आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जे. जे. रुग्णालयातून कालच डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर आज सीबीआयने त्यांना ताब्यात घेतले आहे. 100 कोटी वसुलीप्रकरणी सीबीआयतर्फे त्यांची चौकशी करण्यात येणार आहे. तत्पुर्वी अनिल देशमुख हे ईडीच्या कोठडीत होते. रुग्णालयातून डिस्चार्ज होताच सीबीआयकडे आपला ताबा देण्याविरोधात अनिल देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, आज उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी 100 कोटी वसुलीचे आरोप केले आहेत.
गेल्याच आठवड्यात तुरुंगात पाय घसरुन पडल्याने अनिल देशमुख यांच्या खांद्याला दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांना मुंबईतील जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी सध्या शस्त्रक्रियेची गरज नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे काल त्यांना डिस्चार्ज देत त्यांची रवानगी पुन्हा ऑर्थर जेल रोड कारागृहात करण्यात आली होती. त्यानंतर आज सकाळी जवळपास 11 वाजेच्या सुमारास ऑर्थर रोड कारागृहातूनच त्यांना सीबीआय अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे.
देशमुखांच्या सहाय्यकांना 11 एप्रिलपर्यंत सीबीआय कोठडी
दरम्यान, विशेष सीबीआय न्यायालयाने माजी पोलिस निरीक्षक सचिन वाझे, अनिल देशमुख यांचे सहाय्यक शिंदे आणि पालांडे यांना 11 एप्रिलपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे. अनिल देशमुखांसह तिघांचे जबाब तुरुंगात नोंदवले आहेत. परंतु त्यांची पुन्हा पडताळणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांची कोठडी देण्याची विनंती सीबीआयने उच्च न्यायालयात केली होती. त्याला अनिल देशमुख यांनी विरोध केला होता. मात्र, न्यायालयाने सीबीआयची विनंती मान्य करत देशमुखांची याचिका फेटाळून लावली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.