आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईडी चौकशी:दापोली रिसॉर्ट प्रकरणात ठाकरे गटाचे माजी मंत्री अ‍ॅड.अनिल परब अडचणीत, दोन सहकाऱ्यांविरोधात ईडीचे आरोपपत्र

मुंबई25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजी मंत्री तथा शिवसेना ठाकरे गटाचे नेते अ‍ॅड. अनिल परब यांच्या दोन सहकाऱ्यांविरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) विशेष पीएमएलए न्यायालयात सोमवारी दापोली रिसाॅर्टप्रकरणी आरोपपत्र दाखल केले. यापैकी एक सदानंद कदम असून दुसरे पूर्वाश्रमीचे उपविभागीय अधिकारी जयराम देशपांडे हे आहेत.

दापोली रिसॉर्ट प्रकरणात परब यांचीही ईडीने चौकशी केली आहे. मार्च महिन्यात परब यांनी उच्च न्यायालयात गुन्हा रद्दबातल करण्यासाठी याचिका दाखल केली असून सुनावणी होईपर्यंत आपल्याविरोधात कारवाई करण्यासाठी ईडीला राेखावे, अशी विनंती याचिकेत केली आहे. न्यायालयाने परब यांना अटकेपासून संरक्षण देण्याची विनंती मान्य करून सुनावणी जून महिन्यात ठेवली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली शहरात सागरी किनाऱ्यावर असलेल्या दापोली येथील साई रिसॉर्टविरोधात पर्यावरण नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने तक्रार केली होती. त्यानंतर पैशांची अफरातफर केल्याचा ठपका ठेवून जानेवारी महिन्यात १० कोटींच्या ईडीने साई रिसॉर्टवर जप्तीची कारवाई केली होती. परब आणि कदम यांनी कृषीसाठी राखीव जमिनीचे बेकायदा अकृषक रूपांतर करून सागरी किनारा कायद्याचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यानंतर या भूखंडावर महसूल विभागाकडून बेकायदा परवानगी मिळवून तिथे बंगला बांधल्याचा आरोप आहे.