आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गच्छंती:अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच वनमंत्री राठोड देणार राजीनामा, मी कारवाई करण्यापूर्वी तू निर्णय घे, मुख्यमंत्र्यांनी बजावले; पवारांचाही सल्ला

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

टिकटॉक स्टार पूजा चव्हाण आत्महत्येचा संशय आणि मुख्यमंत्र्यांचे निर्देश धुडकावून पोहरादेवी येथे हजारोंची गर्दी जमवल्याच्या प्रकरणानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडलेले वनमंत्री संजय राठोड अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. कारवाई करण्यापूर्वी तू निर्णय घे, अशा शब्दांत पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बजावले आहे.

दि. १ मार्चपासून मुंबईत विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनात पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी विरोधक रान उठवणार आहेत. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांचा राजीनामा घेण्याचे निश्चित केले आहे, अशी खात्रीलायक माहिती शिवसेनेतील सूत्रांनी दिली. तत्पूर्वी, मंगळवारी शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली होती. त्या वेळी राठोड यांचा राजीनामा घेण्याबाबत पवारांनी सल्ला दिला होता. तसेच राठोड यांच्या राजीनाम्याबाबत महाविकास आघाडीच्या तिन्ही घटक पक्षांत एकमत आहे. त्यासोबतच मुख्यमंत्री, शिवसेना आणि आघाडी सरकारच्या प्रतिमेचा सवाल आहे. तसेच ज्या वेळेस मंत्र्याविरोधात गंभीर आरोप होतात, तेव्हा राजीनामा घेतला जातो असे शरद पवार यांनीही मुख्यमंत्र्यांना सुचवले आहे, असे शिवसेनेतील एका ज्येष्ठ नेत्याने ‘दिव्य मराठी’ला सांगितले.

भाजपकडून प्रथमच पुणे पोलिसात लेखी तक्रार : पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी भाजपकडून प्रथमच लेखी तक्रार अर्ज करण्यात आला आहे. खासदार गिरीश बापट यांच्या स्नुषा स्वरदा बापट यांनी वानवडी पोलिसांना तक्रार अर्ज दिला आहे. वनमंत्र्यांंच्या दबावाला व छळाला कंटाळून तिने आत्महत्या केली असून संजय राठोडांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

स्वत:हून राजीनामा द्यावा, ही मुख्यमंत्र्यांची इच्छा
मंत्रिपदावरून दूर केल्यास विरोधकांच्या हल्ल्यास बळी पडल्यासारखे होईल, त्यामुळे राठोड यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा, अशी मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे. तसेच मी कारवाई करण्यापूर्वी तू निर्णय घे, असे उद्धव ठाकरे यांनी राठोड यांना बुधवारी वर्षा बंगल्यावरील बैठकीत सांगितले होते. या वेळी आघाडी सरकारमधील वरिष्ठ मंत्रीही उपस्थित होते. आघाडीतील घटक पक्षांचे एकमत झाल्याने राठोड अधिवेशनापूर्वी राजीनामा देऊ शकतात, अशी माहिती शिवसेनेतील वरिष्ठ पदावरील सूत्रांनी दिली आहे.

महासंचालकांना पुणे पोलिसांनी घातली टोपी : चित्रा वाघ
पुणे|पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांची चौकशी केलेली नाही. त्यामुळे अपूर्ण अहवाल सादर करून पुणे पोलिसांनी राष्ट्रीय महिला आयोग आणि पोलिस महासंचालकांनाच टोपी घातली आहे, असा आरोप भाजप महिला प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केला. दरम्यान, पोलिस तपासात तथ्ये तपासले जातात. त्यामुळे पूजाप्रकरणी पुणे पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरू आहे, असे पोलिस महासंचालक हेमंत नगराळे यांनी नागपुरात सांगितले.

पोहरादेवी महंतांसह ८ जणांना कोरोना
मानोरा (जि.वाशीम), - पोहरादेवी गडावर संजय राठोड यांनी केलेल्या शक्तिप्रदर्शनानंतर महंत कबीरदास महाराज यांच्या कुटुंबातील ४ सदस्यांसह ८ जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. तत्पूर्वी, तालुक्यात कोरोना संसर्ग वाढत असल्याने गर्दी होऊ नये म्हणून पोलिसांनी महंतांना नोटिसा बजावल्या होत्या. दि. २२ रोजी गावातील ३० नागरिकांच्या कोरोना चाचण्या केल्या होत्या. त्यात महंत कबीरदास महाराजांसह ८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

दरम्यान, शक्तिप्रदर्शनावेळी गर्दीप्रकरणी ८ ते १० हजार जणांच्या जमावाविरोधात आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यान्वये मानोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र यात वनमंत्री राठोड यांचे नाव नाही. त्यामुळे आता राठोडांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.

बातम्या आणखी आहेत...