आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांचे निर्देश:उद्योगांचा कोविडविषयक टास्क फोर्स स्थापन करा; कंपन्यांच्या उत्पादनांवर परिणाम होऊ देणार नाही

मुंबई24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कंपनीच्या परिसरात कामगारांची व्यवस्था करा

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील उद्योग क्षेत्रासाठी देखील कोविडविषयक टास्क फोर्स स्थापन करावा. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री सचिवालयामार्फत याचे संनियंत्रण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी दिले. कोविड काळातदेखील उद्योगांचे अर्थचक्र सुरू राहावे, उत्पादनांमध्ये अडथळे येऊ नये यादृष्टीने व्यवस्था निर्माण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. कोविडकाळात उत्पादन न थांबवता उद्योगांचे व्यवहार सुरू राहिले, हे उदाहरण महाराष्ट्राने देशाला घालून द्यावे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी ऑक्सिजन उत्पादन, साठा यांचे नियोजन तसेच उद्योगांतील कामगार-कर्मचारी यांचे मोठ्या प्रमाणावर लसीकरण, निर्बंध कडक करावे लागले तरी आर्थिक चक्र सुरू ठेवणे, उत्पादनावर परिणाम होऊ न देणे, कामगारांची कंपनीच्या परिसरातील तात्पुरती फिल्ड निवास व्यवस्था, कामाच्या वेळा, कोविड प्रादुर्भाव होऊ न देणारी व्यवस्था (बायो बबल) यावर ठाकरे यांनी सीआयआयच्या पदाधिकाऱ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे चर्चा केली. या वेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, मुख्य सचिव सीताराम कुंटे, अतिरिक्त मुख्य सचिव आरोग्य डॉ. प्रदीप व्यास आदींची उपस्थिती होती.

या ऑनलाइन बैठकीत सीआयआयचे पदाधिकारी उदय कोटक, निरंजन हिरानंदानी, हर्ष गोयंका, सलील पारेख, नील रहेजा, अनंत गोयंका, बाबा कल्याणी, बी. त्यागराजन, जेन करकेडा, अनंत सिंघानिया, बनमाली अग्रवाल, निखिल मेसवाणी, अश्विन यार्दी, राकेष शहा, केशव मुरुगेश, भारत पुरी, असीम चरनिया, सुनील माथुर, संजीव सिंग, नौशाद फोर्बस, डी के सेन, सुलज्जा फिरोदिया मोटवाणी, शरद महिंद्रा, आदी उद्योगपती सहभागी झाले होते.

काही महिने तरी मास्क घालावाच लागेल
डेल्टाच्या नव्या उत्परिवर्तीत विषाणूमुळे अधिक काळजी घ्यावी लागणार असून अनेक देशांनी परत निर्बंध लावण्यास व काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. आणखी काही महिने तरी आपल्याला मास्क नियमित वापरणे, हात सातत्याने धूत राहणे, अंतर पाळणे व स्वच्छता ठेवणे याकडे काटेकोरपणे लक्ष द्यावे लागणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले.

कंपनीच्या परिसरात कामगारांची व्यवस्था करा
छोट्या-मोठ्या उद्योगांमध्ये कोविडपासून प्रभावित न होणारी बायो बबल यंत्रणा निर्माण करून त्या माध्यमातून आरोग्याचे नियम पाळून सुरक्षित उत्पादन सुरू ठेवता आले पाहिजे. काटेकोर निर्बंध लावावे लागले तर उत्पादनावर परिणाम होऊ नये म्हणून कामगारांच्या निवासासाठी कंपनीच्या परिसरात किंवा जवळपास फिल्ड निवास व्यवस्था उभारण्याच्या दृष्टीने नियोजन करावे, कामांच्या पाळ्या अशा रितीने निश्चित कराव्यात की, गर्दी होणार नाही व कुठल्याच सुविधेवर ताण येणार नाही हे पाहावे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...