आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्रात राजकीय भूकंप:सुरतमधून एकनाथ शिंदेंसह 33 शिवसेना आणि 4 अपक्ष आमदारांना विमानाने गुवाहटीला नेण्याची तयारी

मुंबई4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुरतमध्ये असलेले शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे शिवसेनेच्या 33 आमदारांना गुवाहटी (आसाम) येथे नेण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यासाठी 3 बसेसही हाॅटेल 'ली मेरीडीयन' येथे दाखल झाल्या असून या बसेसमधून​​​​​आमदारांना विमानतळावर ​​​​​नेले जात आहे. त्यानंतर मध्यरात्रीनंतर विमानाने त्यांना गुवाहटी, दिल्ली अथवा अहमदाबाद किंवा मैसूर येथे नेले जाणार असल्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

आमदारांना सुरतबाहेर नेण्याची तयारी

सुरतच्या हाॅटेलमधून शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि त्यांचे स्वीय सहायक तसेच खुद्द एकनाथ शिंदे यांच्यासह एकूण 65 जणांना बसमधून विमानतळावर नेले जात आहे. तेथून इतर राज्यात या सर्वांना नेले जाणार आहे. एकनाथ शिंदेंना दगाफटका आमदारांकडून होऊ नये यासाठीच हा प्रयत्न असून विमानतळावर विमाने उड्डाणासाठी सज्ज आहे.

आमदार नितीन देशमूखांच्या छातीत कळ

शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांच्यासह सुरत येथे गेलेले शिवसेना आमदार नितीन देशमुख यांची सुरत येथील मेरिडियन हॉटेलमध्ये प्रकृती खालावली. त्यानंतर त्यांना उपचारासाठी सुरतच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. कडेकोट पोलीस बंदोबस्तात देशमुख यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, सायंकाळी उशिरा एकनाथ शिंदे त्यांना भेटण्यासाठी रुग्णालयात पोहोचले होते. सुरत पोलिसांनी त्यांच्या दोन आमदारांना मारहाण केल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला असून त्यात नितीन देशमुख यांच्या नावाचाही समावेश आहे हे विशेष!

भाजपशी युती केल्यास शिवसेना फुटणार नाही- एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री तथा शिवसेनाप्रमूख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना मुंबईत येऊन भेटण्यास सांगितले आहे; पण शिंदे यांनी भाजपसोबत युतीची अट ठेवली असून, याबाबत प्रथम आपली भूमिका स्पष्ट करा असे ठाकरे यांना ठणकावले. तसेच भाजपसोबत युती झाली तर शिवसेना फुटणार नाही असा सुचक इशाराही एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.

सत्ताधाऱ्यांना मोठा हादरा

शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत फुट पाडून जोरदार धक्का दिला आहे. शिंदे यांनी 30 आमदारांसह सुरत गाठले असून आता उद्धव ठाकरे सरकार संकटात सापडले आहे. शिंदे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपसोबत सरकार स्थापन करा अशी अटच मुख्यमंत्री ठाकरे यांना शिष्टाई करण्यासाठी सुरतला गेलेल्या मिलिंद नार्वेकर यांच्यामार्फत घातली आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना मोठा हादरा बसला आहे.

दिग्गज मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 15 शिवसेना, एक राष्ट्रवादी आणि 14 अपक्ष आमदार सुरतला गेले असून या गटात आणखी 3 मंत्री असून एकूण 30 आमदार त्यांच्यासोबत गेले आहेत.

शिंदे-मुख्यमंत्री ठाकरेंची फोनवरून चर्चा

मिलिंद नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेत चर्चा केली. त्यानंतर नार्वेकर यांच्या फोनवरुन एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरेंशी सुमारे पंधरा चर्चा झाली आहे. परंतू नेमकी काय चर्चा झाली हे मात्र अजून स्पष्ट झालेले नाही.

शिंदे उद्धव ठाकरेंना काय म्हणाले?

  • एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी सुमारे पंधरा मिनिटे चर्चा झाली. यात संजय राऊतांवर नाराजी व्यक्त केली. शिंदेंचा गैरसमज झाला असे राऊत एकीकडे म्हणतात तर दुसरीकडे शिंदेंनी आमदारांचे अपहरण केले असे म्हणतात अशी तक्रारही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.
  • मी शिवसेनेविरोधात बोललो नाही, स्वतंत्र पक्ष काढण्याची भाषा केली नाही. पक्षांतर केले नाही ना भाजपसोबत सत्ता स्थापनेसाठी कोणत्याही कागदावर सही केली नाही मग मला गटनेते पदावरुन का काढले? असा सवालही शिंदेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केला आहे.
  • मला मंत्रीपदाची लालसा नाही. पण भाजपसोबत सरकार स्थापन करा अशी मागणी करीत पुढे काय करायचे ते लवकरच अधिकृतपणे कळवणार आहे असे ठाकरेंना शिंदे म्हणाले.

राज्यात राजकीय घडामोडींनी वेग

एकनाथ शिंदे यांच्या धक्कातंत्रामुळे राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यातील काँग्रेसही अलर्ट मोडवर असून त्यांचेही आमदार फुटण्याची भिती व्यक्त होत आहे. याच धर्तीवर काँग्रेसने त्यांच्या सर्व आमदारांना मुंबईत बोलावले आहे. तर वर्षा बंगल्यावरही उपमुख्यमंत्री अजित पवार पोहचले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही शिवसेनेची आणि महाविकास आघाडीचीही तातडीची बैठक बोलावली आहे. तर दुसरीकडे मातोश्रीवर पोलिस बंदोबस्त लावण्यात आला असून शिवसैनिकांनीही मोठी गर्दी केली आहे.

भाजपशी युती करा- शिंदेंची अट

एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबतची युती तोडून भाजपसोबत युती करण्याची अट ठेवल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्रिपदावर बसायचे असल्याचेही बोलले जात आहे. शिंदे यांनी संजय राठोड, संजय बांगर आणि दादा भुसे या तीन आमदारांनाही मातोश्रीवर पाठवले आहे. या बैठकीत काय झाले हे अद्याप समजू शकलेले नाही.

आमदारांसह शिंदे दिल्लीला जाणार?

सुरतमध्ये उपस्थित असलेल्या आमदारांबाबत दोन शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. प्रथम- त्यांना विमानाने दिल्लीला नेले जाऊ शकते आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे नेले जाऊ शकते. दुसरे- त्यांना अहमदाबादमधील कोणत्याही रिसॉर्टमध्ये नेले जाऊ शकते.

मिलिंद नार्वेकर एकनाथ शिंदेंच्या भेटीला

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मिलिंद नार्वेकर यांना एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करण्यासाठी सुरतला पाठवले आहे. त्यांच्यासोबत माजी आमदार रवी पाठक हेही सुरत येथील ली-मेरीडीअन या हॉटेलमध्ये गेले. त्यांची एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुमारे 1 तास 10 मिनिटे चर्चा झाली. या चर्चेत ठोस निर्णय काय झाला हे मात्र थोड्याच वेळात कळेल.

एकनाथ शिंदेंच्या या आहेत अटी

  • हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपशी युती करा
  • काॅंग्रेस-राष्ट्रवादीला सोडावे त्यांच्यामुळे शिवसेनेचे नुकसान झाले
  • मीच गटनेता राहणार

काय आहे प्रस्ताव?

एकनाथ शिंदे यांच्यांशी संजय राठोड, संजय बांगर आणि दादा भुसे यांनी संपर्क साधला. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रस्ताव दिला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेने भाजपसोबत सरकार स्थापन करावे, अशी प्रमुख मागणी एकनाथ शिंदे यांची आहे. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस असावेत, तर उपमुख्यमंत्री आपली वर्णी लागावी, अशी मागणीही शिंदे यांनी केल्याचे समजते.

