आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तयारी:ऑक्टोबरमध्ये निवडणुकीची शक्यता; मुंबई मनपाच्या तयारीत भाजप; फडणवीस, शेलारांचे मार्ग वेगळे

मुंबई18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सर्वोच्च न्यायालयातील राज्यातील सत्तासंघार्षाच्या निकालानंतर भाजप राजकीय दृष्टिकोनातून सावध झाली आहे. कर्नाटक निवडणुकीत भाजपला निकालाचा धक्का बसला आहे. या पार्श्वभूमीवार आता भाजपने मुंबई महापालिका निवडणुकीची तयारी सुरू केल्याचे सध्यातरी चित्र दिसत आहे.

मुंबई महापालिकेची निवडणूक ऑक्टोबर महिन्यानंतर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना मुंबई महापालिकेची निवडणूक कोणत्याही परिस्थितीत जिंकायची आहे. त्यामुळे भाजपने आतापासूनच निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी अमित शाह यांनी पुन्हा मुंबई भाजपची सूत्रे आमदार आशिष शेलार यांच्याकडे सोपवली आहेत.

गेल्या काही दिवसांपासून शेलार यांनी मान्सूनच्या आगमनापूर्वी मुंबईतील नाल्यांच्या सफाईचा पाहणी दौरा करून मुंबईकरांमध्ये भाजपची सक्रियता निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपचा विजय झाला तर त्याचे श्रेय एकट्या शेलारांना जाऊ नये, यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही सक्रिय झाले आहेत. यामुळेच त्यांनी विधान परिषद सदस्य प्रवीण दरेकर यांच्यामार्फत रविवारी गोरेगाव येथील नेस्को हॉलमध्ये गृहनिर्माण सहकारी संस्थांची भव्य परिषद आयोजित केली आहे. या परिषदेत मुंबईतील ५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय मुंबईभरातील भाजप पदाधिकाऱ्यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे.

दरेकर यांची सहकार क्षेत्रात आहे चांगली पकड
प्रवीण दरेकरांना बळ देण्याचा देवेंद्र फडणवीस यांचा आहे प्रयत्न
भाजपमध्ये केंद्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिस्पर्धी मानले जातात. हे दोन्ही नेतेही मराठा समाजातील आहेत. त्यामुळेच फडणवीस यांनी शेलार यांना पर्याय म्हणून मुंबईत विधान परिषदेचे सदस्य प्रवीण दरेकर यांना बळ देण्यास सुरुवात केली आहे. दरेकर हे देखील मराठा समाजातील आहेत. सहकार क्षेत्रामध्ये त्यांची चांगली पकड असल्याचे सर्वांना माहीत आहे.
नेत्यांच्या शीतयुद्धाचा फटका पक्षाला बसण्याची शक्यता
विशेष म्हणजे शेलार हे मुंबई भाजप संघटनेच्या वतीने मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीत व्यस्त असताना उपमुख्यमंत्री फडणवीस दरेकर यांच्या माध्यमातून सरकारच्या वतीने त्याच कामात गुंतले आहेत. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये सुरू असलेल्या या शीतयुद्धामुळे मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपला कितपत यश मिळेल हे येणारा काळच सांगेल. त्यामुळे नेत्यांमधील हे अंतर्गत युद्ध पक्षाला संपवावे लागणार आहे.