आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शह-काटशह:सेवालाल महाराजांचे पाचवे वंशज शिवसेनेत ; विद्यमान मंत्री संजय राठोड यांना मोठा धक्का

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संत सेवालाल महाराज (पोहरादेवी) यांचे पाचवे वंशज व माजी आमदार गजाधर राठोड यांचे चिरंजीव अनिल राठोड यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शनिवारी (३ डिसेंबर) शिवसेनेत प्रवेश केला. वांद्रे येथील ‘मातोश्री’ निवासस्थानी उद्धव ठाकरे यांनी राठोड यांच्या हाती शिवबंधन बांधले. या वेळी ठाकरे गटाचे नेते अनंत गिते आणि खासदार अरविंद सावंत उपस्थित होते. राठोड यांचा पक्षप्रवेश शिंदे गटाचे आमदार आणि राज्याचे विद्यमान मंत्री संजय राठोड यांना मोठा धक्का मानला जात आहे.

या वेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न झाला. पण शिवसेना फुटण्यापेक्षा जास्त वाढली. रोज दिग्गज आणि साधी माणसे शिवसेनेत येत आहेत. वेगवेगळ्या विचारांची माणसे येत आहेत. त्यामुळे आधी होती त्यापेक्षा शिवसेना अधिक मजबूत होते आहे. इथे अनंत गिते आणि अरविंद सावंत हे जुने नेते आहेत. ते जुने आणि जाणते आहेत. नुसता जुना शब्द नको. जुने असून चालत नाही. जाणते हा शब्द हवा. जाणते म्हटल्यावर या परिस्थितीत काय केले पाहिजे हे त्यांना माहीत असते, असे ते म्हणाले. आता थेट बंजारा समाजात मानाचे स्थान असलेल्या सेवालाल महाराज यांच्या वंशजांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे ठाकरे गटाची ताकद वाढली आहे. आता बंजारा समाज नेमका कोणाच्या बाजूने उभा राहणार हे आगामी निवडणुकांत स्पष्ट होणार आहे. या वेळी अलिबागचे काँग्रेसचे माजी आमदार मधुशेठ ठाकूर यांचे चिरंजीव आमिर ठाकूर यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

तिसरा मोठा पक्षप्रवेश शिवसेनेतून बंडखोरी केलेले विद्यमान मंत्री संजय राठोड यांना खिंडीत गाठण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी जोरदार फील्डिंग लावायला सुरुवात केली आहे. मागील ३ महिन्यांत उद्धव ठाकरेंनी संजय राठोडांशी संबंधित ३ मोठ्या बड्या नेत्यांना पक्षात प्रवेश दिला. सप्टेंबर महिन्यात पोहरादेवी गडावरील महंत सुनील महाराज यांनी शिवसेना (ठाकरे गट) पक्षात प्रवेश केला. त्यानंतर ठाकरेंनी संजय राठोडांविरुद्ध दुसऱ्या ‘संजय’चा पर्याय समोर आणला. ऑक्टोबर महिन्यात दिग्रसचे राज्यमंत्री संजय देशमुख यांनीही शिवसेना पक्षात प्रवेश केला.

बातम्या आणखी आहेत...