आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चर्चा:राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; निवृत्तीचे वय 60 वर्षे करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनुकूल, पण अजून निर्णय नाही

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीचे वय 60 वर्षे करण्याबाबत सरकार विचाराधीन असल्याची बातमी समोर येत आहे. राजपत्रित अधिकारी महासंघाचे अध्यक्ष विनोद देसाई यांनी याबाबत माहिती दिली. निवृत्तीचे वय 60 वर्षे करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनुकूलता दाखवल्याचे त्यांनी सांगितले.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीचे वय 60 वर्षे झाल्यास ही कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बाब आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्तीची वयोमर्यादा 60 वर्षे असावी, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनुकूलता दर्शवल्याचे म्हटले जात आहे. नुकतीच महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत त्यांची अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली.

3 लाखांहून अधिक रिक्त पदे

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय हे 60 वर्षे आहे. त्याप्रमाणेच महाराष्ट्रातही हा नियम लागू करण्यात यावा, अशी मागणी राजपत्रित अधिकारी महासंघाने केली आहे. कर्मचाऱ्यांच्या या मागणीची दखल घेणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. सध्या 3 लाखांहून अधिक रिक्त पदे आहेत त्यामुळे अनुभवी कर्मचारी वर्गाचे वय 58 वर्षांवरून 60 वर्षे करण्याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांपुढे सादर करण्यात आल्याचे ग. दि. कुलथे यांनी सांगितले.

विरोधाची भूमिका

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीचे वय 60 वर्षे करण्याबाबत चर्चा सुरू असतानाच सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय 58 वरून 60 वर्षे न करता उलट 50 वर्षे करावे आणि प्रशासनात नव्या दमाच्या तरुणांच्या भरतीचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी केली आहे. त्यांनी याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र देखील लिहिले आहे.