आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा:आनंद दिघेंसोबत घडलेल्या घटनांचा मी साक्षीदार, मुलाखत दिली तर देशात भूकंप होईल

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या मुलाखती दिल्या जात आहेत. पण मी जेव्हा मुलाखत देईन तेव्हा राज्यात आणि देशात भूकंप होईल, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. शिंदे आज नाशिक आणि औरंगाबाद दौऱ्यावर असून, ते मालेगावमध्ये सभेला संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्यावरही भाष्य केले आहे. दिघेंसोबत काय झाले ते योग्य वेळी नक्की सांगेन, असेही यावेळी शिंदे म्हणाले.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर सामनाचे संपादक आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेनेमध्ये उघड दोन गट पडले आहेत. या बंडामुळे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात टोकाचा संघर्ष निर्माण झाल्याचे पाहायला मिळते. खरी शिवसेना आम्हीच आहोत, असा दावा शिंदे गटाने केला आहे, त्यामुळे खरी शिवसेना कोणाची शिंदेंची की ठाकरेंची हा सामान्य प्रश्न आता जनतेला पडला आहे. त्यावर आज पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले.

त्या दिवशी भूकंप येईल

ते म्हणाले की, "आनंद दिघे यांनी त्यांचे आयुष्य शिवसेनेसाठी वाहून घेतले. पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत त्यांनी शिवसेना वाढीसाठी काम केले. पण त्यांच्याबाबतीत खूप राजकारण झाले. धर्मवीर आनंद दिघे यांच्या बाबतीत जे घडले, त्याचा मी साक्षीदार असून त्यांच्यासोबत घडलेल्या घटना मी माझ्या डोळ्यांनी पाहिल्या. त्यांच्यावर ओढावलेले प्रसंग देखील मी पाहिले आहेत. मी ज्यादिवशी माध्यमांना मुलाखत देईन, त्यादिवशी राज्याच्या राजकारणात भूकंप होईल. सध्या मी काही बोलणार नाही. पण समोरुन जर तोंड उघडले गेले, तर मी पण शांत बसणार नाही", असा इशारा देतानाच मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, बंड करुन पेठून उठा हीच त्यांची शिकवण असल्याचे एकनाथ शिंदे सांगायला विसरले नाहीत.

...तर सहन करणार नाही

पुढे ते म्हणाले की, "ज्यांच्यासोबत लढलो, त्यांच्याविरोधात जाऊन मुख्यमंत्रिपदासाठी वेगळी भूमिका घेतली. मुख्यमंत्रीपदासाठी यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला जवळ केले. बाळासाहेबांनी हिंदुत्वासाठी कधी तडजोड केली नाही, त्यांनी विचारांशी कधी प्रतारणा केली. उद्धव ठाकरे आणि माझ्यातील ज्या गोष्टी आहेत, त्या मी आज सांगणार नाही. मात्र एक दिवस मलाही तोंड उघडावे लागेल, मलाही भूकंप करावा लागेल. मी कधीही कोणावर खालच्या भाषेत बोलत नाही, मात्र अन्याय झाला तर सहन करणार नाही", असा इशारा ठाकरेंना दिला.

विश्वासघात कोणी केला?

विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या कौल विरोधात मुख्यमंत्री झाले, मग विश्वासघात कोणी केला? आम्ही बाळासाहेबांच्या हिंदुत्वाशी तडजोड केली नाही. मग प्रतारणा व गद्दारी कोणी केली? असे सवाल करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 'धर्मवीरांच्या बाबतीत झालेल्या घटनांचा मी साक्षीदार, समोरून जसे तोंड उघडले जाईल तसे मलाही बोलावे लागेल अन् योग्य वेळी बरोबर बोलेन' असा गर्भित इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता दिला.

