आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई:अन्न कचऱ्यापासूननिर्मित विजेवर ‘इव्ही’ होणार चार्ज , देशातील पहिला अनोख्या प्रयोगाचे मुंबईत लोकार्पण

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘स्वच्छ - सुंदर मुंबई’साठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने सोमवारी एका अनोख्या उपक्रमाचा शुभारंभ केला. अन्न कचऱ्यापासून वीजनिर्मिती करणाऱ्या प्रकल्पाला इलेक्ट्रिक व्हेईकल फास्ट चार्जिंग स्टेशनची जोड देण्यात आली आहे. अशा स्वरुपाचे भारतातील हे पहिलेच चार्जिंग स्टेशन असून त्याचे लोकार्पण राज्याचे पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. ‘डी’ विभागातील केशवराव खाड्ये मार्गावर हा प्रकल्प सुरु करण्यात आला आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले की, फूड वेस्टमधून निर्मित विजेचा उपयोग करुन इलेक्ट्रिक व्हेईकल चार्ज करणारे भारतातील हे पहिलेच केंद्र आहे. अशा स्वरुपाचे केंद्र राज्यातही शक्य त्या ठिकाणी उभारण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. विशेषतः महामार्गांवर त्याचा प्राधान्याने विचार केला जाईल. त्यातून विद्युत वाहनांच्या वापराला चालना तर मिळेलच, सोबत सेंद्रिय, जैविक स्वरुपाच्या कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन देखील होईल, असे त्यांनी नमूद केले.

महानगरपालिकेचा ‘डी’ विभाग आणि एरोकेअर क्लीन एनर्जी यांच्या संयुक्त प्रयत्नातून हा प्रकल्प साकारला आहे. हाजी अली परिसरात केशवराव खाड्ये मार्गावर मीनाताई ठाकरे उद्यानाजवळ महापालिकेने टाकावू अन्नापासून (फूड वेस्ट) वीजनिर्मिती प्रकल्प उभा केला आहे. या प्रकल्पाचा शुभारंभ पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्तेच सप्टेंबर २०२१ मध्ये करण्यात आला होता. तेव्हापासून आतापर्यंत सुमारे दीड लाख किलोपेक्षा अधिक टाकावू अन्नपदार्थांवर प्रक्रिया करुन वीजनिर्मिती करण्यात आली.

माफक दरात होणार चार्जिंग
या प्रकल्पातून तयार होणारी वीज इलेक्ट्रिक व्हेईकलसाठी उपयोगात येणार आहे. या वीजनिर्मिती प्रकल्पाला जोडून इलेक्ट्रिक व्हेईकल फास्ट चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले आहे. त्याचे लोकार्पण देखील पर्यावरण मंत्री ठाकरे यांनी केले. या ठिकाणी चार्जिंगसाठी दोन पॉईंट आहेत, म्हणजेच एकावेळी दोन वाहने आणि तेही जलद गतीने चार्ज होवू शकतात. माफक दरात ही चार्जिंग सुविधा उपलब्ध असेल.

बातम्या आणखी आहेत...