अशी टॅगलाईन असलेला हा टीझर सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
हिंदूत्व ठसवण्याचा प्रयत्न
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वतीने जारी करण्यात आलेल्या टीझरमध्ये महाराष्ट्रात रामराज्य असल्याचे म्हटले आहे. तसेच, महाराष्ट्र एक सुशासित राज्य आहे, असा दावा करण्यात आला आहे. टीझरमध्ये महाराष्ट्रात सामान्य जनता हा एक परिवार आहे तर जनतेची सेवा, मानव सेवा हेच परम कर्तव्य आहे, अशी एकनाथ शिंदेंची ओळख ठसवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे हिंदूत्व ठसवण्याचाही जोरदार प्रयत्न या टीझरमधून करण्यात आला आहे. 'भगव्याला कधीही डावलले जाणार नाही, रग रग में राम, कण कण में राम', अशा प्रकारे ओळी वापरण्यात आले आहेत. संपूर्ण हिंदी भाषेत हा टीझर आहे आणि सर्वात शेवटी 'अयोध्या में शंखनाद, आ रहे है एकनाथ', असा शंखनाद करण्यात आला आहे. एकूणच शिंदेंचे हिंदुत्व ठसवण्याचा प्रयत्न टीझरमधून करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री म्हणून शिंदेंचा पहिलाच दौरा
एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री म्हणून हा पहिलाच अयोध्या दौरा आहे. शिवसेनेत फूट होण्यापूर्वी ते आदित्य ठाकरे यांच्यासोबत अयोध्या दौऱ्यावर गेले होते. त्यानंतर शिवसेनेत झालेली उभ फूट अवघ्या महाराष्ट्राने पाहिली. शिंदे यांचा हा अयोध्या दौरा एका सूनियोजित राजकीय रणनीतींतर्गत होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे शिंदेंच्या या नियोजित दौऱ्यात त्यांच्यासोबत शिवेसनेच्या सर्व आमदारांसह त्यांचे खासदार सुपूत्र श्रीकांत शिंदे असतील असा अंदाज आहे. गत महिन्याभरापासून शिंदे यांच्या या दौऱ्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
यापूर्वी कामाख्या देवीचे घेतले दर्शन
एकनाथ शिंदे यांनी गतवर्षी 21 जून रोजी बंड पुकारले. त्यांच्यासह 40 आमदारही शिवसेनेतून बाहेर पडले होते. शिवसेनेच्या राजकीय इतिहासातील ही सर्वात मोठी बंडाळी ठरली होती. शिंदेंच्या या धक्कातंत्रानंतर उद्धव ठाकरे यांनी 29 जून रोजी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर लगेचच शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राची सूत्रे हाती घेतली. त्यानंतर त्यांनी गुवाहाटीला जाऊन कामाख्या देवीचे दर्शनही घेतले होते. आता एप्रिल महिन्यात ते अयोध्येत जाऊन प्रभू श्रीरामांपुढे माथा टेकवणार आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.