आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहिला दिनानिमित्त महिला धोेरणावर बोलताना अमरावती जिल्ह्यातील तिवसा मतदारसंघाच्या काँग्रेस आमदार अॅड. यशोमती ठाकूर यांना सोमवारी (८ मार्च) विधानसभेत बोलताना चक्क रडू कोसळले. आपल्या पतीच्या निधनानंतर दोन्ही मुलांच्या नावे संपत्तीवर वारसा म्हणून नावे लावण्यासाठी मी गेली १८ वर्षे झगडत आहे. एका आमदाराची, एका माजी महिला मंत्र्याची हक्क मिळवताना अशी परवड हाेत असेल तर सामान्य महिलांचा संघर्ष किती कठीण आहे हे सांगताना त्यांना रडू कोसळले.
महिला दिनानिमित्त आज विधानसभेत इतर कामकाज बाजूला ठेवून महिला धोरणांवर सर्व महिला आमदारांना बोलण्याची संधी देण्यात आली. त्यामध्ये यशोमती ठाकूर बोलत होत्या. राज्यात महिलांची कशी परवड होत आहे, याचा पाढा ठाकूर यांनी वाचला. त्या म्हणाल्या की, महिला आयोगाचीच इथे कोंडी झाली आहे. राज्याच्या सर्व विभागांची कार्यालये चांगल्या ठिकाणी आहेत, पण, महिला आयोगाला मात्र पोटमाळ्यावर कार्यालय दिलेले आहे. मी मंत्री असताना आयोगाला कार्यालय मिळण्यासाठी बैठका घेतल्या. योगायोगाने माझ्या विभागाच्या सचिव महिलाच होत्या. तरी कार्यालयाचा प्रश्न सुटला नसल्याचे ठाकूर यांनी सांगितले. नागरी वस्तीत २ किमीवर महिलांसाठी स्वच्छतागृह हवे असे नियम आहेत. मात्र ते प्रशासन पाळत नसल्याचा आरोप त्यांनी केला. महिलांना प्रत्येक क्षेत्रात दुय्यम वागणूक दिली जाते, असा दावा ठाकूर यांनी केला. पुरुषांपेक्षा महिलांना कमी समजले जाते. पुरुष आमदारांपेक्षा अधिक संघर्ष करून आम्ही विधानसभेत येतो. मात्र महिला आमदारांना बोलण्याची संधी क्वचित मिळते. हात वरती करून थकतो, पण संधी मिळत नाही, असे ठाकूर म्हणाल्या. महिला आमदारांना बजेटचे काय कळते, असा समज असल्याने बजेटवर आमच्या प्रतिक्रिया घेतल्या जात नाहीत, असा दावा त्यांनी केला.
ठाकूर यांच्या अनुभवावर सभागृह झाले अवाक
माझ्या यजमानांचे निधन होऊन १८ वर्षे झाली. माझ्या मुलांच्या नावे अजूनही वारसा संपत्ती झालेली नाही. मी १८ वर्षे लढते आहे. आमदार, माजी मंत्री असून माझी ही स्थिती असेल तर सामान्य महिलांची काय अवस्था असेल, असा सवाल त्यांनी सभागृहाला केला. हे सांगताना ठाकूर यांचा कंठ दाटून आला. त्या लगेच सावरल्या. ठाकूर यांच्या या अनुभवावर सभागृह अवाक झाले. या चर्चेमध्ये प्रणिती शिंदे, सरोज अहिरे, माधुरी मिसाळ, गीता जैन, ऋतुजा लटके, वर्षा गायकवाड, लता सोनवणे, मंदा म्हात्रे या आमदारांनी महिला धोरणांवर मते मांडली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.