आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘फादर्स डे’:...तेव्हा ते फक्त माझे बाबाच असतात! वेगळा काहीतरी ‘सुप्पर’ असा फील कधीच आला नाही

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ‘फादर्स डे’निमित्त सुप्रिया सुळे यांनी उलगडले बापलेकीच्या नात्यातील हळुवार पदर

खासदार सुप्रिया सुळे

मला जेव्हा बाबांच्या बाबतीत लिहायला सांगितलं जातं तेव्हा नेमकं काय लिहायचं हा प्रश्न माझ्यापुढे उभा राहतो. कारण माझ्या आणि बाबांच्या नात्यामध्ये इतर कोणत्याही बापलेकीच्या नात्याप्रमाणे कुठलाच कृत्रिमपणा नाही. जे कुठल्याही मुलीला तिच्या बापाबद्दल प्रेम, माया व आपुलकी असते तशीच ती मलाही वाटते. ज्याप्रमाणे इतरांना आपल्या वडिलांच्या प्रमोशनचा आनंद होतो किंवा जेवढं त्याचं महत्त्व असतं तसंच ते आम्हालाही वाटत राहिलं. वेगळा काहीतरी ‘सुप्पर’ असा फील कधीच आला नाही. याचं मुख्य कारण असं की, बाबांनी आम्हाला नेहमीच त्यांच्या पदांपासून लाभलेल्या वलयापासून दूर ठेवलं. बाबा माझ्या शाळेतही येत असत, पण सामान्य पालकांप्रमाणेच... माझ्या शाळेत त्यांनी माझ्या बहुतेक सर्व कार्यक्रमांना हजेरी लावली आहे. बाहेरच्या जगासाठी ते मुख्यमंत्री वगैरे असले तरी जेव्हा ते माझ्यासाठी शाळेत येत असत तेव्हा ते केवळ सुप्रियाचे बाबा असत. बापलेकीचं नातं एवढं सहज आहे. त्यात वेगळं काही नसेल तर सांगायचं काय, असा प्रश्न मला नेहमी पडतो.

बाबांना सगळ्याच बाबतीत मोठी मोठी विशेषणे दिली जातात, पण ते जेव्हा माझे बाबा असतात तेव्हा फक्त ते माझे बाबाच असतात. असं नाही की आमच्यात मतभेद होत नाहीत... होतात... पण तेदेखील चहाच्या पेल्यातल्या वादळासारखे... आम्ही आमचे मतभेदही मांडले. कोणत्याही बाप आणि मुलीच्या नात्यात असणारा स्वाभाविकपणा आमच्याही नात्यात आहे. आमच्या दोघांच्या नात्यांमध्ये ते माझे ‘बाबा’ आणि मी त्यांची ‘मुलगी’ आहे.

आपण कितीही मोठे झालो तरी आपल्या आई-वडिलांसाठी आपण लहानच असतो. आजही दिल्लीत माझ्या खासदार मैत्रिणी किंवा अगदी केंद्रात मंत्री असलेल्या मैत्रिणींबरोबर मी बाहेर पडते तेव्हा ते आमच्याकडे गाडी-ड्रायव्हर आहे का? पुरेसे पैसे बरोबर आहेत का? आम्ही कुठे जाणार आहोत? अशी चौकशी करत असतात. आपल्या मुलीसाठी कोणत्याही बापाचं मन असं हळवं असतं.. असे हे माझे बाबा मित्र आणि नाती जपणारे आहेत. ज्याप्रमाणे प्रत्येक मुलीसाठी त्यांचे वडील एक मित्र व मार्गदर्शक असतात तसेच ते माझेही आहेत. त्याही पलीकडे ते माझ्यासाठी आदर्श आहेत....

आजही आमच्यासाठी कपडे घेतात...

बाबा आजही आमच्यासाठी कपडे खरेदी करतात. त्यांना साड्यांची उत्तम पारख आहे. आजही त्यांच्या नातवंडाच्या बर्थडे गिफ्ट ते स्वतः निवडतात. अतिशय व्यस्त शेड्यूलमधून ते नातवंडांसाठी वेळ काढतात. नातवंडांना जेव्हा आजोबा हवे असतात तेव्हा ते त्यांना भेटतातदेखील.... बाबांनी आपल्या अतिशय व्यग्र लाइफस्टाइलमधून नातवंडांसाठी हा हळुवार कप्पा जपला आहे तो असा...

(सुप्रिया सुळेंच्या ब्लॉगवरून साभार)

बातम्या आणखी आहेत...