आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ५१ टक्के मतदान मिळवण्याचे उद्दिष्ट भाजपने ठेवले आहे. त्यासाठी महाविजय २०२४ अभियान पक्षाने सुरू केले असून हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ७५ हजार घरी जाण्याचा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. पक्षाचे सर्व खासदार, आमदार, पक्षाचे प्रदेश स्तरावरील ७०० पदाधिकारी या अभियानात सहभागी होतील, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी (५ एप्रिल) येथे पत्रकार परिषदेत दिली.
भाजप प्रदेश कार्यालयात बोलताना बावनकुळे म्हणाले, ६ एप्रिल हा भाजपचा स्थापना दिन आहे. यानिमित्त भाजपने राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. पुढील वर्षभरात राज्यातील ३ कोटी नागरिकांशी संपर्क साधून केंद्रातील मोदी सरकारच्या तसेच राज्यातील शिंदे - फडणवीस सरकारच्या जनकल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांना दिली जाईल.
राज्यातील ९७ हजार बूथवर राष्ट्रवादी, काँग्रेस, उद्धव ठाकरे गट अशा वेगवेगळ्या पक्षांतील कार्यकर्त्यांचे भाजपमध्ये प्रवेशाचे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. तसेच ७८२००७८२०० या दूरध्वनी क्रमांकाच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या आणि राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या विविध योजनांची माहिती अॅपमार्फत मतदारांपर्यंत पोहोचवली जाईल, असे बावनकुळे यांनी सांगितले.
स्थापनादिनी होणार नड्डांच्या हस्ते ध्वजारोहण स्थापना दिनानिमित्त केंद्रीय कार्यालयात राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरातील पक्ष कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. पक्षाच्या प्रदेश कार्यालयातही ध्वजारोहण होणार आहे. पक्षाच्या सर्व बूथ समित्यांवर स्थापना दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.