आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केसरकरांचा निर्णय:विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्याची 10 वर्षांत चौथ्या शिक्षणमंत्र्यांकडून घोषणा, पण अंमलबजावणी केव्हाच नाही

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
आता सातवीपर्यंत सात विषयांच्या पुस्तकांऐवजी एकाच पुस्तकाची सोय. - Divya Marathi
आता सातवीपर्यंत सात विषयांच्या पुस्तकांऐवजी एकाच पुस्तकाची सोय.

विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे कमी करण्याचा दरवर्षी चर्चेचा विषय राहिला आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सोमवारी यासंदर्भात घोषणा केली. पाठ्यपुस्तकांचे तीन भाग केले जाणार असून त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे कमी होईल.

पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना ७ विविध विषयांची पुस्तके एकाच वेळी शाळेत नेण्याऐवजी संपूर्ण अभ्यासक्रमाची ३ भागांत विभागणी करून एकच पुस्तक न्यावे लागणार आहे. हे पुस्तक तयार करताना गणित आणि विज्ञान या विषयांत ठिकठिकाणी मराठीबरोबरच इंग्रजीतील संकल्पनांचाही वापर केल्याने विद्यार्थ्यांना आता द्विभाषिक पाठ्यपुस्तक या शैक्षणिक वर्षापासून उपलब्ध होत आहे. दरम्यान, गेल्या १० वर्षांतील चार शिक्षणमंत्र्यांनी केलेली ही चौथी घोषणा आहे. मात्र, आजवर याची अंमलबजावणी झाली नाही.

सर्व शाळांमध्ये आगामी शैक्षणिक वर्षापासून पहिलीपासूनच द्विभाषिक पाठ्यपुस्तके देण्यात येतील. त्यासाठी एकात्मिक पुस्तक संकल्पना राबवण्यात येणार आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या विषयांचे धडे एकत्र करून एक पुस्तक तयार करण्यात येणार आहे, असेही केसरकर यांनी सांगितले.

समित्यांचे काम पुढे सरकेना

पृथ्वीराज चव्हाण सरकारमध्ये राजेंद्र दर्डा, फडणवीस सरकारमध्ये विनोद तावडे, ठाकरे सरकारमध्ये वर्षा गायकवाड या तीन तत्कालीन शिक्षणमंत्र्यांनीही दप्तराचे ओझे कमी करण्याचा निर्णय घेतला होता. पण त्यावर अभ्यास समित्या नेमण्यापलीकडे काहीच झाले नव्हते.

मुख्याध्यापकांवर होती जबाबदारी

राज्य सरकारने जनहित याचिकांच्या सुनावणीनंतर २१ जुलै २०१५ रोजी परिपत्रक काढले. त्याची अंमलबजावणी न केल्यास संबंधित शैक्षणिक संस्थांचे संचालक व मुख्याध्यापकांना जबाबदार धरण्यास शिक्षण संचालकांना बजावले होते. मात्र पुढे काही झाले नाही.

30% अधिक ओझे

दप्तराचे जितके ओझे हवे त्यापेक्षा ३० टक्के अधिक ओझे असते. राज्य मंडळापेक्षा इतर मंडळांच्या विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे अधिक आहे.

वजनाच्या 10% ओझे हवे

विद्यार्थ्यांच्या वजनाच्या केवळ १० टक्के दप्तराचे जेवणाचा डबा व पाणी बाटलीसह ओझे असावे, असा राज्य सरकारने नेमलेल्या समितीने निर्णय घेतला आहे. मात्र त्यासाठी नियम बनवले नसल्याने तो कागदावरच राहिला.

विद्यार्थ्यांना पाठदुखीचा मोठा त्रास

प्रमाणापेक्षा अधिक वजनाचे दप्तर वाहणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये पाठदुखी, स्नायू आखडणे, मणके झिजणे, मान दुखणे, फुप्फुसांची कार्यक्षमता कमी होणे, डोकेदुखी, मानसिक ताण असे आजार निर्माण होत आहेत.

एकात्मिक पाठ्यपुस्तक योजनाही यंदापासून सुरू होणार

महाराष्ट्र शासनाच्या शैक्षणिक विभागाने ‘एकात्मिक पाठ्यपुस्तक योजना’ तयार केली आहे. त्याची अंमलबजावणी २०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासून सुरू होणार आहे. त्यानुसार राज्य पाठ्यपुस्तक आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळ एकात्मिक पाठ्यपुस्तक योजनेची अंमलबजावणी करत आहे.

दिव्य मराठी एक्स्पर्ट | शाळेमध्ये पुस्तके ठेवून विद्यार्थ्यांचे ओझे कमी करता येईल
याबाबत सरकारने याआधीच समिती नेमली आहे. मात्र, अंमलबजावणी होत नाही. छोट्या उपायांमधून दप्तराचे ओझे कमी करता येईल. जसे की शाळेत पुस्तके ठेवणे, दोन मुलांपैकी एकालाच पुस्तके आणायला सांगावे. अभ्यासक्रमाचे तुकडे करणे शक्य आहे. यंदापासून अंमलबजावणी हवी, असे शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...