आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावधगिरीचा इशारा:15 ऑगस्टपासून रात्री 10 पर्यंत हॉटेलिंग-शॉपिंगचे ‘स्वातंत्र्य’; ऑक्सिजनची मागणी 700 मेट्रिक टन होताच राज्यात आपोआप होणार ‘लॉकडाऊन’

मुंबई4 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • हॉटेलमध्ये शेवटची ऑर्डर रात्री 9 पर्यंतच देता येणार

कोरोनाच्या निर्बंधांमुळे त्रस्त असलेल्या जनतेला राज्य सरकारने बुधवारी मोठा दिलासा दिला. राज्यात १५ आॅगस्टपासून नागरिकांना रात्री १० वाजेपर्यंत हॉटेलिंग आणि शॉपिंगचे स्वातंत्र्य मिळणार आहे. राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि शॉपिंग मॉल्स रात्री १० वाजेपर्यंत खुली ठेवण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. सिनेमागृहे, नाट्यगृहे, प्रार्थनास्थळे सध्या बंदच राहणार आहेत. मात्र ज्या दिवशी राज्यात ऑक्सिजनची गरज ७०० मेट्रिक टनच्या वर पोहोचेल त्या दिवशी ‘ऑटोमोड’वर लॉकडाऊन लागेल, असा इशारा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. विशेष म्हणजे, पुढील आठवड्यात महाराष्ट्र अनलॉक होणार, असे वृत्त ‘दिव्य मराठी’ने सोमवारच्या अंकातच दिले होते.

सिनेमा-नाट्यगृहे, धार्मिक स्थळे बंदच, लॉनवरच्या विवाहांना २०० उपस्थितांना मान्यता; खासगी कार्यालये २४ तास खुली ठेवता येणार

 • उपाहारगृहे : खुली अथवा बंदिस्त उपाहारगृहे ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील. कर्मचाऱ्यांचे दोन लसमात्रांसह १४ दिवस पूर्ण आवश्यक आहे.
 • बार : बार सुरू ठेवण्यास सर्व दिवस रात्री १०.०० वा. पर्यंत मुभा आहे. भोजनासाठी ग्राहकांकडून शेवटची आॅर्डर रात्री ९.०० वाजेपर्यंत घ्यावी. पार्सल सेवा २४ तास सुरू ठेवण्याची मुभा.
 • दुकाने : सर्व व्यापारी दुकाने सर्व दिवस रात्री १० पर्यंत सुरू ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांना दोन लसमात्रांसह १४ दिवस पूर्ण असणे आवश्यक आहे.
 • शॉपिंग मॉल्स : राज्यातील सर्व शॉपिंग मॉल्स सर्व दिवस रात्री १० पर्यंत सुरू ठेवण्याची मुभा. लसीकरण प्रमाणपत्र व ओळखपत्र प्रवेशद्वारावर दाखवणे आवश्यक.
 • धार्मिक स्थळे : राज्यातील सर्व धार्मिक स्थळे पुढील आदेशापर्यंत नागरिकांसाठी बंद राहतील.
 • जिम, सलून, स्पा : एसी व नाॅनएसी जिम्नॅशियम, योग सेंटर, सलून स्पा ५० टक्के क्षमतेने सर्व दिवस रात्री १०.०० वा. पर्यंत सुरू ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे.
 • विवाह सोहळे : लॉन / मंगल कार्यालय / हॉटेलमध्ये ५० टक्के क्षमतेने मुभा. खुल्या प्रांगण / लॉनमध्ये विवाह सोहळ्यास उपस्थितांची संख्या क्षमतेच्या ५० टक्के परंतु जास्तीत जास्त २०० व्यक्ती या मर्यादेत असेल. बंदिस्त मंगल कार्यालय /हॉटेलमध्ये उपस्थितांची संख्या क्षमतेच्या ५० टक्के परंतु जास्तीत जास्त १०० व्यक्ती या मर्यादित असेल.
 • कार्यालये : कर्मचाऱ्यांचे पूर्ण लसीकरण केलेल्या खासगी व औद्योगिक आस्थापनांना पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्याची मुभा.
 • सिनेमागृहे व मल्टिप्लेक्स : सिनेमागृह / नाट्यगृह, मल्टिप्लेक्स पुढील आदेशापर्यंत बंद राहतील.
 • मैदाने : सर्व मैदाने, उद्याने, नियमित वेळेत सुरू राहतील.
 • आंतरराज्य प्रवास : लसीकरण झालेल्यांना बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्रात प्रवेशासाठी आरटीपीसीआरची गरज नाही. अन्य प्रवाशांसाठी ७२ तासांपूर्वीची आरटीपीसीआर निगेटिव्ह हवी.
 • कार्यक्रम : राजकीय, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम, निवडणूक प्रचार सभा, रॅली, मोर्चे यांच्यावर निर्बंध कायम राहतील.

