आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किशोरी पेडणेकरांविरोधात गुन्हा दाखल करा:किरीट सोमय्यांची पोलिसांत तक्रार, SRA घोटाळाप्रकरणी पुरावे दिल्याचीही माहिती

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी वांद्रे पूर्व येथील निर्मल नगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.

किशोरी पेडणेकर यांनी मुंबईत अनेक ठिकाणी एसआरएचे गाळे बेकायदा ताब्यात घेतले आहेत. याप्रकरणी पेडणेकरांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सोमय्यांनी केली आहे.

पेडणेकरांनी SRAची फसवणूक केली

निर्मल नगर पोलिसांना दिलेल्या तक्रारीत सोमय्यांनी म्हटले आहे की, मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी वरळी गोमाता जनता एस. आर. ए. प्रकल्पात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, मुंबई यांची फसवणूक करून अनेक गाळे स्वतःच्या ताब्यात घेतले. यासंदर्भात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA), राज्य शासनाचे गृहनिर्माण विभागासह ठिकाणी तक्रारी केल्या आहेत. यासंदर्भात पेडणेकरांवर गुन्हा दाखल करुन त्यांची चौकशी करावी.

सर्व कागदपत्रे, पुरावे पोलिसांना दिले

पेडणेकरांनी केलेल्या एसआरए घोटाळाप्रकरणाचे सर्व कागदपत्रे, पुरावेही पोलिसांना दिल्याचे सोमय्यांनी सांगितले. सोमय्या म्हणाले, 2017 मधील मुंबई महापालिका निवडणुकीत किशोरी पेडणेकर यांनी जे निवडणूक शपथ पत्र भरले, त्यात त्या स्वतः गोमाता जनता एस. आर. ए च्या सहाव्या मजल्यावर राहत आहे असे लिहिले आहे.

कुटुंबाचाही सहभाग

सोमय्यांनी सांगितले की, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणानेही (SRA) स्पष्ट केले आहे की, किशोरी पेडणेकर यांना कोणताही गाळा देण्यात आलेला नाही. त्या तेथे झोपडपट्टीत राहत नव्हत्या. तसेच, किशोरी पेडणेकर व त्यांच्या परिवाराने अशाच पद्धतीने स्वतःची किश कॉर्पोरेट सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या नावाने गोमाता जनता एस. आर. ए मधील तळमजल्यावरील गाळा क्र. 4 व गाळा क्र. 5 ही ताब्यात घेतला. हा गाळा अन्य लोकांच्या नावाने असताना किशोरी पेडणेकर, त्यांचा मुलगा साईप्रसाद पेडणेकर, त्यांची कंपनी किश कॉर्पोरेट सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांनी खोट्या पद्धतीने या गाळ्यावर कब्जा केला.

एसआरएची पेडणेकरांना नोटीस

सोमय्या यांनी सांगितले की, या संदर्भात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA) यांनी या तीनही गाळ्यांच्या विरोधात नोटिसा दिल्या आहेत. फसवणुकीने हे गाळे पेडणेकर परिवार वापरत आहेत म्हणून कारवाई करण्याचा आदेश दिला आहे. तरी पोलिसांनी आता पेडणेकरांविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांची चौकशी करावी.

पेडणेकरांविरोधात सोमय्यांनी दिलेली तक्रार.
पेडणेकरांविरोधात सोमय्यांनी दिलेली तक्रार.
बातम्या आणखी आहेत...