आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
युरोपातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर राज्यातही जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याची भीती राज्याच्या आरोग्य सेवा संचालनालयाने व्यक्त केली आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी राज्यातील प्रत्येक शहर-गावांमध्ये खरेदीसाठी उसळलेली गर्दी पाहता या संभाव्य लाटेचा मुकाबला करण्यासाठी राज्याचा सार्वजनिक आरोग्य विभाग सध्या युद्धपातळीवर पूर्वतयारी करत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी दहा लाख लोकसंख्येच्या मागे दररोज १४० तपासण्या करण्याच्या सूचना जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) केल्या आहेत. डब्ल्यूएचओच्या या सूचनांची अंमलबजावणी करण्याचे आदेश आरोग्य सेवा संचालनालयाने जारी केले आहेत.
सध्या आॅक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून कोविड रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. पण जागतिक स्तरावरील कोविडच्या उद्रेकाचे प्रमाण लक्षात घेता युरोपमधील अनेक देशांमध्ये कोविडची दुसरी लाट आलेली दिसून येते. युरोपियन देशांच्या उदाहरणावरून राज्यात जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या आरोग्य सेवा संचालनालयाने कोरोनाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेची पूर्वतयारी करण्यासाठी नुकतीच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बैठक घेतली. सुपरस्प्रेडर्स माध्यमातून कोविडचा प्रसार अधिक होतो. दुसरी लाट येण्यासाठीही हे सुपरस्प्रेडर्स कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे अशा व्यक्तींचे सर्वेक्षण प्राधान्याने करण्याच्या सूचना आरोग्य संचालनालयाने दिल्या आहेत.
औषधे व आॅक्सिजन पुरवठा : महापालिका दवाखाने, खासगी छोटी रुग्णालये, छोटे क्लिनिक व रुग्णालयात आॅक्सिजन काॅन्सेट्रेटर यंत्रे उपलब्ध ठेवावी. पुढील पंधरा दिवसांचा औषधांचा साठा हा बफर स्टाॅक म्हणून तयार ठेवण्याच्या सूचना.
फटाकेमुक्त साजरी करा दिवाळी : फटाक्यांच्या धुरामुळे कोविड रुग्णांचा, श्वसनाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींचा त्रास आणखी वाढू शकतो. त्यामुळे यंदा फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन आरोग्य संचालनालयाने केले.
कोविड रुग्णांचे प्रमाण ७ ते १० टक्के असल्यास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रत्येक प्रभाग-तालुक्यात एक कोविड समर्पित रुग्णालय म्हणून करावे. { रुग्णांचे प्रमाण ११ ते १५ टक्के असल्यास आणखी वीस टक्के कोविड रुग्णालये कार्यान्वित करावी. { रुग्णांचे प्रमाण १६ ते २० टक्के असल्यास सर्व मल्टिस्पेशालिटी रुग्णालये कोविडसाठी करावी. {रुग्णांचे प्रमाण २० टक्क्यांहून अधिक असल्यास सर्व रुग्णालये सज्ज ठेवा.
आरोग्य विभागाचा असा आहे आराखडा : { लॅबमधील पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण ७ टक्क्यांपेक्षा कमी असल्यास रुग्णसंख्येनुसार जिल्हा आणि पालिका स्तरावर किमान पाच ते सात रुग्णालये समर्पित कोविड रुग्णालये म्हणून कार्यरत ठेवण्याच्या सूचना.
हे असू शकतात सुपरस्प्रेडर्स
किराणा दुकानदार, भाजीवाले, फुटपाथवरील विक्रेते, हाॅटेल मालक, वेटर्स, घरकाम करणाऱ्या महिला, गॅस सिलिंडर वाटप करणारे कर्मचारी, इलेक्ट्रिशियन, प्लंबर, लाँड्री, इस्त्रीवाले, पुरोहित, ट्रक ड्रायव्हर्स, टेम्पोचालक, रिक्षाचालक, हमाल, रंगकाम व बांधकाम करणारे मजूर, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील कंडक्टर व इतर कर्मचारी, हाउसिंग सोसायटीचे सुरक्षा रक्षक, शासकीय, निमशासकीय कर्मचारी, पोलिस, होमगार्ड हे सुपरस्प्रेडर्स असू शकतात, असे आरोग्य संचालनालयाने म्हटले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.