आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिंदे गटाचे बाळासाहेब ठाकरेंना पत्र:'शिवसेना नेतृत्वाचा षंढासारखा थंडपणा तुम्हालाही बघवला नसेल, आता मात्र काळजीचे कारण नाही'

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना भावनिक पत्र लिहिले आहे. यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर शेलक्या शब्दांत टीका करण्यात आली आहे.

पत्रात म्हटले आहे की, मुंबईच्या जीवावर उठलेल्या दाऊदच मंत्र्याशी असणारं कनेक्शन सिद्ध झालं, तरीही शिवसेना शांत राहिली. शिवसेना नेतृत्वाचा षंढासारखा थंडपणा तुम्हालाही बघवला नसेलच. मात्र, आता एकनाथ यांच्या रूपाने धर्मवीर आनंद दिघेसाहेबांच्या तालमीतला तुमचा ढाण्या वाघ महाराष्ट्रात शिवराज्य साकारतोय. आपला शिवसेनाधर्म पुन्हा नव्या दमानं फुलतोय. आता काळजी करण्याचं काहीही कारण नाही.

पत्र जसेच्या तसे...

साहेब, तुम्ही गेलात आणि आपल्या शिवसेनेच्या वाघाला कोण्या शिकाऱ्याने गुंगीचं इंजेक्शन दिलं हो. या गुंगीच्या इंजेक्शनचा प्रभाव दिवसेंदिवस वाढू लागला. शिवसेनेचा कणा हळूहळू मोडताना पाहून तुमच्या आत्मत्याला किती वेदना झाल्या असतील..

साहेब, आम्हांला हे सगळं दिसत होतं. पण उद्धवसाहेबांना आणि आदित्यला सांभाळू, या तुम्हाला दिलेल्या वचनामुळेच आम्ही शांत होतो. तुम्हांला ज्या विचारांची चीड होती, तेच विचार तत्त्व म्हणून आपल्या संघटनेत येऊ लागले. अनेकवेळा याबद्दल बोलायचा प्रयत्न केला. पण आमचा आवाजच दाबला जाऊ लागला. रात्री जागून पोस्टर्स लावणाऱ्या, शिबीरं घेणाऱ्या, मराठी आणि हिंदू अस्मिता टिकवण्याकरता झटताना; पोलिस केसेस आणि दांडेही अंगावर घेणाऱ्या आम्हा कार्यकर्त्यांच्या एकाही शब्दाला किंमत उरली नाही. हौशा-गौशांच्या नावापुढं बिरुदं लागून संघटनेत त्यांचं वजन वाढू लागलं आणि आपली संघटना भरकटू लागली.

हेच आमचं दुर्दैव

तुमच्या खांद्याला खांदा लावून लढलेल्या, जुन्या-जाणत्या शिवसेना नेत्यांनाही राजकारणातून बेदखल केलं गेलं. मग साहेबांच्या भेटीशिवाय परतण्याची वेळ आमच्यासारख्या सर्वसामान्य शिवसैनिकांवर आली यात नवल काय? साहेब, तुम्ही होतात तेव्हा, 'मातोश्री म्हणजे आपुलकी' हे समीकरणच होतं आणि आता..

साहेब, तुम्ही कधीही खुर्चीचा मोह धरला नाहीत, पण तुम्ही गेलात आणि तुम्ही आयुष्यभर ज्यांच्याशी संघर्ष केलात, त्याच काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत केवळ मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेचं संधान जुळलं. तुमच्या अटकेचा प्रयत्न करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावण्याची नामुष्की शिवसेनेवर ओढावली...

'साहेब, असं करू नका' हे आम्ही त्यावेळीही धाय मोकलून सांगत होतो, पण आमचं ऐकून घेणारा कानच उरला नव्हता हेच आमचं दुर्दैव!