नांदेडात डेल्टा प्लसचे २ रुग्ण, राज्यभरात ६५
राज्यात डेल्टा प्लसचे आणखी २० रुग्ण आढळले आहेत. बुधवारी प्रयोगशाळेच्या अहवालानुसार राज्यात आतापर्यंत आढळलेल्या डेल्टा प्लस रुग्णांची संख्या ६५ झाली आहे. नव्याने आढळलेले २० रुग्ण हे मुंबई ७, पुणे ३, नांदेड, गोंदिया, रायगड, पालघर प्रत्येकी २ आणि चंद्रपूर,अकोला येथे प्रत्येकी १ रुग्ण आढळला आहे. या जनुकीय क्रमनिर्धारण तपासणीतून राज्यात ८० टक्क्यांहून अधिक नमुन्यांमध्ये डेल्टा व्हेरिएंट आढळत असल्याचे दिसून येते आहे. या सर्वेक्षणातून राज्यातील ६५ डेल्टा प्लस रुग्णांपैकी ३२ पुरुष असून ३३ स्त्रिया आहेत.

...तर पुन्हा लॉकडाऊन!
रुग्णसंख्या वाढल्यास व कोविड रुग्णांच्या उपचारांसाठी प्रतिदिन ७०० मे. टन किंवा व त्यापेक्षा जास्त ऑक्सिजन लागत असल्यास संपूर्ण राज्यात तत्काळ पूर्णपणे लॉकडाऊन घोषित करून त्यानुसार कठोर निर्बंध लागू करण्यात येतील.

शाळा उघडण्याच्या निर्णयाला २४ तासांत ब्रेक; शिक्षण विभाग तोंडघशी
राज्यातील ५ ते १२ वीपर्यंतच्या शाळा १७ ऑगस्टपासून सुरू करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला होता. मात्र, अवघ्या २४ तासांत या निर्णयाला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. शाळा उघडण्याचा अंतिम निर्णय राज्य कोरोना कृती दलाशी चर्चा करून मुख्यमंत्री स्वत: घेतील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर जाहीर केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अकरावीसाठी सीईटी घेण्याचा शिक्षण विभागाचा निर्णय मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने रद्द ठरवला होता. नेमके त्याच वेळी शिक्षण विभागाने दुसरीकडे शाळा उघडण्याचे परिपत्रक काढल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते.

शाळा आणि कॉलेज उघडण्याबाबत त्या त्या भागातील प्रशासन निर्णय घेणार होते. मात्र राज्य कोरोना कृती दल, बालरोगतज्ज्ञ कृती दलाच्या सदस्यांनी शाळा उघडण्याबाबत प्रतिकूल मत नोंदवले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बुधवारी संध्याकाळी बैठक घेणार असून त्यात निर्णय होईल. विद्यापीठाचे कुलगुरू त्या विद्यापीठाच्या अखत्यारीत येणारे जिल्हे, तसेच शिक्षण संस्था यांच्याशी चर्चा करतील. त्यानंतर ते आरोग्य विभागास अहवाल देतील, त्यानंतर वरिष्ठ महाविद्यालये उघडण्यासंदर्भात निर्णय होईल, असे टोपे यांनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...