आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई:पर्यटन विकासातून रोजगार निर्मिती, अर्थव्यवस्थेला मोठी चालना : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पर्यटन वैभव जगासमोर आणण्यासाठी पर्यटन विभागाचा पुढाकार

महाराष्ट्राला नैसर्गिक, ऐतिहासिक, पौराणिक, भौगोलिक असे विविधांगी पर्यटन वैभव लाभले आहे. राज्यात जंगले, पुरातन गडकिल्ले, गुंफा, मंदिरे, समुद्र किनारे, वन्यजीव असे पर्यटन वैविध्य असून हे जगभरापर्यंत पोहोचविण्यासाठी पर्यटन विभागाने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. यातून देशातील आणि जगभरातील पर्यटक महाराष्ट्राकडे आकर्षित होतील आणि त्याद्वारे राज्याचा पर्यटन विकास होऊन रोजगार निर्मिती आणि अर्थव्यवस्थेच्या विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) विविध उपक्रमांचा मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते आज वर्षा निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात शुभारंभ करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री कु. अदिती तटकरे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार-सिंह अाणि अन्य मान्यवर अाॅनलाइन पद्धतीने उपस्थित होते.एमटीडीसीने जलद आणि अधिक कार्यक्षम सेवा देण्यासाठी सुधारित बुकिंग इंजिन तसेच राज्यातील पर्यटनस्थळांच्या तपशीलवार माहितीसह नवीन संकेतस्थळ सुरू केले आहे. तसेच सिंहगड एमटीडीसीच्या पर्यटक निवासाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. गणपतीपुळे येथे बोट क्लब या उपक्रमांचा शुभारंभ यावेळी झाला.

विविध संस्थांसमवेत झाले सामंजस्य करार
एमटीडीसीच्या पर्यटक निवासांचे बुकिंग अधिक सुलभ होणे आणि जगभरातील पर्यटकांसाठी ही बुकिंग सुविधा उपलब्ध होण्यासाठी मेक माय ट्रिप आणि गो आय बीबो या नामांकित संकेतस्थळांबरोबर सामंजस्य करार करण्यात आला. यामुळे एमटीडीसीची पर्यटक संकुले आता ही संकेतस्थळे वापरून कोठूनही बुक करता येणार आहेत. महाराष्ट्रात स्काय डायव्हिंग साहसी क्रीडा प्रकार सुरू करण्याच्या दृष्टीने स्काय-हाय सोबत सामंजस्य करार करण्यात आला. तसेच एमटीडीसी कर्मचाऱ्यांसाठी वार्षिक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट यांच्यासोबतही आज सामंजस्य करार करण्यात आला.

राज्यात पर्यटनाच्या अमोघ संधी
मुख्यमंत्री ठाकरे पुढे म्हणाले की, कोरोनामुळे सध्या पर्यटनावर बंधने असली तरी विविध धोरणे ठरविणे आणि पर्यटनस्थळाच्या पायाभूत सुविधा-सेवांमध्ये वाढ करण्याबरोबर राज्याच्या पर्यटन विकासासाठी पर्यटन विभाग घेत असलेले निर्णय कौतुकास्पद आहेत. आपल्याकडचे पर्यटन वैभव जगासमोर नेणे आणि त्यात नवनवीन पर्यटनस्थळांची, नवनवीन बाबींची भर टाकणे गरजेचे आहे असल्याचे त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...