आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाप्पा मोरया:वांद्रेतल्या गणेशोत्सवात साकारणार काठमांडू येथील 52 फुटी पशुपतिनाथ मंदिराचा देखावा

विनोद यादव । मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दरवर्षी प्रसिद्ध मंदिरांची हुबेहूब आरास साकारणाऱ्या वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे यावर्षी काठमांडू येथील प्रसिध्द पशुपतिनाथ मंदिराची 52 फूट उंच हुबेहूब प्रतिकृती साकारली आहे.

मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार हे प्रमुख सल्लागार असलेल्या वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे यावर्षीचे 27 वे वर्ष असून दरवर्षी एक प्रसिद्ध मंदिराची आरास या मंडळातर्फे केली जाते.

गेल्यावर्षी केदारनाथ मंदिर साकारण्यात आले होते तर मंडळाच्या रौप्यमहोत्सवी वर्षात लोकमान्य बाळा गंगाधर टिळक यांच्या रत्नागिरीतील वाड्याची प्रतिकृती साकारण्यात आली होती. त्यापूर्वी शिर्डीचे साई मंदिर, पंढपरपूरचे विठ्ठल मंदिर यासह महाराष्ट्र्र, गुजरात, गोव्यातील प्रसिद्ध मंदिराची आरास करण्यात आली होती.

विविध जाती धर्मियांची वस्ती असलेल्या रेक्लमेशन येथे हा गणेशोत्सव साजरा होत असून, या उत्सवात सर्वधर्मीय सहभागी होतात आणि मोठया उत्साहात हा उत्सव साजरा करतात हेही त्याचे वैशिष्ट. तसेच दरवर्षी चित्रपट, क्रीडा, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर या बाप्पाच्या दर्शनासाठी आवर्जुन येतात. त्यामुळे मुंबईतील गणेशोत्सव मंडळामध्ये हे मंडळ लक्षवेधी ठरले आहे. तसेच कोरोना काळातही उत्सवाची परंपरा खंडित केली नाही. सातत्याने 27 वर्षे गणपती सोबतच एका प्रसिद्ध देवस्थानाचे दर्शन या मंडळातर्फे भाविकांना घडविण्यात येत आहे.

यावर्षी पशुपतिनाथांचे मंदिर साकारण्यात आले असून हिमालयाच्या कुशीत नेपाळ येथे असणारे भगवान शिवाचे हे प्राचिन मंदिर असून मंदिराची वास्तुरचना पॅगोडा पद्धतीची आहे. हे मंदिर जागतीक वारसा लाभलेल्या वास्तुपैकी एक आहे. त्यामुळे मंदिराची जशीच्या तशी वास्तुरचना तर करण्यात आली आहेच. शिवाय मंदिरात असणारे वैशिष्टपूर्ण शिवलिंग व मंदिराचा गाभाराही हुबेहूब साकारण्यात आला आहे. ही सकंल्पना ज्यांची आहे असे मंडळाचे प्रमुख सल्लागार आमदार ॲड आशिष शेलार यांनी दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी गणेशभक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

धार्मिकेतेसोबत अनेक वैद्यकीय व सामाजिक, सांस्कृतीक उपक्रमही राबविण्यात येत असून आरोग्याबाबत आवश्यकते नियम मंडळातर्फे आम्ही पाळणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र राऊत यांनी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...