आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोरोना संसर्गामुळे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या रखडलेल्या परीक्षा येत्या ऑक्टोबर महिन्यात घेण्याचा निर्णय झाला असून ३१ ऑक्टोबरपर्यंत निकाल लावण्याचा प्रयत्न असेल, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी सायंकाळी पत्रकारांना दिली. तसेच राज्यातील सर्व सीईटीच्या तारखा दोन दिवसांत ठरवण्यात येतील, असेही सामंत यांनी सांगितले. १५ ते ३० सप्टेंबरदरम्यान प्रात्यक्षिक परीक्षा होऊ शकतात, तर ऑक्टोबर महिन्यात मुख्य लेखी परीक्षा घेण्यात येतील. ३१ ऑक्टोबरपर्यंत निकाल लावण्याचा प्रयत्न राहील. विद्यार्थ्यांना घरी बसून परीक्षा देता यावी यासाठीचे नियोजन करण्यासंदर्भात राज्यपालांनी मंजुरी दिली आहे. तसेच परीक्षा सोप्या पद्धतीने होणार आहेत, असे सामंत यांनी स्पष्ट केले.
राज्यपाल, उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि सर्व कुलगुरू यांची आॅनलाइन पद्धतीने आज राजभवनात बैठक पार पडली. त्यात कुलगुरू समितीच्या अहवालावर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर मंत्री सामंत यांनी बैठकीतील निर्णयाविषयी सांगितले.प्रात्यक्षिक परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात महाविद्यालयात यावे लागू नये, अशी पद्धत अवलंबली जाणार आहे. परीक्षा कशा घ्यायच्या हा निर्णय कुलगुरू समिती आणि विद्यापीठांनी घ्यायचा होता. परीक्षा घेण्यासाठी वेगवेगळे पर्याय विचाराधीन आहेत. त्यावर चर्चा सुरू असून सोपी पद्धत वापरण्यावर कुलगुरू समिती आणि उच्च, तंत्रशिक्षण विभाग व राजभवन यांच्यात एकमत झाल्याचे सामंत म्हणाले.
परीक्षा पद्धतीवर आज निर्णय
परीक्षा नेमक्या कशा पद्धतीने होणार याची माहिती शुक्रवार, ४ रोजी जाहीर केली जाईल. पुढील शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे काय करायचे याबाबतही लवकरच निर्णय होईल. राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यात परीक्षांबाबत काही विसंगती नाही. विद्यार्थ्यांनी संभ्रम न बाळगता अभ्यासाला लागावे, असे आवाहनही सामंत यांनी केले.
३१ आॅक्टोबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करावी
परीक्षा प्रक्रिया १५ सप्टेंबरपासून ३१ ऑक्टोबरपर्यंत निकालासह पूर्ण करावी. व्यवस्थापन परिषद आणि विद्यापीठाच्या परीक्षा मंडळासमोर समितीचा अहवाल ठेवून दोन दिवसांत शासनास कळवावे. राज्य आपत्कालीन प्राधिकरणाची बैठक मंगळवारी घेण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती करावी. व्यवस्थापन परिषद आणि परीक्षा मंडळामध्ये यासंदर्भात गठित केलेल्या समितीचा अहवाल सादर करून विद्यापीठांनी परीक्षा पद्धती निवडावी. -भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल
पुढील शैक्षणिक वर्ष लवकर सुरू
पुढील शैक्षणिक वर्ष लवकर सुरू करण्यासंदर्भात तयारी पूर्ण करावी. एटीकेटीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेची प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी. अपवादात्मक परिस्थितीमध्ये विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिल्यास अशा विद्यार्थांच्या परीक्षेचे नियोजन करण्यात यावे, असा निर्णय बैठकीत झाला.
31 ऑक्टोबरपर्यंत निकाल, घरी बसून अन् सोपी पद्धती असणार
कोविड परिस्थिती, परीक्षांचे नियोजन यूजीसीला कळवणार
राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. लवकरच राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होईल. त्यानंतर विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) दिनांक ३० सप्टेंबर २०२० पर्यंत परीक्षा घेण्याच्या मार्गदर्शक सूचना आहेत. यासंदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगाला पत्र पाठवून राज्यातील कोविड-१९ ची सध्याची परिस्थिती आणि परीक्षेसंदर्भातील नियोजन कळवण्यात येईल, असेही सामंत यांनी या वेळी सांगितले. दरम्यान, राज्यपालांसोबतच्या बैठकीस राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, अपर मुख्य सचिव राजीव जलोटा, परीक्षेसंदर्भात गठित केलेल्या समितीचे अध्यक्ष तथा मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर उपस्थित होते.
सीईटीच्या तारखा लवकरच
उच्च व तंत्रशिक्षण विभाग विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (एमएच-सीईटी) १ आॅक्टोबर ते १५ आॅक्टोबर दरम्यान घेण्याचे नियोजन आखत आहे. त्यासंदर्भात दोन दिवसांत तारखा जाहीर होणार आहेत. मात्र दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून त्या नोव्हेंबर अथवा डिसेंबर महिन्यात घेण्यात येणार आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.