आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसेना पक्ष व धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह आता शिंदे गटाकडे निवडणूक आयोगाने सोपवले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या पक्षाचे मुख्य नेते आहेत. त्यामुळे आता ठाकरे गटाच्या ताब्यात असलेले शिवसेना भवन, सर्व शाखा व पक्षाचा संपूर्ण निधी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाकडे सोपवण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका अॅड. आशिष गिरी यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. ‘आपण कोणत्याही पक्षाचे किंवा गटाचे नाहीत. एक मतदार म्हणून आपण ही याचिका केली आहे. न्यायालयानेही ती दाखल करून घेतली आहे. आता शिवसेनेशी संबंधित याचिकेसोबतच या याचिकेवरही सुनावणी घ्यावी, या खटल्याचा निकाल लागेपर्यंत निधी खर्च करण्यास मनाई करण्यात यावी, अशी मागणीही गिरी यांनी केली आहे.
हे तर ठाकरे गटाचेच कारस्थान; शिंदेंच्या प्रवक्त्यांचा आरोप
शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के म्हणाले, अॅड. गिरी यांचा व त्यांच्या याचिकेशी शिवसेनेचा काहीही संबंध नाही. आम्ही कधी शिवसेना भवन वा पक्षनिधीवर दावा करणारे नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आधीच स्पष्ट केले आहे.ते या भूमिकेवर ठाम आहेत. शिंदेंच्या अयोध्या दौऱ्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला त्यामुळे ठाकरे गट व आघाडीत अस्वस्थता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर अशी याचिका दाखल करायला लावून उद्धव ठाकरे व महाविकास आघाडीला सहानुभूती मिळवण्यासाठी ठाकरे गटानेच हा कट रचला असू शकतो, असा आरोपही म्हस्के यांनी केला आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.