आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहात्मा गांधींच्या हत्येच्या हत्याराचे धागेदोरे काँग्रेसपर्यंत पोहचतात, असा दावा स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांनी पु. ल. इनामदारांच्या पुस्तकाचा दाखला देत केला आहे.
गांधी हत्येच्या खटल्यातून वीर सावरकर निर्दोष सुटले. आजही याबाबत चौकशी करता येऊ शकते, असे आव्हानही सावरकर यांनी दिले. दिव्य मराठीला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी आपली मते रोखठोक मांडली.
प्रश्न - तुषार गांधी यांनी थेट आरोप केले की महात्मा गांधींची हत्या करण्यासाठी नथुराम गोडसेला सावरकरांनी बंदूक पुरवली?
- महात्मा गांधी हत्या प्रकरणात तत्कालीन सरकारने ग्वाल्हेरचे डॉ. परचुरे याला आरोपी बनवले होते. जगदीश गोयल नावाच्या शस्त्र व्यापाऱ्याकडून डॉ. परचुरेने पिस्तूल विकत घेऊन नथुराम गोडसेला दिले, असा आरोप त्याच्यावर होता. या संपूर्ण खटल्याबाबत डॉ. परचुरेचे वकील पु. ल. इनामदार यांनी न्यायालयात जे काही तथ्य मांडले त्यावर “लाल किल्ल्यातील अभियोगाची कहाणी” असे पुस्तक लिहिले आहे.
इनामदारांनी पुस्तकात लिहिले आहे की, जगदीश गोयलचे दहावीपर्यंतही शिक्षण झाले नव्हते. तो अस्थायी कर्मचारी होता. मग त्याच्याकडे एवढे भारी पिस्तूल कसे येईल? त्याच्या साक्षीतही त्याने पिस्तूल कसे मिळाले, याचा कुठेही खुलासा केलेला नाही. त्यावेळी पोलिसांनी जगदीश गोयलच्या जबानीच्या आधारे नथिलाल जैन याला अटक केली होती. नथिलाल जैन हा काँग्रेसच्या एका मंत्र्याचा मेहुणा होता.
त्यावेळी पोलिसांनी आरोपींच्या वकिलाला दिलेल्या माहितीत नथिलाल जैन आणि ग्वाल्हेरचे तत्कालीन काँग्रेस गृहमंत्री यांची नावे होती. या दोघांनाही लाल किल्ल्यात आणून ठेवले होते. मात्र, या दोघांना कधीच न्यायालयात हजर करण्यात आले नाही. अशाप्रकारे गांधी हत्येचे तार काँग्रेस नेत्याशी जोडले जात असताना पोलिसांनी नथिलाल जैन याचा कोणताही जबाब नोंदवला नाही.
हत्येत वापरलेल्या पिस्तुलाबाबत पोलिसांनी जाणीवपूर्वक योग्य तपास केला नाही, असे इनामदार यांनी पुस्तकात स्पष्टपणे नमूद केले आहे. महात्मा गांधी हत्येशी संबंधित सर्व कागदपत्रे आजही उपलब्ध आहेत. त्यामुळे आजही या प्रकरणाची चौकशी होऊ शकते. यावर गांधीजींच्या पणतूंनी स्वतः अधिक अभ्यास केला पाहिजे.
प्रश्न - तुषार गांधींनी आरोप केला आहे की, महात्मा गांधींच्या हत्येच्या दोन दिवसांपूर्वी गोडसेने सावरकरांची भेट घेतली होती. यावर काय म्हणाल?