शिंदे अन् देशमुखांमध्ये खडाजंगी

नाराज शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत सूरतमध्ये 30 हून अधिक आमदार असल्याचे समजते. त्यात बाळापूर (अकोला) येथील आमदार नितीन देशमुख आहेत. देशमुख आणि एकनाथ शिंदे यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याचे समजते. सूरतला आल्यामुळे देशमुख नाराज आहेत. या नाराजीतूनच त्यांचे शिंदे यांच्यासोबत खटके उडाले. त्यानंतर त्यांची प्रकृती अचानक बिघडली. देशमुख यांना सध्या सूरत येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मात्र, तिथेही पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे. विशेष म्हणजे रुग्णालयात जाण्यापूर्वी त्यांना हॉटेलमधून बाहेर जायचे होते. यावेळी त्यांना पोलिसांनी अडवले. त्यामुळे त्यांची पोलिसांशी बाचाबाची झाली. त्यानंतर ते हॉटेलच्या बाहेर येऊन बसले. मात्र, वाहन नसल्याने ते पंधरा मिनिटे तिथेच बसून राहिले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आमदारांना हलवणार

सूरतच्या हॉटेलमध्ये असणाऱ्या शिवसेनेच्या नाराज आमदारांना आता अहमदाबादला पाठवण्यात येणार आहे. अहमदाबादमध्ये ते अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान तत्पूर्वी केंद्रीय मंत्री अमित शहा हे भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेण्यासाठी नड्डा यांच्या घरी पोहचल्याचे समजते. दुसरीकडे वर्षावर शिवसेना आमदार आणि खासदारांची बैठक थोड्याच वेळात होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः या ठिकाणी परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.

संकट अधिक गडद

महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकारवर संकट अधिक गडद झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे 25 आमदारांसह गुजरातला गेले आहेत. यामध्ये शिवसेनेच्या 15 आमदारांचा समावेश आहे, तर 10 अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या आमदारांचा समावेश आहे. शिवसेनेत सातत्याने होत असलेल्या दुर्लक्षामुळे शिंदे नाराज झाले असून, काल संध्याकाळपासून त्यांनी मुख्यमंत्री उद्धव यांचा फोनही उचलला नाही. मुंबईत शिवसेनेने आज विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला शिंदे हजर राहणार का? हे पाहावे लागणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे हे गुजरातमध्ये आहेत. त्यामुळे राजकीय चर्चांना देखील उधाण आले आहे. सोमवारी पार पडलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेचे काही आमदार फुटले असून, भाजपचे सर्व पाचही उमेदवार विजयी झाले आहेत. त्यानंतर शिवसेनेकडून नाराजी नाट्य सुरू झाले आहे.

कोणते आमदार नॉटरिचेबल?

1. शहाजी बापू पाटील

2. महेश शिंदे सातारा

3. भरत गोगावले

4. महेंद्र दळवी

5. महेश थोरवे

6. विश्वनाथ भोईर

7. संजय राठोड

8. संदीपान भुमरे

9. संजय शिरसाठ

10. रमेश बोरणारे

11. प्रदीप जैस्वाल

12. अब्दुल सत्तार

13. तानाजी सावंत

14. सुहास कांदे

गुजरात पोलिसांनी सुरतमधील ज्या हॉटेलमध्ये आमदारांचा मुक्काम आहे त्या हॉटेलबाहेर सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे.
गुजरात पोलिसांनी सुरतमधील ज्या हॉटेलमध्ये आमदारांचा मुक्काम आहे त्या हॉटेलबाहेर सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे.

आकडेवारीचे गणित

विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे बहुमत 151 वर घसरले आहे. राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे 162 आमदार होते. राज्यसभा निवडणुकीपूर्वी ही संख्या 170 होती. म्हणजेच राज्यसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीची संख्या 10 पेक्षा कमी झाली. विधान परिषदेनंतर एकूण 19 आमदार महाविकास आघाडीपासून दूर गेले. दुसरीकडे, भाजपला आता 134 आमदारांचा पाठिंबा आहे. सरकार टिकण्यासाठी 144 चे बहुमत आवश्यक आहे. महाविकास आघाडी आणि भाजपच्या आकड्यांमधील फरक खूपच कमी आहे.

पक्षांतर बंदी कायदा

विधानसभेत शिवसेनेचे एकूण 56 आमदार आहेत. कायद्यानुसार शिंदे यांना 2/3 आमदार म्हणजे 37 आमदार जमवायचे असतील. सध्या शिंदे यांच्याकडे एकूण 29 आमदार असल्याचा दावा केला जात आहे. अशा स्थितीत एकनाथ शिंदे यांना आणखी 8 आमदारांच्या पाठिंब्याची गरज आहे.

का झाले नाराज?

