आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
केंद्राच्या तीन कृषी कायद्यांना विरोध आणि दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनासाठी राज्यातील डाव्या आणि पुरोगामी पक्ष-संघटनांनी सोमवारी काढलेल्या मोर्चाने राजधानी मुंबई दणाणली. मात्र शेतकऱ्यांच्या मोर्चाकडे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पाठ फिरवली. राज्यभरातून आलेल्या शेतकऱ्यांच्या मोर्चाचे आझाद मैदानावर सभेत रूपांतर झाले. या सभेनंतर २२ शेतकरी नेत्यांचे शिष्टमंडळ राज्यपालांना निवेदन देण्यासाठी राजभवनाकडे निघाले होते. मात्र राज्यपाल निवेदन स्वीकारणार नसल्याचे समजताच शेतकरी नेत्यांनी निवेदन जाहीरपणे फाडून संताप व्यक्त केला. दरम्यान, महाविकास आघाडीतील काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते हजर असताना शिवसेनेचा एकही मंत्री अथवा नेता मोर्चात सहभागी झाला नाही.
तत्पूर्वी दुपारी ३ वाजता शेवटचे शरद पवार यांचे भाषण संपले. त्यानंतर मोर्चेकरी आझाद मैदानातून मलबार हिल येथील राजभवनकडे निघाले. मेट्रो सिनेमाजवळ पोलिसांनी मोर्चा अडवला. शेवटी विविध संघटनांच्या २२ प्रतिनिधींचे शिष्टमंडळ राजभवनकडे जाईल, असे ठरले. त्यामध्ये अशोक ढवळे, किशोर ढमाले, भाई जयंत पाटील, नसीम खान, अबू आझमी, अजित नवले यांचा समावेश होता. मात्र निवेदन राज्यपाल यांचे प्रधान सचिव स्वीकारतील, असे त्यांना समजताच शिष्टमंडळ पोलिसांच्या गाड्यांतून उतरले व त्यांनी निवेदन जाहीरपणे फाडून निषेध व्यक्त केला.
कंगनाला भेटायला राज्यपालांना वेळ; पण शेतकऱ्यांसाठी नाही : शरद पवार
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी जोरदार हल्लाबोल केला. अभिनेत्री कंगनाला भेटण्यासाठी राज्यपालांना वेळ आहे, मात्र शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही. राज्यपालांना नैतिक जबाबदारीचे भान नसून मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाला भेटण्याची त्यांनी सभ्यता दाखवली नाही, या शब्दांत पवार यांनी कोश्यारी यांचे वाभाडे काढले. सोमवारी आझाद मैदानावर राज्यातील विविध पक्ष व शेतकरी संघटनांच्या संयुक्त मोर्चात ते बोलत होते. दिल्लीत ६० दिवस शेतकरी थंडी, वाऱ्यात आंदोलन करत आहेत. पण, पंतप्रधान त्यांचा साधा उल्लेखही करत नाहीत. पंजाब, हरियाणा व पूर्वोत्तर भारतातला शेतकरी देशाला लागणारे एक तृतीयांश अन्नधान्य पिकवतो. त्यांची नालस्ती करणाऱ्या केंद्र सरकारचा आपण निषेध करत असल्याचे पवार म्हणाले.
राजभवनचा खुलासा
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २५ जानेवारी रोजी गोवा विधानसभेच्या प्रथम सत्राला संबोधित करणार असल्याने शेतकरी शिष्टमंडळास भेटू शकणार नाहीत. राज्यपालांचे प्रधान सचिव संतोषकुमार निवेदन स्वीकारतील, असे प्रकाश रेड्डी व धनंजय शिंदे यांना लेखी पत्राद्वारे २४ जानेवारी रोजी कळवले होते. त्यामुळे वेळ देऊन भेट दिली नाही, हे वृत्त चुकीचे आहे, असा खुलासा राजभवनने केला आहे.
माेर्चेकऱ्यांचा आराेप...
१२ वाजून ४६ मिनिटांनी राज्यपालांचे गाेव्याच्या विधिमंडळातील अभिभाषण संपले. ते पाच वाजेपर्यंत मुंबईला येऊ शकले असते. पण ते आले नाही, असा आरोप मोर्चेकऱ्यांचा आहे. राज्यपाल मुंबईत रात्री ७ वा.पोचणार होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.