आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

भिवंडी इमारत दुर्घटना:इमारतीतील मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून पाच लाखांची मदत; ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदेनी केली घोषणा, 10 लोकांनी गमावला आहे जीव

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सोमवारी पहाटे पावणे चारच्या सुमारास ही इमारत कोसळली होती.

भिवंडीतील पटेल कंपाउंड येथील जीलानी ही तीन मजली इमारत आज पहाटेच्या सुमारास कोसळली. या दुर्दैवी घटनेत जवळपास 10 जणांनी जीव गमावला आहे. मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची मदत राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणार असल्याचे ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.

इमारत कोसळल्याचे वृत्त समजताच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. एनडीआरएफची एक तुकडी, ठाणे महापालिकेच्या आपत्कालीन विभागाची तुकडी, ठाणे आपत्ती प्रतिसाद दल आणि भिवंडी अग्निशमन दलाचे जवान पहाटेपासून मदतकार्यात गुंतले असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. दरम्यान एकनाथ शिंदेंनी ढिगाऱ्या खालून सुखरूप बाहेर काढलेल्या नागरिकांची भिवंडी येथील इंदिरा गांधी स्मृती रुग्णालय येथे भेट घेऊन त्यांची विचारपूस केली.

सोमवारी पहाटे पावणे चारच्या सुमारास ही इमारत कोसळली होती. यात 10 जणांचा मृत्यू झाला तर किमान काही जण अद्याप ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. दरम्यान घटनेनंतर स्थानिक लोकांनी 20 लोकांना बाहेर काढले. एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे. ही इमारत 30 वर्षे जुनी होती, आधीच धोकादायक घोषित केले होते. दोनदा नोटिसही बजावण्यात आली होती.

सोमवारी पहाटे 3.40 वाजता ही दुर्घटना घडली. यावेळी बहुतांश लोक झोपेत होते. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत मागील काही दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे इमारत कमकुवत झाली होती. यामध्ये 21 कुटुंबे राहत होती.