आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महानगरपालिका निवडणूक:आघाडीच्या सोयीनुसार पालिका निवडणुकीत एकसदस्यीय प्रभाग रचना; आराखडा तयार करण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पुढील वर्षी मुंबई, नाशिक, सोलापूर, नांदेड, परभणी, अकोला, अमरावतीसह 18 महापालिकांची निवडणूक

कोरोनाचा प्रभाव हळूहळू ओसरत असताना राज्यात पुन्हा निवडणुकांचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. नगरपंचायतीनंतर पुढील वर्षी राज्यातील १८ महानगरपालिकांच्या निवडणुका होणार असून त्यातील बहुसदस्यीय प्रभाग संपुष्टात येणार आहेत. त्या जागी महाविकास आघाडीतील तीन पक्षांच्या सोयीची अशी एकसदस्यीय प्रभाग असणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी (२५ ऑगस्ट) त्यासंदर्भातला आदेश जारी केला आहे. आयोगाने आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात आगामी पालिका निवडणुका एकसदस्यीय प्रभाग पद्धतीने होतील, त्यासाठी प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आहेत.

प्रभाग रचनेसाठी जनगणना कार्यालयाने प्रसिद्ध केलेली २०११ ची लोकसंख्या विचारात घ्यावी. त्यानुसार २७ आॅगस्टपासून प्रभाग रचनेस प्रारंभ करावा. प्रथम पालिकेची एकूण सदस्य संख्या निश्चित करावी. त्या संख्येनुसार प्रभाग तयार करावेत. एका वाॅर्डला एक प्रभाग ठेवावा, असे आयोगाने पत्रात स्पष्ट केले आहे. मागील सार्वत्रिक निवडणुकीनंतर पालिका हद्दीत झालेले बदल व भौगोलिक बदल विचारात घेण्यात यावेत. शक्यतो वस्त्यांची फोडाफोड करण्यात येऊ नये. पालिकांच्या वाढीव हद्दीनुसार त्यांचे क्षेत्र निश्चित करून नकाशे तयार करावेत. एकूण लोकसंख्या भागिले पालिकेची सदस्य संख्या यानुसार प्रभागांची लोकसंख्या निश्चित करावी, असे आयोगाने म्हटले आहे.

काटेकोर गुप्तता पाळण्याची सूचना
प्रभाग रचना करताना त्याची गोपनीयता न राखल्यामुळे हरकती व याचिकांची संख्या वाढते. त्यामुळे न्यायालयीन प्रकरणे उद‌्भवतात आणि निवडणुकीस विनाकारण विलंब होतो. त्यामुळे प्रभाग रचनेची गुप्तता काटेकोर पाळावी, असे आयोगाने पालिका प्रशासनांना स्पष्टपणे बजावलेले आहे.

येथे नियोजित निवडणूक
पुणे, पिंपरी-चिंचवड, बृहन्मुंबई, ठाणे, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, पनवेल, मीरा-भाईंदर, सोलापूर, नाशिक, मालेगाव, परभणी, नांदेड-वाघाळा, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर आणि चंद्रपूर या १८ महापालिकांच्या निवडणुका पुढच्या वर्षी हाेत आहेत.

आराखडा तयार करण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश
१. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात द्विसदस्यीय प्रभाग रचना होती. मात्र फडणवीस सरकारने ती त्रिसदस्यीय करत स्थानिक स्वराज्य संस्थांवर वर्चस्व मिळवले. आता पुन्हा महाविकास आघाडी सरकारने प्रभाग रचना एकसदस्यीय केल्याने त्यांना फायदा होईल.
२. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही ठिकाणी महाविकास आघाडी एकत्र लढण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकसदस्यीय प्रभाग रचना आघाडीला फायद्याची ठरणार आहे.
३. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांचा एकसदस्यीय प्रभाग रचनेचा हट्ट होता. शिवसेनेसाठीही तेच सोयीचे आहे. मात्र राष्ट्रवादीचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मत द्विसदस्यीय प्रभाग रचनेचे होते.

बातम्या आणखी आहेत...