आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लता मंगेशकर यांचा प्रथम स्मृतिदिन:लतादीदी सर्व धर्मांतील चांगल्या गाेष्टींचे अनुकरण करायच्या, मुले त्यांचा जीव की प्राण

रचना शहा | मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • रचना शहा , लतादीदींच्या धाकट्या भगिनी मीनाताईंच्या कन्या

लता मावशींवर सांस्कृतिक संगमाचा प्रभाव होता. सर्व धर्मांतील चांगल्या गोष्टींचे त्या अनुकरण करायच्या. आमच्या घरी ज्या आत्मीयतेने दिवाळी साजरी केली जायची तितक्याच धामधुमीत ख्रिसमस साजरा व्हायचा. ईदला बिर्याणी यायची. सणवारांदिवशी संपूर्ण भारतीय उपखंड आणि पाश्चिमात्य संस्कृती एकाच छताखाली नांदत असल्यासारखे वाटायचे.

दिवाळीला सकाळी पाच वाजता उठून अंघोळीपासून ते राक्षसाचे प्रतीक म्हणून कारीट फळ पायाने फोडणे या परंपरा त्या पाळत. ख्रिसमसच्या एक दिवस आधी त्या आम्हा मुलांसाठी भेटवस्तू रॅपरमध्ये पॅक करून ख्रिसमस ट्रीमध्ये ठेवायच्या. अशा प्रकारचे अनोखे वेगळेपण होते त्यांच्यात. त्यांना होळीत रंग खेळणे खूप आवडायचे, पण रंगांमध्ये रसायने असतात हे कळल्यानंतर त्या सुरक्षिततेचा विचार करू लागल्या. या सणाचे खास आकर्षण असलेल्या कटाच्या आमटीपासून ते पुरणपोळी आणि उर्वरित खाद्यपदार्थ त्या उत्साहाने तयार करत आणि करवून घेत. प्रभुकुंज इमारतीतील सर्व रहिवासी होळी खेळत असत. गणरायाच्या आगमनानंतरही त्या पूर्ण रीतीरिवाजाने पूजा करायच्या तेव्हा असे वाटायचे की पूजा असावी तर प्रभुकुंजसारखी. लताजींसोबत घालवलेला प्रत्येक क्षण मौल्यवान आहे. माझे तर नावही त्यांनीच ठेवले होतेे. मानलेल्या भावांना रक्षाबंधनाला त्या राख्या पाठवायच्या. त्या जेव्हा एखाद्याला भाऊ मानायच्या, ती फक्त औपचारिकता नसयाची. सण असो की वाढदिवस, भेटवस्तू देणे त्यांना खूप आवडत होते. तथापि, भेटवस्तू घेताना मात्र त्यांना संकोच वाटत असे. वाढदिवस ताज हॉटेलमध्ये साजरा करणे त्यांना पसंत होते. २८ सप्टेंबर हा त्यांचा वाढदिवस. त्यानंतर दोन दिवसांनी म्हणजे १ ऑक्टोबरला माझा वाढदिवस. मागच्या जन्मीच्या पुण्यकर्मांमुळे या कुटुंबात माझा जन्म झाला असावा, असे मला वाटते. लहान मुले हा लताजींचा वीक पॉइंट होता. कोणतेही पालक त्यांच्यासमोर इतरांच्याच नव्हे तर स्वत:च्या मुलांवरही रागावू शकत नव्हते. त्यांना वाटायचे की मुले ही ईश्वराच्या सर्वात जवळ असतात. अमेरिकेतील एका विमानतळावरचा किस्सा आहे- एक महिला आपल्या मुलावर रागावत होती.

लतादीदी मला म्हणाल्या, ‘तेथे जाऊन त्या महिलेवर फायरिंग कर (तिच्यावर रागव).’ ओळख नसताना कसे रागावता येईल, असे मी त्यांना सांगितले. हे त्यांचे मुलांवर असलले निखळ प्रेम होते. मुलांची आवड त्यांना चांगल्या पद्धतीने माहीत होती. प्रत्येक मुलाला आवडणाऱ्या गोष्टींवर त्या संशोधन करायच्या आणि मग भेटवस्तू द्यायच्या. मुली-सुनांना त्या दागिने भेट म्हणून देत असत. लहानपणी मला प्राणी खूप आवडायचे. मी एकदा थोडी नाराज होते. हे कळल्यानंतर त्यांनी गाण्याची रेकॉर्डिंग थांबवून आम्हा मुलांना फिरायला आफ्रिकेला नेले. तेथे आम्हाला प्राणी दाखवले. त्या कधीच कुणाविषयी तक्रार करायच्या नाहीत. दु:ख झाले तरी स्वत:पुरतेच ठेवायच्या. त्यांनी स्वत:वर विजय प्राप्त केला होता. त्या माझ्यासोबत इंग्रजी बोलायच्या. म्हणायच्या, ‘कीप इट सिंपल रज्जो’ (सहज राहत जा रज्जो). अशा होत्या मावशी. नेहमी मित्र, तत्वज्ञ आणि मार्गदर्शक राहिल्या. सात दिवसांपूर्वी मला एका मराठी लग्नात जायचे होते. वधूची आई, भाऊ किंवा बहिणीला कोणती भेटवस्तू द्यावी, हे मला कळत नव्हते. लताजी होत्या तेव्हा मला असा त्रास व्हायचा नाही. त्यांचे स्वप्न सकार करण्यासाठी आम्ही लवकरच एक वेलनेस होम प्रोग्राम ‘स्वरमाऊली’ सुरू करणार आहोत.

क्रिकेट खेळ म्हणून आवडायचा, देश कोणता याने फरक पडत नव्हता
लताजींचे क्रिकेटवरील प्रेम जगजाहीर आहे. सुनील गावसकर कर्णधार असताना त्यांनी क्रिकेट संघासाठी पूर्ण शो केला होता. मला क्रिकेट आवडायचा नाही. क्रिकेटमध्ये रस घ्यावा यासाठी त्या माझ्यावर बळजबरी करायच्या. पटौदी साहेब, पॉली उम्रीगरजी घरी येत असत. सचिन तेंडुुलकर ४-५ वेळा आले होते. क्रिकेट त्यांना खेळ म्हणून आवडत असे, मग खेळाडू कोणत्या देशाचा आहे, त्यामुळेे काही फरक पडत नव्हता.

बातम्या आणखी आहेत...