आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेतकऱ्यांपर्यंत मदत:सोमवारपासून थेट खात्यात मिळेल अतिवृष्टीची भरपाई, वडेट्टीवारांची घोषणा, 5 हजार 500 कोटींची तरतूद

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मराठवाड्यात 4.99 लाख हेक्टरवरील शेतीचे नुकसान

आॅक्टोबर महिन्यात राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या व घरांच्या नुकसानीची भरपाई येत्या सोमवारपासून दिली जाईल, अशी माहिती राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांना दिली. अतिवृष्टीच्या भरपाईसाठी राज्याने एकूण १० हजार काेटींची तरतूद केली आहे. त्यापैकी ५ हजार ५०० कोटी शेती व शेतघरे, पशुधन, मृतांचे वारस यांच्यासाठी वापरण्यात येणार आहेत.

सणासुदीला शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी राहू नये म्हणून दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांपर्यंत मदत देण्यात येणार आहे. राज्यात सध्या विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या ५ जागांच्या निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू झाली आहे. मात्र आपत्तीच्या मदत वाटपाला आचारसंहितेची अडचण नसते. यापूर्वी आपद्ग्रस्तांना मदतीचे वाटप आचारसंहितेच्या काळात झालेले आहे. त्यासंदर्भातली परवानगी निवडणूक आयोगाकडून घेतली जाईल, असे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

राज्याचे केंद्राकडून तब्बल ३८ हजार कोटी रुपये येणे बाकी आहे. अतिवृष्टीच्या भरपाईचे पैसे देण्यासंदर्भात केंद्र सरकारला आम्ही तीन पत्रे पाठवली आहेत. मात्र, अद्याप केंद्राने पैसे देण्यासंदर्भात काहीच कळवले नाही. राज्यातील शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही, दिवाळीपूर्वी अतिवृष्टीतील सर्व आपदग्रस्तांना मदत पोहोचवू, असे मंत्री वडेट्टीवार यांनी सांगितले.

जिरायत, बागायतच्या नुकसान भरपाईसाठी प्रति हेक्टरी १० हजार रुपये (२ हेक्टरच्या मर्यादेत)तर फळ पिकांच्या भरपाईसाठी प्रति हेक्टर २५ हजार रुपये (२ हेक्टरच्या मर्यादेत) तसेच पशुधन, शेतघरे व मृतांच्या वारसांना भरीव मदत करण्यात येणार आहे. त्यासंदर्भातली घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून यापूर्वीच करण्यात आली होती.

मराठवाड्यात ४.९९ लाख हेक्टरवरील शेतीचे नुकसान
मराठवाड्यातील ४ लाख ९९ हजार हेक्टर, तर पश्चिम महाराष्ट्रात ५७ हजार हेक्टर शेती अतिवृष्टीत उद्ध्वस्त झाली आहे. विदर्भ, कोकण व उत्तर महाराष्ट्रातील शेतीला फटका बसला आहे.