आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

राजकीय:माजी खासदार प्रिया दत्त यांच्याकडून बंडखोर सचिन पायलटांची पाठराखण, निरुपम म्हणाले पक्षनेतृत्वात दोष

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महत्त्वाकांक्षी असणे याेग्य, पक्षश्रेष्ठींना घरचा आहेर

काँग्रेसच्या मुंबईतील माजी खासदार व राहुल यांच्या विश्वासू प्रिया दत्त यांनी राजस्थानचे काँग्रेसचे बंडखोर उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांची चक्क पाठराखण केली. मंगळवारी प्रिया यांनी टि्वट केले, त्यात त्यांनी ‘महत्वाकांक्षी असणे चुकीचे नाही’ असा घरचा आहेर काँग्रेस पक्षश्रेष्ठींना दिला.

राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी काँग्रेसविराेधात बंडाचा झेंडा रोवला आहे. त्यांच्या बंडाळीमुळे तेथील अशोक गहलोत सरकार अस्थिर बनले आहे. परिणामी, काँग्रेस पक्षश्रेष्ठींचा आदेश झुगाऱ्याबद्दल पायलट यांची प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्रीपदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे.

त्या पार्श्वभूमीवर प्रिया दत्त यांनी आज एक टि्वट केले. ‘आम्ही आज आणखी एक मित्र गमावला आहे. ज्योतिरादित्य शिंदे आणि सचिन पायलट माझे चांगले मित्र होते. पक्षाला कठीण काळात या दोघा नेत्यांनी साथ दिली. राजकारणात महत्वाकांक्षी असणे चुकीचे आहे, यावर आपला अजिबात विश्वास नाही’, अशा शब्दात प्रिया यांनी पायलट यांची बाजू उचलून धरली.

अभिनेते सुनिल दत्त यांच्या निधनानंतर उत्तर- मध्य मुंबईतून प्रिया २००५ मध्ये पोटनिवडणूक जिंकल्या. २००९ मध्ये पुन्हा विजयी झाल्या. २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत भाजपच्या पूनम महाजन यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. प्रिया या अभिनेता संजय दत्त यांच्या भगिनी आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या त्यांच्या मतदारसंघातल्या उमेदवारी विकल्याचा आरोप झाला होता.

प्रिया सध्या पक्षात सक्रीय नाहीत. एकेकाळी त्या राहुल यांच्या मर्जीतल्या म्हणून ओळखल्या जात होत्या. २०१९ ची लोकसभा आपण निवडणूक लढवणार नाही, अशी त्यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घोषणा करत पक्षश्रेष्ठींना अडचणी आणले हाेते. प्रिया दत्त यांच्या या आजच्या टि्वटमुळे काँग्रेसमधील नाराजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. तसेच राहुल यांच्या मर्जीतील सहकारी पक्षविरोधात जात असल्याच्या आरोपांना बळ मिळणार आहे.

निरुपम म्हणाले पक्षनेतृत्वात दोष

मुंबई काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष संजय निरुपम यांनी राजस्थान काँग्रेसमधील बंडाळीबाबत सोमवारी पक्षनेतृत्वाला दोष दिला होता. गहलोत आणि पायलट यांच्यातील संघर्ष पक्षाने योग्य हाताळला नाही, अशा शब्दात निरुपम यांनी पक्षश्रेष्ठींवर जाहीर टिका केली होती. तर मुंबईतील काँग्रेसचे माजी खासदार मिलींद देवरा यांनी पायलट यांच्याशी चर्चा करण्यास नकार दिल्याचे सांगितले जात आहे.