एकनाथ शिंदे यांच्याबरोबर शिवसेनेचे काही आमदार देखील गुजरातला आहेत. ते सुरतच्या ली-मेरिडिअनमध्ये हॉटेलमध्ये थांबल्याचे समजते. त्यांच्यासोबत महाविकास आघाडीतल 13 आमदार असल्याची माहिती आहे. महाविकास आघाडीतील अनेक जण काल संध्याकाळपासून शिंदेंना संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, ते फोन घेत नाहीत. राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीची व्यूहरचना आखताना एकनाथ शिंदे यांना बाजूला ठेवण्यात आले होते. त्यामुळे ते नाराज झाल्याचे समजते. शिवसेनेत आपल्याला किंमत दिली जात नाही. आपण डिस्टर्ब आहोत, असे सोमवारी सांयकाळी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून सांगितले होते. त्यानंतर फोन बंद करून ते सुरतकडे निघाले.

डीपीवर शिंदेंचा फोटो

बुलढाण्यातील शिवसेनेचे आमदार संजय रायमूलकर आणि संजय गायकवाड हेदेखील नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे. जय रायमूलकर यांनी काहीवेळापूर्वीच व्हॉट्सअॅपच्या डीपीवर एकनाथ शिंदे यांचा फोटो लावला आहे. त्यामुळे हे दोन्ही आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत जातील, असे सांगितले जात आहे.

मंत्री देसाईही सोबत

महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई हे सातारा जिल्ह्यातील पाटणचे शिवसेनेचे आमदार आहेत. परंतु तेही नॉट रिचेबल असून, एकनाथ शिंदे यांच्या समवेतच असल्याची चर्चा सुरू आहे. एकनाथ शिंदेसह मराठवाड्यातले सहा आमदार देखील नॉट रिचेबल आहेत. त्यात अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, रमेश बोरनारे, उदयसिंग राजपूत, संजय शिरसाट, माजी वनमंत्री संजय राठोड हेही नॉट रिचेबल आहेत.

पवारांची बैठक, फडणवीस दिल्लीत

शिवसेनेचे आमदार नॉट रिचेबल झाल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. शरद पवार हे महाविकास आघाडीचे किंगमेकर असल्याचे मानले जाते. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला गेल्याचे समजते.

वर्षावर ठाकरेंची बैठक

विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार काठावर विजयी झाले आहेत. शिवसेना आणि शिवसेनेला पाठिंबा देणाऱ्या अपक्षांची मते फुटल्याचेही समोर आले. त्यामुळे शिवसेना उमेदवार आमशा पाडवी आणि सचिन आहिर यांना प्रत्येकी 26 मते मिळाली. सोबतच एकनाथ शिंदे यांची नाराजी. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी आज वर्षांवर बैठक बोलावली आहे.

राऊतांचा दिल्ली दौरा रद्द

शिवसेना खासदार संजय राऊत हे आज दिल्लीला जाणार होते मात्र, एकनाथ शिंदे नाराज आहेत. तसेच आज शिवसेनेच्या आमदारांची बैठक आहे. त्यामुळे राऊत यांनी आपला दिल्ली दौरा रद्द केला आहे. त्यासोबत मंत्री उदय सामंत यांचा देखील रत्नागिरी दौरा रद्द झाला असून, सामंत आणि राऊत आज मुंबईतच थांबणार आहेत.

जळगावच्या पाटलांचा चमत्कार

एकनाथ शिंदे यांची सूरतमध्ये सारी सोय सी. आर. पाटील यांनी केल्याचे समजते. पाटील हे गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष असून, त्यांचे गाव जळगाव जिल्ह्यातील पिंप्री अकारूत (ता. मुक्ताईनगर) आहे. ते सलग तीनवेळा खासदार म्हणून निवडून आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे ते निकटवर्तीय असल्याचे समजते. त्यांचे शिक्षण आयटीआयपर्यंत झाले आहे. ते 1989 पोलिस कॉन्स्टेबल झाले. त्यानंतर समाजकार्य सुरू केले. समजाकारणासोबत राजकारण सुरू केले. त्यांनी अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. या पाटील यांनीच शिंदेंची गुजरातमध्ये सारी सरबराई केल्याचे समजते.

बातम्या आणखी आहेत...