आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:पुणे ते औरंगाबाद होणार सहापदरी एक्स्प्रेस वे, राज्यातील रस्ते कामांसाठी गडकरी-ठाकरेंचा मास्टरप्लॅन

मुंबई13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे आणि औरंगाबाददरम्यान लवकरच सहापदरी एक्स्प्रेस वे तयार करण्यात येणार आहे. यासंदर्भातील प्राथमिक आराखडा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तयार केला आहे. या आराखड्याचे सोमवारी, ११ ऑक्टोबर रोजी मुंबईत केंद्रीय रस्ते व परिवहनमंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापुढे सादरीकरण करण्यात आले. औरंगाबाद ते पुणे या मार्गावर पुणे ते शिरूरदरम्यान उड्डाणपूल राहणार आहे.

औरंगाबादच्या उद्योगवाढीसाठी औरंगाबाद ते पुणे हा मार्ग सहापदरी करण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. मात्र आता हा प्रकल्प प्रत्यक्षात उतरवण्यासाठीच्या शासनस्तरावरील हालचालींना वेग आला आहे.

सध्या औरंगाबादहून पुण्याला जाण्यासाठी सहा तासांचा कालावधी लागतो. केंद्र सरकारने देशभरात द्रुतगती मार्ग तयार करण्याचे नियोजन केले आहे. त्यातील टप्पा क्रमांक २ मध्ये पुणे-औरंगाबाद ग्रीनफील्ड एक्सप्रेस वेचा समावेश आहे. त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे प्राथमिक आराखडा तयार करण्यात आला आहे. सध्या अस्तित्वात असलेला मार्ग वगळून नव्याने ग्रीनफील्ड एक्स्प्रेस वे केला जाणार आहे. या मार्गासाठी कराव्या लागणाऱ्या भूसंपादनाबाबतही चर्चा सह्याद्री अतिथिगृह येथे झालेल्या बैठकीत करण्यात आली. या वेळी वडोदरा-मुंबई एक्स्प्रेस मार्ग, नगर बायपास, रत्नागिरी-कोल्हापूर, कोल्हापूर-कागल, सांगली-सोलापूर, सुरत-नाशिक-नगर, नगर-सोलापूर-अक्कलकोट, पुणे-नगर- नांदेड-जालना-नगर- पुणे अशा विविध महामार्गांच्या तसेच रिंगरोडच्या कामांच्या सद्य:स्थितीवरही चर्चा करण्यात आली.

कामे वेगाने पूर्ण करण्यासाठी मंत्रालयातून नियमित आढावा
कामे वेगाने पूर्ण करण्यासाठी मंत्रालयातून नियमित आढावा घेण्यात येणार आहे. तसेच प्रलंबित मुद्द्यांवरही तातडीने निर्णय घेण्याच्या सूचना बैठकीत करण्यात आल्या आहेत. या कामांना गती देण्यासाठी मंत्रालय स्तरावर मुख्य सचिव या प्रकल्पांचा नियमित आढावा घेणार आहेत.

महामार्गांच्या कामासाठी सेवानिवृत्त आयएएस अधिकाऱ्यांचीही नियुक्ती
मराठवाडा, विदर्भ तसेच कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशसह विभागीय स्तरावर महामार्गांच्या कामासाठी भूसंपादन आणि वन विभागाशी संबंधित अडचणी सोडविण्यासाठी सेवानिवृत्त आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याच्या सूचना गडकरी यांनी बैठकीत दिल्या.

बातम्या आणखी आहेत...