आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शासन आदेश जारी:पदवीसाठी अंतिम वर्षाच्या परीक्षा अखेर रद्दबातलच! ज्यांना परीक्षा द्यायची आहे त्यांच्यासाठी पर्याय

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एटीकेटीच्या विद्यार्थ्यांना वाऱ्यावरच सोडले : आशिष शेलार

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे कला, वाणिज्य व विज्ञान पदवी अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णयावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. यासंबंधीचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे. ज्या विद्यार्थ्यांना अंतिम वर्षाची परीक्षा द्यायची आहे त्यांना ती देता येणार आहे. अभियांत्रिकी, वैद्यकीय तसेच इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षाही रद्द कराव्यात, अशी विनंती राज्य सरकारने संबंधित शिखर संस्थांकडे केली आहे. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनीही फेसबुक लाइव्हद्वारे नव्या निर्णयाची माहिती दिली.

कोरोनामुळे विद्यापीठांच्या व्यावसायिक व कला, विज्ञान, वाणिज्य आदी अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेण्यासारखी परिस्थिती नाही. त्यामुळे या परीक्षा न घेण्याचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतला होता. मुख्यमंत्र्यांनी तो जाहीरही केला. मात्र, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी हा निर्णय फेटाळला होता. कायद्यानुसार अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याची भूमिका मांडली होती. त्यामुळे पेच झाला होता.

9 लाखांवर विद्यार्थ्यांना मिळाला मोठा दिलासा

जीआरनुसार, सद्य:स्थितीत १४ सार्वजनिक विद्यापीठांंत अंतिम वर्षाला अव्यावसायिक अभ्यासक्रमाचे ७ लाख ३४ हजार ५१६ विद्यार्थी आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाचे २ लाख ८३ हजार ९३७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आरोग्यविषयक जोखमीमुळे या विद्यार्थ्यांची अंतिम सत्राची, वर्षाची परीक्षा घेणे शक्य नाही. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे नियोजन करणाऱ्या समितीचा अहवाल शासनाने स्वीकारला आहे. समितीच्या शिफारशीप्रमाणे शैक्षणिक कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.

एटीकेटीच्या विद्यार्थ्यांना वाऱ्यावरच सोडले : शेलार

भाजप नेते व माजी शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी शासनाच्या निर्णयाचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, ‘बॅकलॉग व एटीकेटीच्या ३ लाख ४१ हजार ३०८ विद्यार्थ्यांना वाऱ्यावरच सोडले? विद्यार्थ्यांचा एकत्रित एकसूत्री निर्णय नाही. हे “शैक्षणिक आरोग्य बिघडवण्याचे” पाप असून आमची भीती खरी ठरली आहे. राज्य सरकारने विद्यार्थ्यांसोबत हेराफेरीच केली.”

व्यावसायिक अभ्यासक्रमांचा निर्णय शिखर संस्थांकडे

या आहेत शिफारशी

- मागील सत्रात उत्तीर्ण झालेल्या अंतिम सत्रातील किंवा वर्षातील विद्यार्थ्यांना परीक्षा न देता पदवी प्रमाणपत्र हवे असल्यास तसे त्यांच्याकडून लेखी घेऊन विद्यापीठांनी योग्य ते सूत्र वापरून त्यांचा निकाल घोषित करावा.

- मागील सत्रातील, वर्षातील ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची इच्छा असेल तसे त्यांच्याकडून लेखी घेऊन त्यांना परीक्षेस बसण्याची संधी देण्यात यावी. त्यांच्या परीक्षेचा निर्णय संबंधित यंत्रणांशी विचारविनिमय करून घ्यावा.

- ज्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा बॅकलॉग आहे त्या विषयांच्या परीक्षेसंदर्भात कुलगुरू व संबंधित अधिकारी यांनी बैठक घेऊन निर्णय घ्यावा

- व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या अंतिम सत्र अथवा वर्षाच्या परीक्षा घेता येणार नाहीत. त्यासाठी अव्यावसायिक अभ्यासक्रमाप्रमाणेच कार्यवाही करावी. त्यास मान्यता देण्याची विनंती संबंधित शिखर संस्थेस करण्यात येईल.

अनेक इमारती अधिग्रहित

पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याबाबतचा शासन आदेश शुक्रवारी निघाला. त्यानुसार, कोरोनामुळे उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीवर केंद्र व राज्य शासनाने साथरोग प्रतिबंधक कायदा लागू केला आहे. यातील तरतुदीनुसार मोठ्या प्रमाणावर लोकांच्या एकत्र येण्यावर निर्बंध आहेत. राज्यातील ४१ महाविद्यालयीन इमारती व १९८ वसतिगृहे विलगीकरणासाठी अधिग्रहित केली आहेत.

बातम्या आणखी आहेत...