- तुषार गांधी अनेक वर्षांपासून वीर सावरकरांवर कोणतेही पुरावे नसताना खोटे आरोप करत आहेत. तुषार गांधींबद्दल मला वैयक्तिक काहीही बोलायचे नाही, पण मला त्यांच्या खोट्या आरोपांना उत्तर द्यायचे आहे. मदनलाल पाहवा याने 20 जानेवारीला स्फोट घडवून आणला होता. या घटनेनंतर 21 जानेवारीपासून सावरकरांवर पोलिसांची सतत नजर होती. पोलिसांच्या रेकॉर्डनुसार, स्फोटाच्या या घटनेनंतर सावरकर एकाही आरोपीला भेटले नाहीत. याचे कागदोपत्री पुरावेही आहेत, हे तथ्य असूनही नथुराम गोडसेने महात्मा गांधींच्या हत्येच्या दोन दिवस आधी सावरकरांची भेट घेतली आणि सावरकरांनी गोडसेला बंदूक दिली होती. हा आरोप करणे म्हणजे खोटेपणाचा कळस आहे.
प्रश्न - महात्मा गांधी हत्या प्रकरणात स्वातंत्र्यवीर सावकरांचे नाव जोडले जाते, त्यांची निर्दोष मुक्ततादेखील झाली. याकडे तुम्ही कसे पाहता?
- गांधी हत्येमध्ये सावरकरांचे नाव समाविष्ट करणे हा काँग्रेसचा राजकीय खेळ होता. कारण 1946 च्या निवडणुकीत हिंदू महासभेला 16 टक्के मते मिळाली होती. तेव्हा हिंदू महासभा हा मोठा पक्ष होता. गांधी हत्येचा फायदा घेऊन त्यात सावरकरांना अडकवून नेहरूंनी हिंदू महासभा संपवली. सावरकरांच्या संपूर्ण राजकारणालाच सुरूंग लावला, असे असूनही या प्रकरणामध्ये सावरकर निर्दोष सुटले. सत्र न्यायाधीशांनी सावरकरांची निर्दोष मुक्तता केली. तेव्हा त्यांच्याविरुद्ध अपील करण्याचा पर्याय सरकारपुढे होता, पण सरकारने अपील केले नाही. कारण न्यायालयाने त्यावेळी सावरकरांच्या विरोधात पुरावे नसल्याचे स्पष्टपणे सांगितले होते. नेहरूंच्या कार्यकाळात जे घडले ते आजही घडत आहे. राजकीय फायद्यासाठी सावरकरांवर बिनबुडाचे आरोप केले जात आहेत.
प्रश्न - स्वातंत्र्यवीर सावरकर आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावरून जे काही वाद होतात, त्यात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर टीका केली जाते. दोघांनीही देशासाठी मोठे योगदान दिले. त्यामुळे असे वाद होऊच नये यासाठी काय करावे लागेल, असे तुम्हाला वाटते?
- मी आजपर्यंत पंडित नेहरूंबद्दल वैयक्तिक काहीही बोललो नाही. कारण ज्यांचे निधन झाले आहे त्यांच्याबद्दल बोलू नये, अशी एक पद्धत आपल्याकडे आहे. पण काँग्रेस वारंवार सावरकरांच्या विरोधात भाष्य करत आहे. त्यांना देशद्रोही म्हणत आहे. मग नेहरूंनी पंतप्रधान असताना कोणत्या चुका केल्या? याबाबत मी प्रतिक्रिया दिली मला कोणावर वैयक्तिक चिखल फेक करण्याची किंचितही हौस नाही, पण हे लोक सावरकरांवर जे आरोप करत आहेत त्यांना उत्तर देण्याची जबाबदारी माझी आहे. सावरकरांनी समाजसुधारकाचे कार्य केले आहे. त्यांनी अस्मिता निर्माण केली. विज्ञाननिष्ठा रुजवली, अशी अनेक कामे केली. त्यांच्या या सकारात्मक पैलूवरही चर्चा व्हायला हवी.
