आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ग्राउंड रिपोर्ट:मुंबई, पुण्यात विमाने सुरू; औरंगाबाद, शिर्डीत बंदच, 47 फेऱ्यांतून ४८५२ जणांचा प्रवास

मुंबईएका वर्षापूर्वीलेखक: प्रवीण पवार
  • कॉपी लिंक
  • औरंगाबाद, नाशिक : अद्याप शेड्यूल नाही

अशोक अडसूळ 

६० दिवसांच्या खंडानंतर सोमवारी (ता. २५ ) देशांतर्गत व्यावसायिक विमानसेवेला प्रारंभ झाला. पण मुंबईतून २५ उड्डाणांनाच परवानगी असल्याने पहिल्या दिवशीची काही उड्डाणे रद्द झाली. त्यामुळे हजारो प्रवाशांच्या पदरी मोठी निराशा आल्याचे पाहावयास मिळाले. आज दिवसभरात मुंबई विमानतळावरून ४७ विमान फेऱ्या झाल्या. त्यातून ११०० प्रवाशांचे मुंबईत आगमन झाले तर ३७५२ प्रवाशांनी प्रस्थान केले. आज मुंबईतून सर्वाधिक प्रवासी दिल्लीला जाणार होते, अशी माहिती विमानतळाचे व्यवस्थापन पाहणाऱ्या जीव्हीके कंपनीने दिली आहे.

मुंबईहून पहाटे ५ वाजता गुवाहाटीला पहिले उड्डाण होणार होते. लाॅकडाऊनमुळे टॅक्सी बंद आहेत. त्यामुळे अनेकांनी मध्यरात्री विमानतळ गाठले. पण, गुवाहाटीचे उड्डाण रद्द झाले. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप झाला. त्यानंतर ६.४५ वाजता टर्मिनल २ वरून पाटण्याला इंडिगोचे पहिले उड्डाण झाले, तर ८.२० वाजता लखनऊवरून आलेले इंडिगोचे विमान लँड झाले.

आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड केल्याची खातरजमा केली जात होती. तसेच प्रवाशांना अंतर ठेवावे लागत होते, त्यामुळे विमानतळ प्रवेशासाठी लांबच लांब रांगा दिसत होत्या. चेक इन करण्यापूर्वी प्रवाशाचे तापमान मोजण्यासाठी थर्मल स्क्रीनिंग करण्यात येत हाेते. बॅगा सॅनिटाइझ केल्या जात होत्या. अंतर राखण्याच्या सूचना दिल्या जात होत्या. बोर्डिंग पास देणारा स्टाफ फेस शील्ड आणि ग्लोव्हज घालून होता. प्रत्येकास एक ट्राॅली बॅग, एक हँडबॅगला परवानगी होती. हँडबॅगवर प्रवाशाचा पीएनआर आणि नाव लिहिले जात होते. चेकिंगपूर्वी प्रवाशाने मास्क, फेस शील्ड घालणे बंधनकारक होते. इथे दुसऱ्यांदा थर्मल स्क्रीनिंग करण्यात येत होते. शटल बस वापरण्यात येत नव्हत्या,थेट विमानात प्रवेश होता. 

नागपूर : फक्त सहा उड्डाणांना परवानगी

नागपुरातून सहा उड्डाणांना परवानगी दिली असून सोमवारपासून मुंबई-पुण्यासह इतर शहरांकरिता विमानसेवा सुरू झाली. सोमवारी दिल्ली-नागपूर, बंगळुरू-नागपूर, मुंबई-नागपूर ही एअर इंडियाची तर दिल्ली-नागपूर हे इंडिगोचे अशी चार विमाने आल्याची माहिती आबीद रूही यांनी दिली. मात्र वादळामुळे कोलकात्याला विमानसेवा सुरू होऊ शकली नाही. त्यांनी दोन दिवसांचा वेळ मागून घेतला आहे, असे रूही यांनी सांगितले.

औरंगाबाद, नाशिक : अद्याप शेड्यूल नाही

औरंगाबाद, नाशिक । औरंगाबादेत अद्याप विमानसेवा सुरू नाही. आमच्याकडे कुठल्याही विमान कंपनीने त्यांचे शेड्यूल दिलेले नाही. चिकलठाणा विमानतळ प्राधिकरण सज्ज आहे. आम्ही तयार आहोत, कंपन्यांचे शेड्यूल आल्यावर उड्डाण होईल, असे विमानतळाचे संचालक डी.जी.साळवे यांनी सांगितले. नाशिक आणि शिर्डी येथेही अशीच परिस्थिती आहे. तेथील विमान सेवा अद्याप सुरू झालेली नाही.

पुणे : एक हजाराहून जास्त प्रवाशांचा प्रवास

पुणे विमानतळाचे संचालक कुलदीपसिंग यांनी सांगितले की, भारतीय विमानतळ प्राधिकरणाने सांगितल्यानुसार पुणे विमानतळावरून साेमवारी विमान वाहतूक सेवा सुरू करण्यात आली. दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद, काेचीन, जयपूर, चेन्नई, नागपूर, अहमदाबाद, नाशिक, कोलकाता या शहरांसाठी विमान वाहतूक सेवा करण्याची तयारी करण्यात आली आहे. एअर इंडिया, स्पाइसजेट, इंडिगाे या विमान कंपन्यांनी २५ मेपासूनच्या तिकिटाचे आरक्षण २३ मेपासून सुरू केले.

बातम्या आणखी आहेत...