आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही:मुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही, अवकाळीग्रस्त भागाचे युद्धपातळीवर पंचनामे करण्याचे आदेश

12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही. अवकाळीग्रस्त भागाचे युद्धपातळीवर पंचनामे करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. पंचनामे झाल्यानंतर शेतकऱ्यांना तातडीने मदत दिली जाईल, अशी ग्वाही आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली.

सरकारने अजूनही भूमिका स्पष्ट केली नाही

शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन आज विधानसभेत विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. काँग्रेस नेते नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि छगन भुजबळ यांनी अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित करत सरकारला घेरले. काल संध्याकाळपर्यंत नुकसान भरपाईबाबत भूमिका स्पष्ट करु, असे सभागृहात देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. मात्र, सरकारने अद्याप भूमिका स्पष्ट केली नाही, अशी टीका विरोधी नेत्यांनी केली.

पंचनामे होताच शेतकऱ्यांना मदत

अजित पवार यांना उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांबाबत सभागृहाची जी भावना आहे, तीच भावना सरकारचीही आहे. सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. सध्या यद्धपातळीवर पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. पंचनामे होताच शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे दिले जातील.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आम्ही यापूर्वीही नियमावर बोट न ठेवता शेतकऱ्यांना आवश्यक तेवढी मदत केली आहे. एनडीआरफच्या निकषाच्या दुप्पट मदत शेतकऱ्यांना केली आहे. आताही आम्ही तातडीने मदत करू.

मुख्यमंत्री शिंदे- अजित पवारांमध्ये खडाजंगी

दरम्यान, सभागृहात एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यातही चांगलीच खडाजंगी झाली. एकनाथ शिंदे बोलत असतानाच अजित पवार म्हणाले की, अवकाळी पावसामुळे बळीराजा त्रासून गेला आहे. त्यात शेतीमालाला भाव मिळत नसल्याने बळीराजा पुरता कोलमडून पडण्याची शक्यता आहे. सरकारने यात तातडीने हस्तक्षेप करून कांदा, हरभरा खरेदी सुरू केली पाहीजे. सरकारतर्फे सभागृहात सांगितले जाते की, नाफेडने कांदा खरेदी सुरू केली आहे. मात्र, प्रत्यक्षात तसे चित्र दिसत नाही, अशा शब्दांत अजित पवारांनी सुनावले. वाचा सविस्तर

नाफेडकडून कांदा खरेदी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाफेडने कांदा खरेदी सुरू केलेली आहे. केवळ काही भागात खरेदी सुरू झाली नाही. तेथेही लवकरच नाफेडकडून कांदा खरेदीला सुरुवात करुन कांदा उत्पादकांना दिलासा दिला जाईल, अशी माहिती दिली. त्यावर मात्र विरोधकांचे समाधान झाले नाही. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेदेखील आक्रमक झाले.

मविआची मदत अजून पोहोचली नाही

विरोधकांना उद्देशून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आम्ही तुमच्यासारखे शेतकऱ्यांच्या तोंडाला केवळ पाने पुसली नाहीत. नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन देण्याची घोषणा महाविकास आघाडी सरकारने केली होती. मात्र, अजूनही हे पैसे शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. यावर मी बोलू का?, असे आव्हान देत मुख्यमंत्री म्हणाले, शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर मला राजकारण करायचे नाही. त्यामुळे विरोधकांनीही राजकारण करू नये. अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला मदत कशी करता येईल, हे आम्ही पाहू. विरोधकांना केवळ राजकारण करायचे असेल तर आम्ही काही करू शकत नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

संबंधित वृत्त

अर्थसंकल्पीय अधिवेशन:विधानसभेत विरोधकांचा सभात्याग, शेतकऱ्यांना तातडीने मदत न दिल्याने सरकारचा केला निषेध

अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत सरकारकडून काहीही सांगितले जात नाही, असा आरोप करत विधानसभेत आज विरोधकांनी सभात्याग केला आहे. तसेच, अनेक भागात नाफेडने अजूनही कांदा, हरभरा खरेदी सुरू केलेली नाही. सरकार सभागृहात खोटे बोलत आहे, असा आरोपही विरोधकांनी केला आहे. वाचा सविस्तर

बातम्या आणखी आहेत...