आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराठाकरे गटातील नेते आणि खासदार गजानन किर्तिकर यांनी आज शिंदे गटात प्रवेश केला. हा उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का आहे. शिंदे गटात जाण्यापूर्वी त्यांनी आज मुख्यमंत्र्यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली. तिथे त्यांचा यथोचित सत्कारही करण्यात आला.
म्हणून मी ठाकरेंची साथ सोडली - किर्तिकर
शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर खासदार गजानन किर्तिकर म्हणाले, राष्ट्रवादी- काॅंग्रेससोबतची साथ सोडा हे मी उद्धव ठाकरे यांना सांगत होतो, पण त्यांनी ऐकले नाही. ते ऐकतील, ठाकरे निर्णय घेतील हे मला वाटत होते म्हणूनच मी थांबलो होतो पण तसे झाले नाही. दोन दसरा मेळावे भव्य झाले म्हणजेच दोघे एकत्र आल्यास ताकद मोठी बनेल हे मी सांगितले पण उपयोग झाला नाही. मग मीच बाहेर पडायचे ठरवले.
किर्तिकर भीष्मपितामह - मुख्यमंत्री शिंदे
माहीममधील कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, गजानन किर्तिकर हे भीष्मपितामह आहेत. सर्वांची भावना होती, मनात ईच्छा आणि अपेक्षा होती की, गजानन किर्तिकर आपल्यात हवे. संघटनात्मक बांधणी, प्रशासन कसे चालवायचे हे त्यांना चांगले माहित आहे.
शिवसेनेकडून हाकालपट्टीचे पत्र
दरम्यान शिंदे गटात किर्तिकरांनी प्रवेश करताच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतर्फे एक पत्र जारी करण्यात आले आहे. त्यात खासदार गजानन किर्तिकर यांची पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे हाकालपट्टी करण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या पत्रावर पक्षाचे सचिव खासदार विनायक राऊत यांची सही आहे.
आज मुंबईतील दादर माहीम परिसरातील विभाग क्रमांक 10 च्या वतीने बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे खासदार राहुल शेवाळे आणि आमदार सदा सरवणकर यांनी एका विशेष मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात जनतेच्या साक्षीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. याच कार्यक्रमाचे औचित्य साधून शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि खासदार गजानन कीर्तिकर यांनीही शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी नेते रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ हे देखील उपस्थित होते.
ठाकरे गटाला धक्का
संजय राऊत जेलमधून बाहेर येऊन जेमतेम दोन दिवसही झाले नाहीत तर आज ठाकरे गटाचे खासदार गजानन किर्तिकर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हात धरला. हा मोठा धक्का ठाकरे गटाला बसला आहे.
'वर्षा'वर भेट
खासदार गजानन किर्तिकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी वर्षा बंगल्यावर गेले. त्यानंतर किर्तीकर शिंदे गटात जाणार हे निश्चित झाले. ते आजच शिंदे गटात प्रवेश केला.
आज प्रभादेवी येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला खासदार राहुल शेवाळे, शिवसेना उपनेते आमदार सदा सनवणकर शिवसेना सचिव कॅप्टन अभिजित अडसूळ, तसेच विभाग प्रमुख गिरीश धानुरकर व महिला विभाग संघटिका प्रिया गुरव, शाखाप्रमुख अजय कुसुम, संतोष तेलवणे, अभिजीत राणे,योगेश पाटील,संदीप देवलेकर,मिलिंद तांडेल हेदेखील उपस्थित होते.
आधीही भेट
शिवतीर्थावर बोलताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर युती करुन चूकच केली, आता पुन्हा चूक नको असा सल्ला किर्तिकर यांनी उद्धव ठाकरे यांना दिला होता. याआधी 6 सप्टेंबरच्या मध्यरात्री गजानन किर्तीकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एक गुप्त भेट झाल्याचीही चर्चा होती. जुलै महिन्यात एकनाथ शिंदे यांनी गजानन किर्तीकर यांची भेट घेतली होती. त्यावेळी शिंदे यांनी ही राजकीय भेट नसल्याचं म्हटले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.