आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्या वर्षात राज्यातील 281 बाजार समित्यांच्या निवडणुका:आजपासून प्रक्रियेला सुरुवात; आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांची माहिती

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून राज्यातील ३१ डिसेंबर २०२२ अखेर निवडणुकीस पात्र २८१ कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. याबाबतची प्रक्रिया बुधवार, ७ सप्टेंबरपासून सुरू होत आहे, अशी माहिती प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी मंगळवारी (६ सप्टेंबर) दिली आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे मतदान २९ जानेवारी २०२३ रोजी आणि मतमोजणी ३० जानेवारी २०२३ रोजी होणार आहे.

बाजार समितीच्या निवडणुकीकरिता बाजार क्षेत्रातील कार्यरत प्राथमिक कृषी पतसंस्था, बहुउद्देशीय सहकारी संस्था व ग्रामपंचायत यांचे सदस्य मतदार असल्यामुळे या सदस्यांची सूची २७ सप्टेंबर २०२२ पर्यंत जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे सादर करण्याचे निर्देश संबंधित जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था व गटविकास अधिकारी यांना दिले. याशिवाय बाजार क्षेत्रातील परवानाधारक व्यापारी, आडते व हमाल, तोलाईदार हे बाजार समितीचे मतदार असल्यामुळे या मतदारांची यादी १ नोव्हेंबर २०२२ पर्यंत जिल्हा निवडणूक अधिकारी (कृ.उ.बा.स.) यांच्याकडे सादर करण्याचे निर्देश संबंधित बाजार समित्यांना दिलेले आहेत. उच्च न्यायालय मुंबई, खंडपीठ औरंगाबाद, नागपूर व मुंबई येथे मोठ्या प्रमाणात याचिका दाखल झालेल्या होत्या. उच्च न्यायालयाने श्रीरामपूर, राहाता, जाफराबाद, भोकरदन, वसमत, धारूर या बाजार समित्यांच्या निवडणूक प्रक्रिया विनिर्दिष्ट कालावधीत पूर्ण करण्याचे आदेश दिले.

श्रीरामपूर, जाफराबाद, भोकरदनची प्रक्रिया पूर्ण करा न्यायालय

असा आहे मतदार यादीचा नियोजित कार्यक्रम

बाजार समिती सचिवाने नमुना ४ मधील प्रारूप मतदार यादी जिल्हा निवडणूक अधिकारी (कृ.उ.बा.स) यांच्याकडे सादर करणे - १ नोव्हेंबर २०२२, जिल्हा निवडणूक अधिकारी (कृ.उ.बा.स) यांनी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करणे- १४ नोव्हेंबर २०२२, प्रारूप मतदार यादीवर आक्षेप किंवा हरकती मागवणे- १४ ते २३ नोव्हेंबर, प्राप्त आक्षेप किंवा हरकतींवर निर्णय घेणे २३ नोव्हेंबर ते २ डिसेंबर आणि ७ डिसेंबर २०२२ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहेत.

निवडणू‍क कार्यक्रम

निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर करणे २३ डिसेंबर २०२२, नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा कालावधी २३ ते २९ डिसेंबर २०२२, नामनिर्देशनपत्रांच्या छाननीचा दिनांक ३० डिसेंबर २०२२, छाननीनंतर वैध नामनिर्देशनपत्रांच्या प्रसिद्धीचा दिनांक २ जानेवारी २०२३, उमेदवारी मागे घेण्याचा कालावधी २ ते १६ जानेवारी २०२३, निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्याचा व निशाणी वाटप करण्याचा दिनांक १७ जानेवारी २०२३, मतदान २९ जानेवारी रोजी आणि मतमोजणी ३० जानेवारी २०२३ रोजी. मतमोजणीनंतर लगेचच निकाल जाहीर करण्यात येतील.

मतदान आणि निकाल

कृषी उत्पन्न बाजार समित्यांची प्रारूप मतदार यादी १४ नोव्हेंबर रोजी आणि अंतिम मतदार यादी ७ डिसेंबर २०२२ रोजी प्रसिद्ध होणार आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे मतदान २९ जानेवारी २०२३ रोजी आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे ३० जानेवारी २०२३ रोजी मतमोजणी होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...