आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
लोकशाहीला काळिमा फासत सरपंचपदाच्या लिलावामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेली देवळा तालुक्यातील उमराणे ग्रामपंचायतीची निवडणूक अखेर निवडणूक आयोगाने रद्द केली आहे. तब्बल दाेन कोटी पाच लाख रुपयांत गावच्या सरपंचपदाची बोली लावण्याच्या या कुप्रथेला मोठी चपराक बसली आहे. लोकशाही मूल्ये धाब्यावर बसवणाऱ्या या कुप्रथेविरोधात ३० डिसेंबर रोजी “दिव्य मराठी’ने जाहीर भूमिका घेतली होती. या बातम्यांची दखल घेऊन राज्य निवडणूक आयोगाने केलेल्या चौकशीनंतर उमराणेची ही वादग्रस्त निवडणूक रद्द करण्याचा एेतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. तत्पूर्वी, राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाने चांदवडचे उपविभागीय अधिकारी चंद्रशेखर देशमुख यांनी प्रत्यक्ष भेट देऊन चौकशी केली. ६ जानेवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आयोगाकडे आपला अहवाल सादर केला.
अहवालाचा दाखला देत पर्दाफाश; ‘दिव्य मराठी’च्या भूमिकेचा विजय
निवडणूक आचारसंहितेचा भंग करणाऱ्या या प्रकाराचा बोभाटा झाल्यावर, हा लिलाव सरपंचपदासाठी नाही तर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी झाल्याचा बनाव उभा करण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्ष घटनास्थळाच्या चित्रफितीत लिलाव झाल्याचे सिद्ध होत होते. चांदवडच्या प्रांताधिकाऱ्यांनी दिलेल्या या अहवालाची बातमी “दिव्य मराठी’ने ९ जानेवारीच्या अंकात सप्रमाण प्रसिद्ध केली. परिणामी, या प्रकरणात दबाव टाकणाऱ्यांच्या प्रयत्नास यश आले नाही आणि लोकशाही मूल्यांची राखण झाली.
नंदुरबार जिल्ह्यातील खोंडामळीची निवडणूकही रद्द; "दिव्य मराठी'ने उघड केला होता ग्रामसभेचा बनाव
उमराण्यासोबतच नंदुरबार जिल्ह्यातील खोंडामळी येथील सरपंचपदाची "लिलावी' निवड राज्य निवडणूक आयोगाने रद्द केली आहे. कुलदैवत असलेल्या वाघेश्वरी मातेच्या मंदिरासाठी बोली लावून सरपंच प्रदीप पाटील यांची निवड गावकऱ्यांनी केली होती. छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेली ही सभा ग्रामसभाच असून तसा ग्रामसभेला अधिकार असल्याचा बनावही उभा करण्यात आला होता. मात्र, ती ग्रामसभा नसून बेकायदा लिलाव सभा असल्याचे "दिव्य मराठी'ने उघड केले. खोंडामळी लिलावप्रकरणी नंदुरबार पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यावर कारवाई करून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनास देण्यात आले आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.