धर्मवीर रुचला नाही

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, धर्मवीरांचा चित्रपट काही लोकांना रुचला नाही. अनेक गोष्टी आहेत, ज्या दिवशी बोलेन त्या दिवशी भूकंप होईल. आम्ही गद्दार नाही तर क्रांती केली आहे. 50 लोक पक्षातून बाहेर पडले या मागच्या आमच्या भूमिकेची 33 देशात चर्चा झाली. तर आमच्यावर गद्दारीचा शिक्का मारण्याचा प्रयत्न झाला. आमची भूमिका लोकांनी स्वीकारली म्हणूनच आमचे ठिकठिकाणी स्वागत केले जात आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला शिवसेना प्रमुख शत्रू म्हणत होते, जेव्हा यांच्या जवळ जाण्याची वेळ येईल त्या दिवशी मी माझे शिवसेना नावाचं दुकान बंद करेल. असे त्यांच्या भाषणांचे व्हिडीओ आजही पाहता येतात. आम्ही भाजप बरोबर घेऊन लढलो, हिंदुत्वाची भूमिका घेऊन लढलो, मग आम्ही काय चूक केली. आम्ही सेना वाचवण्याचे काम केले.

मते कशी मागायची

शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना शिवसैनिकांना मोक्का लागला, तडीपार झाले, जिल्हा प्रमुख आमच्याजवळ येऊन रडले, आम्ही काही करू शकलो नाहीत. विरोधातील पराभूत आमदारांना शंभर ते दोनशे कोटी फंड व आमच्या आमदाराला पाच ते दहा कोटी फंड मिळत असेल ते पुढच्या वेळी कोणत्या तोंडाने मते मागणार? आमच्या आमदारांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. आम्ही अनेक वेळा हे सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र दुर्दैवाने यश मिळाले नाही. आम्ही मंत्र्यासह सत्तेतून पायउतार झालो. बाळासाहेबांच्या आम्ही तडजोड केली नाही, त्यांच्याशी प्रतारणा व गद्दारी कोणी केली, असा सवाल मुख्यमंत्री शिंदे यांनी केला.

आम्ही गद्दारी केली का?

करे घराण्यातील स्मिता ठाकरे, निहार ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या, आम्ही चुकलो असतो तर आम्हाला समर्थन मिळाले असते का? आम्ही गद्दारी केली असती तर लोकांनी उलट्या दिशेला तोंड केली असती. काल ठाणे पासून ते मालेगाव पर्यंत रात्री हजारो लोक रस्त्यावर बसून प्रतीक्षेत होते. कारण लोकांनी आमच्या भूमिकेचा स्वीकार केला, त्यांना विश्वास वाटला की ज्या 50 लोकांनी उठाव केला तेच आपल्याला पुढे घेऊन जाऊ शकतात. असा दावा मुख्यमंत्री शिंदे यांनी केला.
मालेगावात शक्तीप्रदर्शन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौऱ्यावर असून, बंडखोर नेते, माजी मंत्री दादा भुसे यांच्या मालेगावात मुख्यमंत्री शिंदे यांनी सभा घेत मोठे शक्तीप्रदर्शन केले. यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह त्यांच्यासोबत असलेल्या सेना नेत्यांवर जोरदार टीका केली. "आमच्या माथ्यावर गद्दारीचा शिक्का मारला जातोय. पण आम्ही गद्दार नाही. आम्ही आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाची शिकवण घेऊन पुढे चाललोय. काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर कधी युती करणार नाही, तशी वेळ आली तर आम्ही आमचे दुकान बंद करू असे बाळासाहेब म्हणाले होते", असा पुनरुच्चारही एकनाथ शिंदे यांनी केला.

यांची प्रमुख उपस्थिती

'मुख्यमंत्री आपल्या दारी' या मुख्यमंत्री शिंदे यांच्या दौऱ्याची सुरुवात शनिवारी मालेगाव येथून झाली. यावेळी आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री उदय सामंत, गुलाबराव पाटील, आमदार किशोर पाटील, दिलीप बोरसे, बालाजी कल्याणकर, सुहास कांदे, मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल, मंजुळा गावित, लताबाई सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...