आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंदुत्वावर सवाल:बाबरी पाडली तेव्हा उद्धव ठाकरे कुठे होते? आता बोलण्याचा काहीही अधिकार नाही - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाबरीच्या मुद्द्यावर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी जे काही वक्तव्य केले आहे, त्याविषयी मी त्यांच्याशी बोललो आहे. मात्र, बाबरी पाडली तेव्हा उद्धव ठाकरे कुठे होते?, असा उलट सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

शिंदेंनी बोलणे टाळले

बाबरी पाडण्यात एकाही शिवसैनिकाचा हात नव्हता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचीदेखील काहीही भूमिका नव्हती, असे खळबळजनक वक्तव्य भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना मी याविषयी चंद्रकांत पाटील यांच्याशी बोललो आहे, एवढेच वक्तव्य करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अधिक बोलणे टाळले.

उद्धव ठाकरेंना बोलण्याचा अधिकार नाही

मात्र, बाबरी प्रकरणावरुन एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंनाच लक्ष्य केले. एकनाथ शिंदे म्हणाले की, बाबरी पाडली तेव्हा आताचे माजी मुख्यमंत्री कुठे होते? त्यांना यावर बोलण्याचा अधिकार तरी आहे का? बाबरी आंदोलनात कोणताही पक्ष नव्हता. सर्वच जण रामभक्त म्हणून सहभागी झाले होते. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी घेतलेली भूमिका जगजाहीर आहे. त्यावेळी 'गर्व से कहो, हम हिंदू है', हा नारा बाळासाहेब ठाकरेंनीच दिला होता.

तेव्हा पक्ष नव्हते, सर्वजण रामभक्त होते

पुढे एकनाथ शिंदे म्हणाले की, बाबरी पाडल्यानंतर मुंबईत दंगल उसळली तेव्हा मुंबईचे रक्षण हे बाळासाहेबांनीच केले होते. बाबरी पाडल्यानंतर बाळासाहेबांनीच परखड भूमिका घेत याचे समर्थन केले होते. तेव्हा राम मंदिराला ज्यांनी विरोध केला त्यांच्यासोबत जे आता सत्तेत सहभागी झाले आहेत, त्यांना आता बाबरीवर बोलण्याचा काय अधिकार आहे? अयोध्येत राम मंदिर बनावे हे बाळासाहेबांचे स्वप्न होते, हे स्वप्न नरेंद्र मोदींनी पूर्ण केले.

शेतकऱ्यांना मदत करणार

दरम्यान, धाराशिव व अहमदनगर येथे नुकसान झालेल्या शेतीचीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली. यावेळी आमची श्रद्धा, राम, अयोध्येसोबतच शेतकऱ्यांच्या घामाशीही आहे, असे प्रत्युत्तर एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना दिले. यावेळी एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जात नुकसानीची पाहणी केली व त्यांच्याशी चर्चा केली. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सर्वोतोपरी मदत करणार, अशी ग्वाहीही एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.

संबंधित वृत्त

प्रत्युत्तर:चंद्रकांत पाटील यांची हकालपट्टी करा, अन्यथा एकनाथ शिंदेंनी राजीनामा द्यावा; 'बाबरी'प्रकरणी उद्धव ठाकरेंची मागणी

मंत्री चंद्रकांत पाटील यांची हकालपट्टी करा, अन्यथा एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. बाबरी पाडली तेव्हा, एकही शिवसैनिक नव्हता, असे वक्तव्य करून पाटील यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. त्याला पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांनी आज प्रत्युत्तर दिले. वाचा सविस्तर