आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराणींच्या निधनावर राज ठाकरेंची पोस्ट:एलिझाबेथ द्वितीय ह्यांच्या शिरावरून एकटेपणा घेऊन येणारा काटेरी राजमुकुट उतरला

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कुठलाही राजमुकुट हा काटेरी असतो आणि तो कमालीचा एकटेपणा घेऊन येतो. हे एकटेपण 70 वर्ष सोसलेल्या एलिझाबेथ 2 ह्यांच्या शिरावरून हा मुकुट उतरला, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे गुरुवारी वयाच्या 96 व्या वर्षी निधन झाले. एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर ब्रिटनसह जगातील अनेक देशांनी शोक व्यक्त केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांना एक पोस्ट ट्विट करून अभिवादन केले आहे.

राज ठाकरेंनी पोस्टमध्ये म्हटले की, ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय ह्यांचे निधन झाले. 70 वर्ष त्या ब्रिटनच्या महाराणी पदावर होत्या. आणि ही 70 वर्ष कुठली? तर जगभरातून राजेशाही संपुष्टात आलेली असताना, जगभरात लोकशाहीचे वारे वेगाने वाहत असतानाची 70 वर्ष. युरोपमधली अनेक राजघराणी ही रक्तरंजित क्रांत्यांनी उलथवून टाकली गेली. पण ब्रिटनची राजेशाही टिकली ती ब्रिटिशांचा त्यांच्या परंपरांविषयी असलेला कमालीचा अभिमान आणि बदलाचे वारे समजून घेत हस्तिदंती मनोऱ्यातून बाहेर येण्याची तयारी, कधी नाईलाजाने तर कधी आनंदाने दाखवलेल्या राणीमुळे, म्हणजे अर्थात क्वीन एलिझाबेथ 2 ह्यांच्यामुळे, असे गौरवउद्गार राज यांनी काढले.

पोस्टमध्ये ते म्हणतात की, ब्रिटनच्या राजघराण्याचे लाड का पुरवायचे? मुळात त्यांची गरज आहे का? असा विचार एका बाजूला बळावत होता. त्याचवेळेस आजोबांच्या वयाच्या विन्स्टन चर्चिलसारख्या कमालीच्या लोकप्रिय आणि करिष्मा असलेल्या पंतप्रधानाला हाताळायचं, तर पुढे कमालीच्या स्वतंत्र बुद्धीच्या समवयस्क मागरिट थॅचर ह्यांच्याशी कितीही खटके उडाले तरी स्वतःचा इगो बाजूला ठेवत, संविधानाची चौकट राखणं हे कमालीचं कौशल्य एलिझाबेथ द्वितीय ह्यांनी दाखवलं. आणि म्हणून इतक्या भानगडी आणि शब्दशः ब्रिटिश राज्यघराण्याचं खाजगी आयुष्य ब्रिटिश टॅब्लॉइड्सनी चव्हाट्यावर आणून सुद्धा राणीबद्दलचं ब्रिटिशांचं प्रेम आणि जगाचं कुतूहल टिकलं, या शब्दात राज यांनी महाराणी द्वितीय यांच्या कारकिर्दीचे वर्णन केले.

कुठलाही राजमुकुट हा काटेरी असतो आणि तो कमालीचा एकटेपणा घेऊन येतो. हे एकटेपण 70 वर्ष सोसलेल्या एलिझाबेथ 2 ह्यांच्या शिरावरून हा मुकुट उतरला. एलिझाबेथ 2 ह्यांचं एक युग होतं, ते संपलं. आता नवीन युग सुरू होतंय ? का, राजघराण्याचा सूर्य मावळतोय हे बघणं कुतूहलाच असेल. एलिझाबेथ 2 ह्यांच्या स्मृतीस अभिवादन, असे राज ठाकरेंनी म्हटले.

राज ठाकरे यांची पोस्ट
राज ठाकरे यांची पोस्ट

दहा दिवसांचा दुखवटा जाहीर

महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांनी वयाच्या 96 वर्षी स्कॉटलंडमधील बाल्मोरल कॅसल या ठिकाणी अंतिम श्वास घेतला. महाराणी एलिझाबेथ यांचं पार्थिव हे स्कॉटलँडहून शाही ट्रेनने बकिंगहॅम पॅलेस या ठिकाणी आणले जाणार आहे. तसेच पुढचे दहा दिवस ते ठेवले जाईल. दहाव्या दिवशी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. गुरूवारी त्यांची प्रकृती खालावली होती. ब्रिटनमध्ये दहा दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. तसेच आता त्यांचे पुत्र चार्ल्स हे किंग म्हणून पदभार स्वीकारतील.

बातम्या आणखी आहेत...