आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बळीराजाच्या नजरेसमोर पिके पाण्याखाली वाहून गेली. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकाळी राज्यातील परिस्थितीची माहिती घेतली. तसेच तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
राज्यातील अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसामुळे पिकांना फटका बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी मुख्य सचिव तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून त्यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली. तसेच तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत.
पिकांचे नुकसान
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, शेतकऱ्यांना तातडीने दिलासा मिळाला पाहिजे. संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या सरकार पाठीशी आहे, यादृष्टीने महसूल यंत्रणेने लगेच कामाला लागावे व पंचनामे करावेत असेही निर्देश मुख्यमंत्री यांनी दिले. ठाणे, पालघरसह राज्यातल्या महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस झाला. वाशीम, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पैठण, गंगापूर परिसरातील अनेक तालुक्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने ऐन काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे.
आंब्याला देखील फटका
मराठवाड्यात कालपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे मराठवाड्यात झालेल्या पावसामुळे गहू हरभरा इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच आंब्याला देखील फटका बसला आहे. मराठवाड्यात विभागात औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात सरासरी 7 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुंबई, ठाण्यासह उत्तर मध्य महाराष्ट्रावर ढगाळ वातावरण असल्याने बऱ्याच ठिकाणी आणखी अवकाळी पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. त्यादृष्टीने मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.