आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधानसभेत मोठा वाद:आधी शरद पवार यांचा एकेरी उल्लेख, नंतर सातपुतेंची माफी

मुंबई17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा विधानसभेत बुधवारी (ता.२) एकेरी उल्लेख करणाऱ्या भाजप आमदार राम सातपुते यांच्याविरोधात राष्ट्रवादीच्या आमदारांनी वेलमध्ये उतरून जोरदार घोषणाबाजी केली. “माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही,’ अशी भूमिका राष्ट्रवादीने घेतल्यानंतर अखेर सातपुते यांनी दिलगिरी व्यक्त केली. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राम सातपुते यांना “आपण ज्या मतदारसंघातून येता तो मतदारसंघ राखीव आहे आणि तो डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या राज्यघटनेमुळे आहे’ याची आठवण दिली. त्यावर सातपुतेंनी “मी येथे आंबेडकरांनी राज्यघटना दिली म्हणून उभा आहे. परंतु “तुमच्या पवारने आरक्षण दिले नाही’ असा उल्लेख केला. यानंतर राष्ट्रवादीचे आमदार आक्रमक होऊन वेलमध्ये उतरले. अध्यक्षांनी वक्तव्य तपासून सांगेपर्यंत शांत राहण्याचे आवाहन केले. मात्र, हा नवीन पायंडा तयार करता आहात का ? अशी विचारणा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. त्यानंतर या वक्तव्यावरून विरोधी पक्षाने आक्रमक भूमिका घेतल्याचे पहायला मिळाले.

अनवधानाने चुकीचा शब्द : सातपुते राम सातपुते यांनी माफी मागावी यासाठी राष्ट्रवादी आमदार आक्रमक राहिले. माफी मागेपर्यंत आमदार घोषणा देत राहिले. शेवटी विधानसभा अध्यक्षांनी राम सातपुते यांना सूचना केली. “मी प्रथमच सभागृहात आलेलो आहे. अनवधानाने शब्द चुकीचा गेला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो,’ असे सातपुते म्हणाले. त्यानंतर सभागृहाचे कामकाज सुरळीत झाले.

बातम्या आणखी आहेत...