आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्री शिंदेंच्या जिल्ह्यातून 2 हजारांच्या बनावट नोटा जप्त:आरोपींकडे सापडले तब्बल 400 बंडल, जवळपास 8 कोटी किंमत

5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बनावट नोटा हद्दपार करण्यासाठी केंद्र सरकारने नोटाबंदी केली. मात्र, या निर्णयाच्या 6 वर्षांनंतर बनावट नोटांचा पुन्हा सुळसुळाट झाल्याचे दिसत आहे.

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातूनच तब्बल 8 कोटींच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. ठाणे शहर पोलिसांनी ही कारवाई केली.

कासारवडवलीत कारवाई

ठाणे पोलिसांनी कासारवडवली येथून दोन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून 2000 च्या बनावट नोटांची तब्बल 400 बंडलं जप्त करण्यात आली आहेत. या बनावट नोटांची बाजारातील किंमत जवळपास 8 कोटी रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी या सर्व बनावट नोटा बाजारात चलनात आणणार होते. जवळपास सर्वच नोटा 2 हजारांच्या आहेत. राम शिंदे आणि राजेंद्र राऊत अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. दोघेही पालघरमधील राहणारे आहेत. पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली असली तरी याप्रकरणाचा मास्टर माईंड कुणीतरी वेगळा आहे आणि त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

अन्य आरोपींचा शोध

ठाण्यात बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती ठाणे पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी कारारवडवली येथे छापा टाकला असता दोन्ही आरोपींकडे 2,000 रुपयांच्या बनावट नोटा असल्याचे आढळून आले. या प्रकरणातील अन्य आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत. आरोपींविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 489 (ए), 489 (ब), 489 (सी) आणि 34 अंतर्गत कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोठे रॅकेट

दरम्यान, आरोपींनी या बनावट नोटा कोठे छापल्या, याचा शोध पोलिस घेत आहेत. यामागे मोठे रॅकेट असल्याचा संशयही पोलिसांनी व्यक्त केला आहे. दोघांच्या चौकशीमधून आणखी माहिती मिळण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...