आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविश्लेषणात्मक लेखनशैलीचा आयाम मराठी क्रीडा पत्रकारितेमध्ये रुजवणारे आणि मराठी दैनिकांमध्ये क्रीडा पान ही संकल्पना प्रथम राबवणारे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार, संपादक, समीक्षक आणि लोकप्रिय समालोचक विष्णू विश्वनाथ तथा वि. वि. करमरकर यांचे सोमवारी (६ मार्च) अंधेरी येथे निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. करमरकर अविवाहित होते. गेल्या आठवड्यात प्रकृती खालावल्याने त्यांना खासगी शुश्रूषागृहात दाखल करण्यात आले. तेथे सोमवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. करमरकर यांच्या पार्थिवावर अंधेरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
करमरकर मूळचे नाशिकचे. अर्थशास्त्रात एम.ए. करत असताना करमरकरांनी क्रीडा पत्रकारितेची वेगळी वाट निवडली. १९६० च्या आधी मराठी दैनिकांमध्ये खेळांच्या बातम्यांना प्रमुख स्थान नव्हते. ते करमरकर यांनी मिळवून दिले. करमरकर यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे कालांतराने संपूर्ण पान खेळांच्या बातम्यांसाठी मिळाले. खेळांची आवड असणाऱ्या पत्रकारांना यामुळे पूर्णवेळ नोकऱ्या उपलब्ध झाल्या. परिणामी खेळ, खेळाडू, संस्था, क्रीडा संघटक आणि कार्यकर्ते यांच्या सततच्या प्रयत्नांची धडपड ठळकपणे लोकांसमोर आली. विदर्भातील कबड्डी स्पर्धांना त्यांनी मुंबईत प्रसिध्दी दिली, त्यामुळे विदर्भातील प्यारेलाल पवार यांना महाराष्ट्र ओळखू लागला. राज्यभरात ताकदीच्या क्रीडा संघटना आणि कार्यकर्ते तयार झाले. क्रिकेटसोबत खो-खो, कबड्डी, कुस्ती या देशी खेळांना आंतरराष्ट्रीय करण्यात त्या-त्या संस्थांसह करमरकर यांच्या मार्गदर्शक लेखणीचा खूप मोठा वाटा आहे. इतर खेळांच्या तुलनेत खो-खो हा वेगवान खेळ खूप मागे पडतोय हे लक्षात येताच त्यांनी या खेळाला आर्थिक पाठबळ मिळवून देण्यात मोठा वाटा उचलला. स्पर्धांच्या ‘इव्हेंटीकरणा’चा त्यांना तिटकारा होता. क्रिकेटमध्ये आपण प्रगती करत असलो, तरी ते विश्व खूप छोटे आहे. याउलट ऑलिम्पिक आणि आशियाई स्पर्धांमध्ये कामगिरीच्या निकषांवर आपण छोट्यात छोट्या आणि गरीब देशांपेक्षा कितीतरी मागे आहोत, हे त्यांनी सतत मांडले. त्यांचे स्तंभ त्यांतील परखड, चिकित्सक लिखाणामुळे वाचकप्रिय बनले धावफलक, चौकार, षटकार, धावचीत, यष्टिचीत असे अनेक शब्द करमरकरांच्या प्रयत्नांमुळे क्रिकेट वृत्तामध्ये दिसू लागले. आकाशवाणी समालोचक म्हणूनही ते लोकप्रिय बनले. त्यांच्या निधनाने क्रीडा पत्रकारितेतीलच नव्हे, तर क्रीडा क्षेत्रातील एका युगाचा अंत झाला, अशी भावना म्हणूनच व्यक्त होत आहे.
सुरेश कलमाडींची पोलखोल ▪️ १९९३ मध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा पुणे येथे आयोजित करण्यात आली होती, या स्पर्धेच्या निमित्ताने महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये क्रीडा स्पर्धांचे आयोजन करावे, अशी क्रीडा संघटकांची मागणी होती. त्यामुळे अनेक शहरांमध्ये पायाभूत सुविधा निर्माण होतील ही क्रीडा संघटकांची इच्छा त्यांनी व्यक्त केली हाेती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.