आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ:राज्यातील कोविड केंद्रात महिलांच्या सुरक्षिततेसाठी एसओपी तयार करावी, फडणवीसांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कांदा निर्यातबंदी मागे घ्या; फडणवीसांचे केंद्राला पत्र

राज्यातील कोविड सेंटर आणि इतरही ठिकाणी महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून महिला सुरक्षेच्या विषयात राज्य सरकारचे दुर्लक्ष होत आहे. सरकारने हा विषय गांभीर्याने घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात. तसेच कोविड आणि क्वारंटाईन केंद्रात महिला सुरक्षेचे सुनिश्चित कार्यपद्धती (एसओपी) तातडीने तयार करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे बुधवारी केली आहे.

राज्यातील महिलांवर वाढलेले अत्याचार, त्यांच्या सुरक्षेसाठी करावयाच्या आवश्यक उपाययोजना इत्यादींबाबत यापूर्वी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी पत्रव्यवहार केला होता आणि एसओपी तयार करण्याची मागणी केली होती. पण, त्यासंदर्भात अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही, त्यामुळे हे पुन्हा पत्र फडणवीस यांनी पाठविले आहे.याबाबत कोणतेही खबरदारी घेताना राज्यातील सरकार दिसत नाही. अन्य विषयांवर हिरीरीने बोलणारे, दिवसांतून अनेक वेळा टीव्हीवर येणारे चेहरे या विषयांवर साधा निषेध करताना सुद्धा दिसून येत नाही, हे आजचे वास्तव आहे. असंवेदनशीलतेचा हा कळस आहे, असेही त्यांनी या पत्रात म्हटले आहे.

फेब्रुवारी २०२० मध्ये महिला/युवतींना जाळून मारण्याच्या किमान ७ घटना घडल्या होत्या. हिंगणघाट, सिल्लोड, पनवेल, मिरारोड, लातूर, नागपूर, लासलगावांत या घटना घडल्या होत्या. पुढे दिशा कायद्याची चर्चा माध्यमांमध्ये घडविली गेली आणि कालांतराने तो प्रस्ताव थंड बस्त्यात टाकला गेला. पनवेल क्वारंटाईन सेंटरमध्ये बलात्कार (१७ जुलै), सिंहगड क्वारंटाईन सेंटरमध्ये सुरक्षा रक्षकाकडून विनयभंग (२० जुलै), पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये वॉर्डबॉयकडून विनयभंग, क्वारंटाईन सेंटरमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग (२० जुलै), इचलकरंजी क्वारंटाईन सेंटरमध्ये विनयभंग (१५ मे), नंदूरबारमध्ये वॉर्डबॉयकडून विनयभंग, चंद्रपूरच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये युवतीचा विनयभंग, मालाड येथे क्वारंटाईन सेंटरमध्ये विनयभंग, मिरा-भाईंदर येथील कोविड सेंटरमध्ये महिलेवर बलात्कार, मानखुर्द येथील अल्पवयीन मुलीचा विनयभंग, बडनेरा येथे शासकीय लॅबमध्ये महिलेच्या गुप्तांगाचा स्वॅब घेणे अशा अनेक घटना यापूर्वीच्या पत्रात नमूद करण्यात आल्या होत्या.

मात्र, त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही, हे दुर्दैवाने नमूद करावे लागेल. कोणतीही घटना झाली तरी केवळ आरोपीला अटक करून चालणार नाही, असेही ते म्हणाले.

कांदा निर्यातबंदी मागे घ्या; फडणवीसांचे केंद्राला पत्र

कांदा निर्यात बंदीचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्यानंतर महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटत आहेत. या मुळे भाजपमध्येही खळबळ उडाली. भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय व्यापार आणि वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांना पत्र लिहून कांदा निर्यात बंदी मागे घेण्याची मागणी केली आहे. कांदा निर्यात बंदी उठवण्याबाबत महाराष्ट्रातील कांद्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी मागणी असते. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना त्यामुळे चांगली मिळकत होते. निर्यात बंदी घातल्यामुळे शेतकरी वर्ग प्रचंड नाराज असून दु:खी झाला आहे. त्यामुळे आपण लवकरच योग्य निर्णय घ्याल, ही आशा आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी गोयल यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.