शिवसेना नेतृत्वाचा थंडपणा

तरीही आपले साहेब मुख्यमंत्री झाले याचं समाधान आणि आता सुराज्य साकार होईल अशी आशा होती, पण झालं ते विपरीतच ! १९९२ च्या दंगलीमध्ये तुम्ही होतात, म्हणून मुंबई वाचली. पण त्रिपुरामधल्या तथाकथित घटनेवरून अमरावतीत दंगल उसळली, तरीही शिवसेना शांतच! संभाजीनगरचं कायदेशीर नामांतर व्हावं ही तुमचीच इच्छा पण आपलं सरकार असूनसुद्धा ही इच्छा पूर्ण होताना दिसेना!

मुंबईच्या जीवावर उठलेल्या दाऊदच मंत्र्याशी असणारं कनेक्शन सिद्ध झालं, तरीही शिवसेना शांतच! शिवसेना नेतृत्वाचा षंढासारखा थंडपणा तुम्हालाही बघवला नसेलच.

किती सहन करायचं?

मालमत्तेच्या वारशापेक्षा विचारांचा वारसा जास्त महत्त्वाचा असतो. म्हणूनच आम्ही आपला वारसा पुढे घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. शेवटी किती दिवस 'तुमचे विचार' की 'आपल्या संघटनेची गळचेपी मुकाट्यानं सहन करणं' या द्वंद्वात आम्ही अडकून राहायचं.

तुम्ही गेल्यावर शिवसेना नावाचा ढाण्या वाघ बघताबघता मॅटिनीशोच्या सर्कशीतला वाघ झाला. महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेच्या हक्काच्या जागा नाकारल्या जाऊ लागल्या. शिवसेनेवर पदोपदी अन्याय होऊ लागला. कित्येक शिवसैनिकांवर मोक्का, तडीपारी लादण्यात आली. शिवसेना सोडण्यासाठी शिवसैनिकांवर आपल्याच मित्रपक्षांकडून दबाव येऊ लागला. शिवसैनिकांनी सहन तरी किती करायचं ? तुम्हीच सांगा.

भविष्य धोक्यात आलं होत

या सगळ्यात स्वतःची टिमकी वाजवणारे नेते मूग गिळून गप्प बसले होते याचंच वाईट वाटतं. पण आमची निष्ठाच नव्हे तर आमचा जन्मही आम्ही तुमच्या पायांवर वाहिला आहे. आणि निष्ठेच्या अग्निपथावर माघार नसते, असतं ते फक्त भविष्य ! तुम्ही जाताना शिवसेनेचं हेच भविष्य आमच्या हाती सोपवून निर्धास्त मनाने गेला होतात आणि आता हेच भविष्य धोक्यात आलं होतं.

लाचारांशी आमची निष्ठा नाही

साहेब,“अन्यायाविरुद्ध पेटून उठा, संघर्ष करा आणि जिंका” या तुमच्या शिकवणीला आम्ही जागलो. शिवसेना हा आमचा प्राण आहे, त्यामुळे आम्ही शिवसेना सोडणं कदापि शक्यच नाही. आणि म्हणूनच आपली शिवसेना आम्ही जागती ठेवत आहोत.

आता तुमच्या आणि धर्मवीरांच्या विचारांवर चालणारं युतीचं सरकार आलंय, एकनाथजींच्या रूपाने धर्मवीर आनंद दिघेसाहेबांच्या तालमीतला तुमचा ढाण्या वाघ महाराष्ट्रात शिवराज्य साकारतोय. आपला शिवसेनाधर्म पुन्हा नव्या दमानं फुलतोय. आता काळजी करण्याचं काहीही कारण नाही. आमची निष्ठा लाचारांशी नाही, विचारांशी आहे.

आपण आमच्या रक्तात
आम्ही तुमचा ज्वलंत हिंदुत्ववादाचा वारसाच पुढे घेऊन जात आहोत. या खडतर मार्गावर तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत याची खात्री आहेच; साहेब, तुम्ही म्हणाला होतात.. माझ्या मावळ्यांनो, काँग्रेसी कबुतराची नाही, हिंदवी गरुडाची भरारी घ्या. तुमच्या विचारांशी प्रतारणा करणाऱ्या काँग्रेसी लांडग्यांच्या कळपातून 'वाघ' आता बाहेर आलाय..

आपण आमच्या रक्तात होतात...आहात...आणि रहाल.

बातम्या आणखी आहेत...