कुत्र्याची शेपटी नेहमीच वाकडी असते. ही जुनी म्हण आहे. राहुल गांधींनी एकदा आरोप केले, त्यानंतर तुषार गांधी पुन्हा आरोप करत आहेत. या दोन्ही लोकांना आम्ही उत्तर दिले आहे. सहा महिन्यांनंतर हे लोक पुन्हा काही आरोप करतील, अशी शक्यता आहे. त्यामुळे महापुरुषांबद्दल असे वाद होऊ नयेत म्हणून सरकारने स्वतः कायदा करावा असे मला वाटते. जर कोणी महापुरुषावर खोटे आरोप केले तर त्याच्यावर तत्काळ फौजदारी गुन्हा दाखल करून त्याला शिक्षा झाली पाहिजे.
प्रश्न - स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी तुम्ही काय करत आहात?
- सावरकरांच्या विचारांवर चालणारा प्रत्येक माणूस सावरकरांचे कुटुंब आहे. सावरकर स्मारकाच्या माध्यमातून सावरकरांचे विचार आणि कार्य पुढे नेण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील आहोत.
हिंदू समाज संघटित झाला पाहिजे. हे सावरकरांचे मुख्य उद्दिष्ट होते. जोपर्यंत हिंदू समाज बहुसंख्य आहे, तोपर्यंत या देशात धार्मिक स्वातंत्र्य असेल. पाकिस्तान आणि बांगलादेश भारतापासून तुटून वेगळे देश बनले आणि आज तेथे हिंदूंची संख्या नाममात्र उरली आहे. तेथे धार्मिक स्वातंत्र्य नाही. हे दोन्ही देश इस्लामीकरणाकडे वाटचाल करत आहेत. त्यासाठी हिंदू समाजाने संघटित राहिले पाहिजे. त्याला शिक्षण मिळाले पाहिजे. विज्ञानाच्या दृष्टिकोनातून पुढे जायला हवे.
सावरकर स्मारक दोन स्तरावर काम करते. स्मारकाजवळ राहणाऱ्यांसाठी क्रीडा आणि कला क्षेत्रातील उपक्रम चालतात. क्रीडा क्षेत्रात येथे रायफल शूटिंग, बॉक्सिंग, तिरंदाजी, तलवारबाजीचे प्रशिक्षण दिले जाते. आमच्या स्मारकातील अनेक खेळाडू या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले आहेत. सावरकरांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी आम्ही ‘हे मृत्युंजय’ हे नाटक हिंदी आणि मराठी भाषेत लोकांना दाखवतो. हे नाटक सावरकर आणि इतर क्रांतिकारकांना अंदमानच्या तुरुंगात ज्या यातना सहन कराव्या लागल्या त्यावर आधारित आहे. अशी अनेक कामे सावरकर परिवार आणि त्यांच्या विचारांवर चालणाऱ्या लोकांच्या वतीने देशभरात केली जात आहेत.
प्रश्न - वैयक्तिक आयुष्य, सावरकर कुटुंबाबाबत...
- सावरकर कुटुंबात माझा जन्म झाला हे माझे भाग्य आहे. मी लहानपणापासून वीर सावरकरांचे साहित्य वाचत आलो आहे. माझे आजोबा नारायण सावरकर हे वीर सावरकरांचे धाकटे बंधू होते. ते देखील क्रांतिकारी होते आणि त्यांनाही अनेकदा शिक्षा झाली होती.
प्रश्न - मुरबाडला सैनिक शाळा आहे, तेथे कसे वळालात?
- देशातील सर्व तरुणांना सैनिक प्रशिक्षण मिळाले पाहिजे, अशी वीर सावरकरांची भूमिका होती. यासाठी माझे वडील विक्रम सावरकर यांनी १९९३ मध्ये महाराष्ट्र मिलिटरी स्कूल नावाची संस्था सुरू केली. दुर्दैवाने त्यावेळी तत्कालीन विश्वस्त चित्रा देवधर यांचे अपघाती निधन झाले. त्यामुळे शाळेच्या व्यवस्थापनाची जबाबदारी मला घ्यावी लागली. या शाळेची जबाबदारी मी 1997 पासून सांभाळत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.