आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोका टळला:मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, इमर्जन्सी लँडिंग करत रद्द केला सातारा दौरा; नेमके काय झाले?

मुंबई16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सातारा दौऱ्यावर होते. मात्र, अचानक त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याने इमर्जन्सी लँडिंग करावे लागले आणि त्यामुळे त्यांचा आजचा सातारा दौरा रद्द करण्यात आला.

सत्तासंघर्षावरील निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी सातारा जिल्हा दौऱ्यावर येणार होते. सातारा जिल्ह्यातील मरळी (ता. पाटण) येथे 'शासन आपल्या दारी' या राज्यस्तरीय अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता. मात्र मुख्यमंत्र्यांच्या विमानात बिघाड झाल्याने हा दौरा आता रद्द झाला आहे.

निवडणुकीची साखर पेरणी

मुंबईतील राजभवनावरून ते सातारा-पाटण येथे जात कार्यक्रमासाठी जात होते. त्यावेळी त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्यामुळे त्यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. साताऱ्यात शासकीय योजनेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने शिंदे-फडणवीसांकडून आगामी निवडणुकीची साखर पेरणी देखील करण्यात येणार होती.

राजभवनच्या हेलिपॅडवर उतरवले

यावेळी हेलिकॉप्टरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत उद्योग मंत्री उदय सामंत आणि रोहियो मंत्री संदिपान भूमरे देखील उपस्थित होते. हेलिकॅाप्टरच्या एसी मध्ये बिघाड झाल्यामुळे बंद पडला त्यामुळे हेलिकॉप्टर पुन्हा राजभवनच्या हेलिपॅडवर उतरवण्यात आले.

साताऱ्यात हा होता कार्यक्रम

पाटणचे आमदार तथा साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी त्यांचे होमपीच असलेल्या मरळी-दौलतनगर (ता.पाटण) येथे शासन आपल्या दारी या अभियानाच्या शुभारंभाचे आयोजन केले आहे. यानिमित्ताने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसमोर ते जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याचा त्यांचा मानस होता.

‘मोफत महाआरोग्य शिबिर’

‘शासन आपल्या दारी’ अभियानाच्या शुभारंभाच्या निमित्ताने दौलतनगर येथे बेरोजगार युवक-युवतींकरिता ‘पंडीत दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. परिसरातील तरूणांना अभियानाच्या निमित्ताने रोजगार उपलब्ध होणार आहे. तसेच सातारा जिल्ह्यातील नागरिकांसाठी ‘मोफत महाआरोग्य शिबीर’ आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात विविध आजारांवर मोफत उपचार करण्यात येणार आहेत.