आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रवादी काँग्रेसचा नवा अध्यक्ष निवडण्यासाठी नेमलेल्या समितीच्या बैठकीच्या आधीच पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा मागे घ्यायचा निर्णय शरद पवार यांनी केला होता असे संकेत मिळाले आहेत. मात्र आपला उत्तराधिकारी आजच्या बैठकीतच ठरवा असा आग्रह त्यांनी केला होता. मात्र समिती सदस्यांनी केवळ त्यास संमती दर्शवून वेळ मारून नेली व पवारांना निर्णय मागे घ्यायला लावल्याची माहिती बैठकीस उपस्थित सूत्रांनी दिली.
शुक्रवारी राष्ट्रवादीच्या कार्यालयात समितीची बैठक झाली. यात नेमके काय झाले हे ‘दिव्य मराठी’ने काही उपस्थित सदस्यांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. एक सदस्य म्हणाले की, समितीच्या बैठकीला येतानाच खासदार प्रफुल्ल पटेल यांनी लिखीत स्वरुपात शरद पवार यांचा निरोप आणला होता. त्यात समितीने पुढे आपला उत्तराधिकारी कोण होईल, यावर निर्णय करून ठेवावा, असे पवार यांनी म्हटले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे केरळ प्रदेशाध्यक्ष पी. सी. चोको यांनीही समितीच्या सदस्यांना शरद पवार यांची ही इच्छा असल्याचे सांगितले. मात्र, आत्ता त्या विषयावर चर्चा नको. पुढे केव्हा तरी त्या विषयावर चर्चा करता येईल, असे सांगत ती चर्चा करण्याचा प्रस्ताव फेटाळला. शरद पवार यांनीच अध्यक्ष पदावर कायम राहावे, असा निर्णय करून समितीच्या सदस्यांनी पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना हा निर्णय सांगायचे, असे ठरविले आणि सर्व सदस्य ‘सिल्व्हर ओक’ बंगल्यावर गेले.
पुन्हा तोच आग्रह
दुसरे सदस्य म्हणाले की, पवार यांना समितीने एकमुखाने केलेला निर्णय सांगितला. त्यावर पवार यांनी समितीला आपला उत्तराधिकारी आत्ताच निवडला जावा, अशी आपली इच्छा असल्याचे सांगितले. आपल्याला त्या उत्तराधिकाऱ्याची मदत आवश्यक वाटते असे म्हणाले. मात्र, आत्ता त्याबाबत चर्चा नको. पुढे याबाबत समिती निर्णय घेईल असे सांगत पवार यांना पदावर कायम राहायची विनंती सर्व सदस्यांनी केली.
अजितदादाही म्हणाले, उत्तराधिकारी आताच ठरवा
अजित पवार या बैठकीत काय बोलले, अशी विचारणा केली असता ज्येष्ठ सदस्य म्हणाले की, ‘पवार साहेबांची इच्छा आहे, तिथे आपण काय करू शकतो? उत्तराधिकारी आताच ठरवावा या त्यांच्या मताशी आपण सहमत आहोत; पण शेवटी तो केव्हा ठरवायचा हेही तेच ठरवतील, अशा अर्थाचे एकच विधान अजित पवार यांनी केले.’
सकाळपासून राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयाबाहेर कार्यकर्ते, नेत्यांनी गर्दी केली होती. पक्षाच्या युवक व युवती आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते. भिवंडी तालुका अध्यक्ष अजिज झा याने अंगावर राॅकेल ओतून आत्मदहानाचा प्रयत्न केला. निवड समितीची बैठक चालु असताना कार्यालयाबाहेर शरद पवार यांच्या जयजयकाराच्या घोषणा दिल्या जात होत्या. पवार यांनीच अध्यक्ष राहावे, असा ठराव होताच कार्यालयाबाहेर जल्लोष झाला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.